भोकरदन (छत्रपती संभाजीनगर) येथील ३ औषधालय चालकांना अटक !

अवैध गर्भपात प्रकरण

पोलिसांविषयी संशय ?

मारहाण करणार्‍यांना पोलिसांनी सोडून का दिले ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. छावणी आणि एम्.आय.डी.सी. सिडको पोलीस एकमेकांकडे बोट दाखवतात. जाधव यांच्या भ्रमणभाषमध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारे शहरातील नामांकित आधुनिक वैद्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले जाते; पण त्या दिशेने पुढे कोणतीच कारवाई होतांना दिसत नाही.

छत्रपती संभाजीनगर – गर्भवतीची दलालाच्या वतीने गर्भलिंग चाचणी करून गर्भपात केल्याच्या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात नोंद केलेल्या गुन्ह्यात भोकरदन तालुक्यातील ३ औषधालय चालकांना अटक करण्यात आली. कृष्णा वाडेकर (वय २८ वर्षे), प्रताप शेजूळ (वय २४ वर्षे) आणि सतीश धसाळ (वय २३ वर्षे), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी दलाल जाधवसह हर्सूल येथील आधुनिक वैद्या शबाना सय्यद, तक्रारदाराला मारहाण करणारे अरुण जाधव, मनोज साळवे यांना अटक करण्यात आली होती.

आरोपी ज्ञानेश्वर जाधव याने गर्भपातासाठी भोकरदन तालुक्यातील ३ औषधालय चालकांकडून गर्भपाताची औषधे आणल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांना न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. गर्भपाताची औषधे आधुनिक वैद्य राजपूत यांच्याकडून घेतल्याचे औषधालय चालकांनी सांगितले. त्यावरून छावणी पोलीस वैजापूर येथे गेले होते; पण त्यापूर्वीच ते तेथून पसार झाले होते.