आज दुर्दैवाने कौटिल्य शास्त्र, शिवरायांची युद्धनीती आम्हाला शिकवली जात नाही ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे
पर्वरी येथील शिवराज्याभिषेकदिन सोहळ्यात ‘शिवरायांची युद्धनीती’ या विषयावर डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचे व्याख्यान
पणजी, ७ जून (वार्ता.) – आज आम्हाला विदेशातील इतिहास शिकवला जातो. आज राजकीय विज्ञान या विषयात दुर्दैवाने सॉक्रेटीस काय म्हणाला ?आदी शिकवले जाते; मात्र कौटिल्य शास्त्र शिकवले जात नाही. भीष्माने युधिष्ठिराला केलेला उपदेश म्हणजेच भीष्मनीती, राम-भरत भेटीच्या वेळी प्रभु श्रीरामचंद्रांनी भरताला ‘राज्य कसे चालवावे ?’ यासंबंधी केलेला उपदेश, शिवरायांची युद्धनीती, गनिमी कावा आदी शिकवले जात नाही, अशी खंत डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी येथे व्यक्त केली. ‘पर्वरी रायझिंग’, पर्यटन खाते, विद्याप्रबोधिनी आणि ‘शिव सोहळा समिती’ यांच्या वतीने पर्वरी येथे आयोजित ‘शिवसामर्थ्य सोहळा’ या कार्यक्रमात ‘शिवरायांची युद्धनीती’ या विषयावरील व्याख्यानात डॉ. शेवडे बोलत होते. या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पर्यटनमंत्री रोहन खंवटे, समितीचे सचिव राजेंद्र भोबे, पेन्ह-द-फ्रान्सचे सरपंच स्वप्निल चोडणकर, बस्तोडाचे सरपंच सुभाष, सुकूरच्या सरपंच सोनिया पेडणेकर आदींची उपस्थिती होती.
डॉ. सच्चिदानंद शेवडे पुढे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वत्व आणि स्वाभिमान या दोन्ही गोष्टी समाजाला दिल्या. ‘आपण जिंकू शकतो’ असा दृढ विश्वास सर्वांमध्ये निर्माण केला आणि यामुळेच आज साडेतीनशे वर्षे उलटूनही आम्ही छत्रपती शिवरायांचे नाव आदराने घेत असतो. छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धनीती शिकण्यासारखी आहे. ‘आपला शत्रू कोण ?’, हे नेमकेपणाने समजून घेणे, शत्रूप्रती मानवतावादी दृष्टीकोन न बाळगणे, नेहमी अखंड सावध रहाणे, शत्रूवर तीळमात्र विश्वास कधीही न ठेवणे, युद्धाच्या पूर्वी शत्रूवर मानसशास्त्रीय दबाव आणणे आदी अनेक गोष्टी या युद्धनीतीतून शिकण्यासारख्या आहेत. रामायण आणि महाभारत हे केवळ वाचायचे नसते, तर ते प्रत्यक्षात उतरवायचे असते. आज विदेशात दासबोधाच्या आधारे उत्तम व्यवस्थापन कसे असावे ? हे शिकवले जाते.’’
कार्यक्रमाच्या वेळी डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी लिहिलेल्या ‘गोवा मुक्ती संग्राम (दुसरी आवृत्ती) आणि ‘शिवरायांची युद्धनीती’ या २ पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत श्रीहरि आठल्ये यांनी, सूत्रसंचालन सागर अग्नी यांनी आणि आभार स्वप्निल चोडणकर यांनी मानले. व्याख्यानानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. या वेळी पर्यटनमंत्री रोहन खंवटे आणि डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. तद्नंतर दुचाकी फेरी काढण्यात आली. पदयात्रा आणि दुचाकी फेरी यांमध्ये शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.