उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाच्या विजयी खासदाराच्या समर्थकांचा मिरवणुकीत गोंधळ !
समर्थकांच्या विरोधात तक्रार नोंद
लक्ष्मणपुरी – लोकसभा निवडणुकीत शामली जिल्ह्यातील कैराना मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या उमेदवार इक्रा हसन यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे प्रदीप चौधरी यांचा पराभव केला. ४ जून या दिवशी निकाल लागल्यानंतर इक्रा हसन यांच्या शेकडो समर्थकांनी विजयी मिरवणूक काढली. त्या वेळी त्यांनी रस्त्यावर गोंधळ घातला. या गोंधळाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. याची नोंद घेऊन पोलिसांनी ११० समर्थकांच्या विरोधात तक्रार करून त्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न चालू केले आहे.
१. पोलीस उपनिरीक्षक विनय कुमार यांनी त्यांच्याच पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मिरवणुकीत गोंधळ घातल्याच्या संदर्भातील व्हिडिओ पोलीस ठाण्याला ८ जून या दिवशी प्राप्त झाला. (पोलिसांकडे एवढी मोठी यंत्रणा हाताशी असतांना त्यांना व्हिडिओवरून या गोंधळाची माहिती मिळते, हे लज्जास्पद होय ! – संपादक)
२. या व्हिडिओमध्ये मिरवणुकीत सहभागी झालेले काही लोक आवाज करतांना आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करतांना दिसत आहेत. दुचाकी वाहन चालवणारे घातक स्टंटबाजी करत असल्याचेही यात दिसून आले.
३. निवडणुकीच्या काळात आचारसंहिता चालू होती. त्यामुळे समर्थकांचे हे वर्तन म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघन आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे.
काँग्रेसच्या मुसलमान खासदाराच्या समर्थकांकडूनही गोंधळ
शामली जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या सहारनपूर जिल्ह्यातही काही दिवसांपूर्वी असाच प्रकार उघडकीस आला होता. काँग्रेसचे उमेदवार इम्रान मसूद यांच्या विजयाचा आनंद साजरा करणार्या जमावाने रस्त्यावर गोंधळ घातला. चोरट्यांनी महिलांसमोर अश्लील हावभावही केले. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवली आहे. यातील आरोपींची ओळख पटली असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.