‘व्हाय भारत मॅटर्स’ (भारत का महत्त्वाचा) !
भारताच्या जागतिक महत्त्वाविषयी खोलवर अंर्तदृष्टी दर्शवणारे पुस्तक
भारताचे माजी परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी ‘व्हाय भारत मॅटर्स’ हे पुस्तक लिहिले आहे. ‘व्हाय भारत मॅटर्स’ या विचार करायला प्रवृत्त करणार्या पुस्तकात भारताचे माजी परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी २१ व्या शतकात भारताच्या जागतिक महत्त्वाविषयीचे विश्लेषण केले आहे. राजकीय मुत्सद्दी म्हणून त्यांना असलेला मोठा अनुभव आणि आंतरराष्ट्रीय संबंधांविषयी त्यांची खोलवर असलेली दूरदृष्टी यातून डॉ. जयशंकर यांनी जागतिक व्यवस्थेला आकार देण्याची भारताची क्षमता आणि त्याची भूमिका यांविषयी सर्वसमावेशक असे विश्लेषण या पुस्तकात केले आहे. या पुस्तकात त्यांनी इतर अनेक पैलू मांडले असल्याने हे पुस्तक लक्षणीय ठरले आहे.
१. भौगोलिक विश्लेषण
डॉ. जयशंकर यांनी भारताच्या भौगोलिक स्थानाविषयी सर्वसमावेशक परीक्षण केले आहे. जगातील महासत्ता असलेले देश अमेरिका, चीन आणि रशिया यांच्याशी भारताच्या असलेल्या संबंधांचे विश्लेषण केले आहे. त्याचसमवेत भारताच्या परराष्ट्रविषयक धोरणांमध्ये पर्याय निवडण्यासाठी या प्रेरक शक्तीचा वापर कसा करावा ? याविषयी त्यांनी विचार मांडले आहेत, तसेच भारताचे अगदी शेजारी असलेल्या नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका या देशांशी असलेल्या संबंधांविषयी सखोल माहिती दिली आहे.
२. बहुराष्ट्रीय मंच आणि जागतिक शासन
संयुक्त राष्ट्रे, ‘जी २०’ (जी २० म्हणजे १९ देश आणि युरोपियन युनियन (यात २७ देश आहेत) यांचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँक गव्हर्नर यांची संघटना.) आणि ‘ब्रिक्स’ (ब्रिक्स म्हणजे ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इराण, इजिप्त, इथिओपिया आणि संयुक्त अरब अमिराती यांचा समावेश असलेली आंतरसरकारी संघटना.) यांसारख्या बहुराष्ट्रीय मंचांवर भारताच्या सक्रीयतेविषयी डॉ. जयशंकर यांनी चर्चा केली आहे. जागतिक शासनाला आकार देण्यात भारताच्या भूमिकेवर त्यांनी प्रकाश टाकला असून ‘आणखी सर्वसमावेशक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रातिनिधिक सुव्यवस्था असावी’, असे त्यांचे म्हणणे आहे.
३. सुरक्षेविषयीची आव्हाने
भारताला तोंड द्याव्या लागणार्या सुरक्षाविषयक आव्हानांचा उल्लेख पुस्तकात केला आहे. यामध्ये आतंकवाद, सायबर गुन्हेगारीविषयीची भीती आणि समुद्रातील सुरक्षा यांचा समावेश आहे. या आव्हानांवर मात करण्यासाठी भारताचा दृष्टीकोन कसा असावा ? यावर डॉ.जयशंकर यांनी अंतर्दृष्टी निर्माण केली आहे. यासाठी ‘जागतिक स्तरावर एकमेकांच्या सहकार्याने प्रयत्न करावा’, यावर त्यांनी भर दिला आहे.
४. सांस्कृतिक मुत्सद्देगिरी
डॉ. जयशंकर यांनी मृदु शक्तीची क्षमता असलेल्या भारताच्या अतिशय श्रीमंत सांस्कृतिक वारशाविषयी लिहिले आहे. त्यात ‘विदेशामध्ये भारताची प्रतिमा निर्माण करणे आणि विविध लोकांशी संबंध जोडणे यांत सांस्कृतिक मुत्सद्देगिरीची भूमिका महत्त्वाची आहे’, असे त्यांनी म्हटले आहे.
५. आर्थिक मुत्सद्देगिरी
व्यापाराविषयीचे करार, गुंतवणूक करण्यात घेतलेला पुढाकार आिण नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देणे यांसारख्या आर्थिक मुत्सद्देगिरीच्या दृष्टीने भारताचे प्रयत्न कसे असावेत ? याचे परीक्षण त्यांनी केले आहे. भारताची आर्थिक क्षमता आणि जागतिक स्तरावर आर्थिक सत्ता बनण्याची आकांक्षा डॉ. जयशंकर यांनी अधोरेखित केली आहे.
६. राजकीय आव्हाने
राजकीय मुत्सद्देगिरी करतांना भारतासमोर असलेली आव्हाने आणि भारताने केलेले प्रयत्न यांविषयी या पुस्तकात सखोल माहिती आहे. एकमेकांशी स्पर्धा करणार्या राष्ट्रांमध्ये समतोल साधणे, गुंतागुंतीचे संबंध हाताळणे आणि जागतिक सत्तापालटाला दिशा देणे या विषयांवर चर्चा केली आहे. या आव्हानांवर मात करण्यासाठी भारताने आखलेल्या राजकीय डावपेचांविषयी त्यांनी अंतर्दृष्टी निर्माण केली आहे.
७. मृदु शक्ती आणि सार्वजनिक कूटनीती
‘जगावरील भारताचा प्रभाव वाढण्यासाठी भारताच्या मृदु शक्तीला महत्त्व आहे’, यावर डॉ. जयशंकर यांनी भर दिला आहे. ‘योग, बॉलीवूड आणि भोजन यांसारख्या भारतीय संस्कृतीतील गोष्टींना विदेशामधील लोकांकडून मागणी येत असल्याने भारताविषयी सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होत आहे. भारताच्या सांस्कृतिक वारसा असलेल्या कला, संगीत, साहित्य आणि आध्यात्मिक परंपरा यांमुळे जागतिक स्तरावर भारताचा प्रभाव वाढून इतर राष्ट्रांशी चांगले संबंध निर्माण करता येतील’, असे त्यांनी म्हटले आहे.
८. विदेशात स्थायिक झालेल्या भारतीय नागरिकांचा सहभाग
या पुस्तकात ‘विदेशात स्थायिक झालेले भारतीय नागरिक आणि भारताला जागतिक स्तरावर नेण्यात त्यांचा सहभाग’, याचा उल्लेख करण्यात आला आहे. ‘जगभरातील विविध देशांमध्ये स्थायिक असलेले भारतीय नागरिक हे भारत आणि भारतीय नागरिक रहात असलेले देश यांमधील महत्त्वाचा दुवा असून त्यामुळे भारताला त्या देशांशी आर्थिक, सांस्कृतिक अन् राजकीय संबंध प्रस्थापित करण्यास साहाय्य होते’, असे मत डॉ. जयशंकर यांनी मांडले आहे, तसेच भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये जयशंकर यांनी डावपेचात्मक स्वायत्ततेवर भर दिला आहे. अनेक जागतिक सत्तांशी संबंध ठेवत असतांना भारताचे स्वातंत्र्य आणि निर्णय घेण्याची क्षमता कशी स्थिर राहिल ? याविषयी त्यांनी सांगितले आहे.
९. संकटकालीन परिस्थिती हाताळणे आणि मानवतावादी कूटनीती
डॉ. जयशंकर यांनी संकटकालीन परिस्थिती हाताळण्याविषयी भारताची भूमिका आणि मानवतावादी नीती यांकडे लक्ष वेधले आहे. ‘भारताची जगाला साहाय्य करण्याची बांधिलकी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता अन् स्थिरता निर्माण करण्याची भूमिका काय असावी ?’, यांविषयी चर्चा केली आहे.
१०. तंत्रज्ञान आणि त्यातील नवीनता
डॉ. जयशंकर यांनी तंत्रज्ञान आणि त्यातील नवीनता यामध्ये भारताचे वाढत चाललेले महत्त्व अन् माहिती तंत्रज्ञान, अवकाशविषयक संशोधन आणि अक्षय्य ऊर्जा यांमध्ये भारताने केलेली प्रगती यांमुळे ‘ज्ञानाचे केंद्र’ म्हणून जगात भारताला महत्त्व प्राप्त झाले आहे, असे म्हटले आहे.
११. आतंकवादाला प्रत्युत्तर देणे आणि जागतिक सुरक्षितता
यामध्ये त्यांनी ‘आतंकवादाचा सामना करण्यासाठी भारताचे प्रयत्न आणि जागितक सुरक्षेमध्ये देशाची भूमिका’, यांवर सखोल चर्चा केली आहे. यामध्ये त्यांनी आतंकवादामुळे निर्माण झालेली विविध आव्हाने आणि या धोक्याला सामोरे जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची आवश्यकता यांवर भर दिला आहे. याखेरीज संयुक्त राष्ट्रांमध्ये जागतिक शांतता राखण्यासाठी भारताचे योगदान यावर चर्चा केली आहे.
१२. आर्थिक मुत्सद्देगिरी आणि जागतिक व्यापार
यात ‘आर्थिक मुत्सद्देगिरीविषयी भारताचे प्रयत्न आणि जागतिक व्यापारामध्ये त्याची भूमिका’, यांविषयी सांगितले आहे. यामध्ये ‘रिजनल कॉप्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशीप’सारख्या (प्रादेशिक सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी) विभागीय आणि जागतिक स्तरावरील व्यापार यांविषयी भारताने केलेले करार अन् विविध देशांकडून आर्थिक सहकार्य वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केला आहे.
१३. डिजीटल तंत्रज्ञानाविषयीची नीती
‘भारताचा डिजीटल तंत्रज्ञानामध्ये सहभाग आणि आंतरराष्ट्रीय संबंध निर्माण करण्यात त्याची भूमिका’, यांविषयी माहिती दिली आहे. यावर त्यांनी डिजीटल जोडणीविषयी भारताचा पुढाकार, ‘इ-गर्व्हनन्स’ (तंत्रज्ञानाद्वारे चालवण्यात येणारे प्रशासन) आणि विकासासाठी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे इत्यादी गोष्टींवर प्रकाश टाकला असून भारताला जागतिक स्तरावर प्रसंगानुसार होणारा उपयोग यांविषयी सांगितले आहे.
१४. सार्वजनिक आणि खासगी भागीदारी
‘भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये सार्वजनिक आणि खासगी या भागीदारीला महत्त्व आहे’, यावर डॉ. जयशंकर यांनी भर दिला आहे. त्यांनी व्यापार आणि नवीन उद्योजक यांचा आर्थिक संबंध वाढवण्यात असलेली भूमिका अन् नाविन्यतेला प्रोत्साहन देणे यांविषयी या पुस्तकात चर्चा केली आहे.
१५. डावपेचात्मक दृष्टीकोन आणि भविष्यातील आव्हाने
यामध्ये डॉ. जयशंकर यांनी सत्तेसाठी प्रेरक शक्ती, तंत्रज्ञानातील प्रगती आणि जागतिक प्रशासनातील पालट ही भविष्यातील आव्हाने अन् संधी यांविषयी चर्चा केली आहे. या गुंतागुंतीच्या संबंधांना योग्य दिशा देणे आणि भविष्यातील मार्ग ठरवणे यांवर त्यांनी प्रकाश टाकला आहे.
१६. भविष्यकाळाविषयीची दृष्टी
‘भविष्यातील भारताच्या भूमिकेवर होणारा परिणाम’, याविषयी दृष्टीकोन दिला आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाला महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे कोणती असावीत ? याविषयी त्यांनी रूपरेषा स्पष्ट केली आहे. यामध्ये त्यांनी डावपेचात्मक स्वायत्तता, सर्वसमावेशक विकास आणि नियमांवर आधारीत आंतरराष्ट्रीय सुव्यवस्था या सूत्रांवर प्रकाश टाकला आहे.
१७. जागतिक स्तरावर भारताच्या भूमिकेविषयी सखोल अभ्यास करण्यासाठी उपयुक्त पुस्तक
‘व्हाय भारत मॅटर्स’ या पुस्तकामध्ये जागतिक स्तरावर भारताचे महत्त्व आणि जागतिक स्तरावर त्याची प्रगत भूमिका यांविषयी सर्वसमावेशक अन् अंर्तदृष्टी निर्माण करणारे संशोधन केले आहे. डॉ. जयशंकर यांचे कौशल्य आणि सूक्ष्मस्तरावरील विश्लेषण यामुळे ज्यांना भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये असलेली गुंतागुंत अन् भूराजकीय चित्राला आकार देण्याची ज्यांची आकांक्षा आणि यामध्ये रस आहे, त्यांच्यासाठी हे पुस्तक अतिशय वाचनीय आहे. त्यांनी पारंपरिक पद्धतीने चाललेल्या परराष्ट्र धोरणाच्या पलीकडे जाण्याविषयीचे लेखन केले आहे. ‘सध्या जलदगतीने पालट होणार्या जगाच्या स्थितीमध्ये भारताची भूमिका काय असावी ? हे भारतियांनी समजून घ्यावे’, असे आवाहन केले आहे. ज्याला जागतिक स्तरावर भारताच्या भूमिकेविषयी सखोल अभ्यास करायचा असेल, त्यांनी हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे.
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.