Modi became PM again : नरेंद्र मोदी तिसर्‍यांदा पंतप्रधानपदी विराजमान !

  • सलग ३ वेळा पंतप्रधान बनणारे मोदी ठरले नेहरू यांच्यानंतरचे पहिले पंतप्रधान

  • मोदी यांच्यासह ७२ खासदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

  • शपथविधीला ७ देशांचे प्रमुख उपस्थित

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसर्‍यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतांना

नवी देहली – राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेते नरेंद्र मोदी यांनी ९ जून या दिवशी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात झालेल्या सोहळ्यात पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्या समवेत ७२ खासदारांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वांना शपथ दिली. या वेळी ७ देशांचे राष्ट्रप्रमुख, विविध देशांचे राजदूत, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, पक्षप्रमुख, आमदार, प्रतिष्ठित नागरिक आदी ८ सहस्र मान्यवर उपस्थित होते. सलग ३ वेळा पंतप्रधानपद भूषवणारे नरेंद्र मोदी हे नेहरू यांच्यानंतरचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत.

मंत्रीपदाची शपथ घेणारे खासदार !

राजनाथ सिंह, अमित शहा, मनोहर लाल खट्टर, जे.पी. नड्डा, शिवराज सिंह चौहान, सर्बानंद सोनोवाल, ज्योतिरादित्य सिंधिया, धर्मेंद्र प्रधान, डॉ. एस्. जयशंकर, किरेन रिजिजू, अनुप्रिया पटेल, एच्.डी. कुमारस्वामी, रामनाथ ठाकूर, रवनीत सिंह बिट्टू, जितीन प्रसाद, सुरेश गोपी, पंकज चौधरी, राजकुमार चौधरी, संजय सेठ, शोभा करंदलाजे, हरदीप सिंह पुरी, प्रल्हाद जोशी, गिरिराज सिंह, जयंत चौधरी, नित्यानंद राय, बी.एल्. वर्मा, अन्नपूर्णा देवी, अर्जुन राम मेघवाल, राव इंद्रजित सिंह, अजय टमटा, जीतन राम मांझी, चिराग पासवान, निर्मला सीतारामन्, जी. किशन रेड्डी, बंदी संजय आदी.

उपस्थित राष्ट्रप्रमुख !

या कार्यक्रमाला मालदीवचे राष्ट्रपती महंमद मुइज्जू, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ, सेशेल्सचे उपाध्यक्ष अहमद अफिफ (हे तिन्ही बेटांचे देश हिंद महासागरात आहेत), श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल ‘प्रचंड’, भूतानचे पंतप्रधान दाशो शेरिंग तोबगे आणि बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना या उपस्थित होत्या.

महाराष्ट्रातून ६ जणांना मंत्रीपद

नितीन गडकरी, पियूष गोयल,  रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ (सर्व भाजप) रामदास आठवले (भारिप) आणि प्रतापराव जाधव (शिवसेना)

गोव्यातून श्रीपाद नाईक !

गोव्यातून भाजपचे श्रीपाद नाईक यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्ताराच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रीपद देऊ ! – फडणवीस

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसने प्रफुल्ल पटेल यांचे नाव मंत्रीपदासाठी दिले होते. त्यांना राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार पद देण्यात आले होते; मात्र ‘पटेल यापूर्वी केंद्रात मंत्री राहिल्यामुळे राज्यमंत्री पद स्वीकारणे योग्य होणार नाही’, असे राष्ट्रवादीने सांगितले. ‘मंत्रीमंडळाच्या विस्ताराच्या वेळी दिले तरी चालेल; परंतु मंत्रीपद द्यावे’, अशी त्यांनी मागणी केली. त्यामुळे मंत्रीमंडळाच्या विस्ताराच्या वेळी त्यांना मंत्रीपद देण्यात येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.