श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. नामसाधनेच्या समवेतच स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांच्या प्रक्रियेला पुष्कळ महत्त्व आहे !

‘नामसाधना असली, तरी नामाच्या समवेत आपल्यातील स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी दिवसभरात प्रयत्न नाही केले, तर आपल्या हातून झालेल्या चुकांच्या निवारणामध्ये नामजपामुळे मिळालेली साधनेची ऊर्जा वाया जाते. असे होऊ नये; म्हणून नामसाधनेच्या समवेतच स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याच्या प्रक्रियेला पुष्कळ महत्त्व आहे. बर्‍याचदा नुसत्या नामसाधनेने प्रगती होत नाही. समाजात आपण बघतो की, अनेक नामधारक असतात; परंतु त्यांच्याकडे पाहून आपल्याला ‘अहं’ जाणवतो; कारण त्यांचे त्यांच्या स्वभावदोषांकडे लक्ष नसते. ते बर्‍याचदा लहान लहान घटनांनीही त्रस्त झालेले दिसतात. याउलट स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया नित्य राबवणार्‍या साधकाचे नामही चांगले होते आणि त्याच्याकडे पाहून आनंदही जाणवतो.’

२. आपल्या अस्तित्वाचा विसर आणि देवाच्या अस्तित्वाची जाणीव म्हणजे साधना !

‘इतरांशी बोलतांना त्यांचे होऊनच बोलायला हवे. यामुळे आपल्याला आपले अस्तित्व विसरून सेवा करण्याची सवय लागते. एकदा का अस्तित्व विसरण्याचा सराव झाला की, देवाच्या अधिक जवळ जाता येते आणि मग देहात त्याचे अस्तित्व जाणवू लागते. आपल्या अस्तित्वाचा विसर आणि देवाच्या अस्तित्वाची जाणीव म्हणजे साधना.’

३. ‘समाजसेवा ही ‘ईश्वरसेवा’ म्हणून निर्मळ आणि निरपेक्ष भावाने केली, तरच त्यातून साधना होते.’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (२४.४.२०२०)