कै. विजय डगवार यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर त्यांच्या नातेवाइकांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती
१. श्रीमती रेखा डगवार (मोठी वहिनी)
अ. ‘दादा फणसातील गोड गर्यांप्रमाणे होते. वरवर जरी कडक असले, तरी ते कोमल हृदयाचे होते.
आ. त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून माझा त्यावर विश्वास बसत नव्हता. मृत्यूनंतर त्यांच्या तोंडवळ्यावर विलक्षण तेज होते.
इ. ‘त्यांनी लावलेल्या बागेकडे बघून मला ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे…’ हा तुकाराम महाराज यांचा अभंग आठवला.
शेवटी मला ज्ञानेश्वर माऊलीच्या पुढील अभंगाची आठवण झाली.
मोगरा फुलला, मोगरा फुलला ।
फुलें वेचिता बहरु कळियांसी आला ।। १ ।।
इवलेसे रोप लावियेले द्वारी ।
तयाचा वेलू गेला गगनावरी ।। २ ।।
मनाचिये गुंती गुंफियला शेला ।
बाप रखुमादेवीवरु विठ्ठले अर्पिला ।। ३ ।।
२. सौ. प्रमिला शिंदे (विजय डगवार यांची मोठी बहीण)
अ. त्यांच्या मृतदेहाकडे बघितल्यावर ‘ते माझ्याकडे बघून हसत आहेत’, असे मला जाणवत होते.
आ. ‘ते सर्वथा तृप्त झाले आहेत’, असे मला जाणवले.
इ. मी शेगावला गजानन महाराजांच्या पोथीचे पारायण करते. तेथे जसे सात्त्विक वातावरण असते, तसेच वातावरण मला येथे अनुभवायला मिळाले. त्या वेळी मला गजानन महाराजांचे अस्तित्व जाणवले.’
३. सौ. नंदा अशोक बिहाडे (श्रीमती डगवार यांची लहान बहीण), चंद्रपूर
३ अ. वडीलधार्यांप्रमाणे प्रत्येक प्रसंगात धीर देऊन साहाय्य करणे : ‘आमचे आदरणीय मोठे भावोजी हे आम्हाला वडीलधार्यांप्रमाणे होते. ताईचे लग्न झाले. तेव्हा आम्ही पुष्कळ लहान होतो. त्यांनी आमचा पुष्कळ सांभाळ केला. माहेरची परिस्थिती इतकी काही चांगली नव्हती. ते चिडखोर होते; परंतु त्यांच्यात प्रेमभावही तेवढाच होता. मी दहावीत असतांना मी एका विषयात अनुत्तीर्ण झाले होते. तेव्हा त्यांनी मला पुष्कळ धीर दिला. त्यांनी मला वर्ध्याला नेले आणि मला सांगितले, ‘‘तुझी परीक्षा होईपर्यंत आमच्याकडे रहा.’’ त्यांनी मला चित्रकलेच्या वर्गात घातले. मी काढलेली चित्रे बघून त्यांना पुष्कळ आनंद व्हायचा.
लग्नानंतर मला पुष्कळ अडचणी होत्या. ते माझी विचारपूस करायचे आणि सांगायचे, ‘‘सगळे ठीक होईल.’’ त्यांचा धीर मला पुष्कळ काही शिकवत होता. कालांतराने खरेच माझा संसार चांगला होऊ लागला. भावोजी आमच्यासाठी छताप्रमाणे होते.
३ आ. पत्नीविषयी आदरभाव असणे : आम्ही सर्व जण एकदा एकत्र बसलो असतांना ते म्हणाले, ‘‘आता तुझी ताई (श्रीमती डगवार) संत होणार आहे. मग ती वेगळ्या गाडीत असणार आणि आपण वेगळ्या गाडीत.’’ तेव्हा मला हसायला आले. मी त्यांना म्हणाले, ‘‘हो भावोजी. तुमचे योग्य आहे.’’
३ ई. निधनानंतर
१. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मृतदेहाकडे पाहिल्यावर ते समाधानी वाटत होते.
२. माझ्या मनाला आतून दुःख होत होते; पण ‘ते किती शांत आहेत !’, असे मला वाटत होते.’
४. सौ. सोनल करोडदेव, यवतमाळ (श्रीमती डगवार यांची लहान बहीण)
अ. ‘भावोजींच्या निधनानंतर त्यांचा तोंडवळा तेजस्वी दिसत होता. जणूकाही ‘भावोजी या सर्व मायेचा त्याग करून अनंतात विलीन झाले’, असे वाटत होते.
आ. ‘या प्रसंगामध्ये ताई पुष्कळ स्थिर होती’, हे मला तिच्याकडून शिकायला मिळाले.’
५. श्री जयंत करोडदेव, यवतमाळ (लहान मेहुणे)
५ अ. ‘त्यांच्या मृतदेहाकडे पाहून ‘ते ध्यानावस्थेत आहेत’, असे वाटत होते.
५ आ. बिछान्यावर चंदेरी दैवी कण दिसणे : त्यांच्या खोलीतून अष्टगंधाचा सुगंध येत होता, तसेच त्यांच्या नेहमी झोपण्याच्या बिछान्यावर चंदेरी दैवी कण दिसले. तेव्हा मला वाटले, ‘गुरुदेवांनी त्यांना त्यांच्याजवळ घेतले आहे. प.पू. गुरुमाऊली आपली किती काळजी घेतात !’, असे मला वाटले.
इ. त्या वेळी मंदाताई, तसेच अमित आणि मयुरी हे स्थिर होते. ‘गुरूंचा सहवास आणि गुरुबळ असल्याने किती लाभ होतो !’, हे मला शिकायला मिळाले.’
वडिलांनी सर्व नातेवाईक आणि मित्र यांना अनेक वर्षांनी भ्रमणभाष करून त्यांची आपुलकीने विचारपूस करणे अन् यावरून ‘त्यांना स्वतःच्या मृत्यूची पूर्वकल्पना आली होती’, असे जाणवणे : ‘बाबांनी सर्व नातेवाईक आणि मित्र यांना अनेक वर्षांनी भ्रमणभाष केला अन् त्यांची आपुलकीने विचारपूस केली. त्यांपैकी एका मित्राने सांगितले, ‘‘या आधी विजय असा कधी बोलला नव्हता.’’ यावरून ‘बाबांना स्वतःच्या मृत्यूची पूर्वकल्पना आली होती’, असे मला जाणवले.’ – श्री. अमित डगवार (१९.६.२०२१) |
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |