सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेल्या फोंडा, गोवा येथील सनातनच्या ६२ व्या (समष्टी) संत पू. (श्रीमती) सुमन नाईक (वय ७५ वर्षे) !
कपिलेश्वरी, फोंडा (गोवा) येथे रहाणार्या सनातनच्या ६२ व्या (समष्टी) संत पू. (श्रीमती) सुमन नाईक यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती पुष्कळ शरणागत आणि कृतज्ञतेचा भाव आहे. त्यामुळे त्यांना पुष्कळ अनुभूतीही येतात. त्यांना स्वतःमध्ये जाणवलेले पालट आणि आलेल्या विविध अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. जाणवलेले पालट
१ अ. नामजपादी उपाय करतांना पूर्वी वाटत असलेला कर्तेपणा न्यून होणे आणि परम पूज्यांच्या आई-वडिलांची (पू. (सौ.) नलिनी आठवले आणि प.पू. बाळाजी आठवले यांची) आठवण होऊन त्यांचे चेहरे डोळ्यांसमोर येणे, त्यांना प्रार्थना होणे आणि मनाला चांगले वाटणे अन् अशी ही पहिलीच अनुभूती असणे : ‘पूर्वी नामजपादी उपाय करतांना माझ्या मनात कर्तेपणा असायचा. ‘उपायांचा कालावधी कधी संपतो ?’, याकडे लक्ष राहून शरिराची हालचाल व्हायची; पण आता नामजपादी उपाय करतांना परम पूज्यांच्या आई-वडिलांची (पू. (सौ.) नलिनी आठवले आणि प.पू. बाळाजी आठवले यांची) आठवण होऊन त्यांचे चेहरे डोळ्यांसमोर येतात आणि त्यांना प्रार्थना होते, ‘तुमच्या कृपेमुळेच आम्हाला हे थोर गुरु लाभले आहेत. ते आमच्याकडून साधना करून घेत आहेत’, यासाठी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’ यानंतर मी गुरुचरणी प्रार्थना करते, ‘मी तुमचा पायपोस असून तुम्ही तुमचे चरण माझ्यावर ठेवा. तुम्हीच येथे नामजप करत आहात. माझ्या माध्यमातून तुमचेच रूप साधकांना दिसू दे.’ आता उपायांना बसल्यावर आरंभापासून शेवटपर्यंत शरीर एकदम स्थिर असते आणि मी आनंदाच्या स्थितीत असते. त्यामुळे मलाही चांगले वाटते आणि ‘उपायांचा कालावधी कधी संपला’, ते कळतही नाही.
१ आ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले’, असा जयघोष करून नामजप केल्यावर त्रासाची तीव्रता अल्प होणे आणि रात्री झोपेत काही वेळा होणारा त्रास न्यून होणे
२. अनुभूती
२ अ. देवतांना प्रार्थना करतांना आलेल्या अनुभूती
२ अ १. सूर्यनारायणाविषयी आलेली अनुभूती : ‘मी सकाळी उठल्यावर नियमितपणे सूर्यनारायणाला नमस्कार करते. एक दिवस सूर्यनारायणाला नमस्कार करतांना त्याच्यावर ढग आल्यामुळे मला तो दिसत नव्हता. मी प्रार्थना करतांना तो ढगातून हळूच बाहेर आला आणि मला त्याचे दर्शन झाले. तो रथावर बसला होता. तो मला म्हणाला, ‘मीच तुमचा गुरु आहे.’ असे सांगून तो पुन्हा (ढगात) अदृश्य होत गेला.
२ अ २. कपिलेश्वराने सांगणे, ‘तुझे गुरु ३३ कोटी देवतांचे अवतार आहेत !’: माझ्या घराजवळ कपिलेश्वराचे देऊळ आहे. सूर्यनारायणाला नमस्कार केल्यावर मी कपिलेश्वराला प्रार्थना करते, ‘हे कपिलेश्वरा, माझ्या श्री गुरूंवर (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर) माझी अखंड श्रद्धा राहू दे. देवा, साधकांचे रक्षण होऊ दे.’ एक दिवस मी अशी प्रार्थना करतांना कपिलेश्वर मला म्हणाला, ‘तुझे गुरु ३३ कोटी देवतांचे अवतार आहेत.’
२ आ. शारीरिक त्रास न होण्याविषयी आलेल्या अनुभूती
२ आ १. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना करून प्रसाद-महाप्रसाद ग्रहण केल्यावर अन्न सहज पचून कुठलाही शारीरिक त्रास न होणे : मी प्रसाद-महाप्रसाद ग्रहण करायच्या आधी गुरुदेवांना प्रार्थना करते, ‘मला मिळालेला हा प्रसाद/महाप्रसाद ग्रहण करून चैतन्य मिळू दे.’ नंतर लगेच पचनशक्ती देवतेला प्रार्थना करते, ‘मी ग्रहण करत असलेले अन्न मला व्यवस्थित पचू दे.’ प्रत्येक वेळी अशा प्रार्थना केल्यामुळे आतापर्यंत मला अपचनाचा किंवा इतर कुठलाही त्रास झाला नाही.
२ आ २. गुरुकृपेमुळे आजारपण येत नसणे आणि होणार्या शारीरिक त्रासांकडे दुर्लक्ष करता येणे : वर्ष २००५ मध्ये जीवनात मी एकदाच पुष्कळ गंभीर रुग्णाईत झाले होते. तेव्हा मला नागीण झाली होती आणि मी एक मास अंथरूणावर खिळून होते; मात्र त्यानंतर मला कुठलाही त्रास झाला नाही. सध्या माझी कंबर आणि गुडघे दुखतात; मात्र ‘सतत आनंदी कसे रहाता येईल ?’, याकडे अधिक लक्ष जात असल्यामुळे माझ्याकडून या शारीरिक त्रासांकडे दुर्लक्ष होते. ‘हे सर्व गुरुकृपेमुळे शक्य होत आहे’, असे वाटून माझ्याकडून गुरुचरणी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त होते.
२ इ. कौलारू घराविषयी आलेल्या अनुभूती
२ इ १. घर कौलारू असल्यामुळे पावसाळ्यात घरात सगळीकडे पाणी गळणे; मात्र प्रार्थना केल्यावर स्वतः झोपण्याच्या स्थानी पाणी न गळणे : आमचे घर कौलारू असल्यामुळे पाऊस आल्यावर घरात सगळीकडे पाणी गळते. घरात फिरायलाही अडचणीचे होते. मी झोपते, तिथेही पाणी गळते. वानरे कौलांवर उड्या मारतात, त्यामुळे कौले फुटतात. मी गुरुदेव आणि वानरे यांना प्रार्थना केल्यावर आता मी जिथे झोपते, तिथे वानरे येत नाहीत. त्यामुळे माझ्या झोपण्याच्या ठिकाणी पाणी गळत नाही; पण घरात इतर सर्व ठिकाणी पाणी गळते. तेव्हा माझ्याकडून गुरुदेव आणि वानरे यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.
२ इ २. श्री गणेशचतुर्थीच्या वेळी प्रार्थना करून पाणी गळत असलेल्या ठिकाणी काठी लावल्यावर पाणी न गळणे, त्यामुळे श्री गणेशचतुर्थी आनंदाने साजरी करता येणे : श्री गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवशी घरात आम्ही जिथे गणपतीची स्थापना करून पूजन करतो, तिथेच पाणी गळत होते. मी गणपति आणि गुरुदेव यांना प्रार्थना करून गणपति बसवतो, त्याच्या वरच्या कौलांना काठी लावली. त्यानंतर पाणी गळायचे थांबले. त्यामुळे श्री गणेशचतुर्थी आनंदात पार पाडली.
२ ई. समाजातील लोकांना आलेल्या अनुभूती
२ ई १. दुकानदारांना स्वतःविषयी आलेल्या अनुभूतींमुळे त्यांनी अल्प मूल्यात साहित्य देणे : मी दुकानात कधी काही साहित्य आणायला जाते, तेव्हा ते दुकानदार मला अल्प मूल्यात साहित्य देतात. त्याविषयी ते दुकानदार मला म्हणतात, ‘‘तुम्ही येऊन गेल्यावर त्या दिवशी माझ्या दुकानात पुष्कळ ग्राहक येऊन विक्री वाढते.’’ ते ऐकून माझी काहीच पात्रता नसतांना गुरुदेव माझ्या माध्यमातून त्यांना चांगल्या अनुभूती देतात’, या विचाराने माझी पुष्कळ भावजागृती होते आणि गुरुचरणी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त होते.
२ ई २. घरगुती तूप विकणार्या बाईचा संतांप्रति भाव ! : एक तूपवाली (घरोघरी फिरून घरगुती तूप विकणारी) बाई घरी येऊन मला थोडेतरी तूप घ्यायला सांगते. मी ‘नको’ म्हणाल्यावरही ती मला तूप देऊन जाते आणि त्याचे अल्प मूल्य घेते. याविषयी तिला विचारल्यावर ती म्हणते, ‘‘तुम्ही देवी आहात. देवीच्या रूपात तुम्ही मला आशीर्वाद देता.’’ गावात तूप विकून झाल्यावर परत जातांना ती मला भेटून सांगते, ‘‘तुमच्यामुळे आज माझ्या सगळ्या तुपाची विक्री झाली.’’ तिचे असे बोलणे ऐकून गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता व्यक्त होते. मी मनात गुरुदेवांना म्हणते, ‘गुरुदेवा, माझी काहीच पात्रता नसतांना तुम्ही हे सर्व करून घेऊन स्वतः मात्र नामानिराळे रहाता.’
२ उ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी आलेली अनुभूती
२ उ १. स्वतःच्या माध्यमातून सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवच साधकांना मार्गदर्शन करत असल्याविषयी आलेली अनुभूती : कधी प्रसारातील साधक मला त्यांच्या अडचणी भ्रमणभाषवर सांगतात, तेव्हा ‘ते काय सांगतात ?’, ते मला समजत नाही. मी गुरुदेवांना प्रार्थना करते, ‘तुम्हीच माझ्या वाणीमध्ये बसा आणि साधकांना काय सांगायचे, ते माझ्याकडून वदवून घ्या.’ अशी प्रार्थना करून साधकाशी बोलल्यावर त्या साधकाचा दुसर्या दिवशी मला भ्रमणभाष येतो, ‘‘तुम्ही केलेल्या मार्गदर्शनाचा मला पुष्कळ लाभ झाला. माझे मन एकदम हलके झाले.’’ हे ऐकून माझ्याकडून गुरुदेवांप्रति पुष्कळ कृतज्ञता व्यक्त होते.’
– (पू.) श्रीमती सुमन नाईक, फोंडा (गोवा) (२६.१.२०२४)
|