पुणे येथील अग्रवाल पिता-पुत्रांची छोटा राजन याच्या नावाने जिवे मारण्याची धमकी
|
पुणे – कल्याणीनगर ‘पोर्शे’ कार अपघातातील अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार आणि वडील विशाल अग्रवाल यांनी ‘तुला आणि तुझ्या कुटुंबियांना जगायचे आहे का ? जेवढे पैसे दिले आहेत, त्यावर समाधान मान. अन्यथा खंडणीचा गुन्हा नोंद करून तुला कारागृहात पाठवू, अशी धमकी दिली होती’, अशी तक्रार कोंढवा येथील मुश्ताक मोमीन यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात केली होती. त्यांनी पुढे नमूद केले की, अग्रवाल यांनी छोटा राजन याच्या नावाने जिवे मारण्याची धमकी देऊन १ कोटी ३२ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. एका भूमीच्या व्यवहारात ही फसवणूक केली आहे.
मुश्ताक मोमीन यांची ‘एम्. एम्. असोसिएट्स आणि वास्तू प्रॉपर्टीज’ असा व्यवसाय आहे. कोंढवा येथील ‘ब्रह्मा काऊंटी सोसायटी’च्या परिसरामध्ये असलेल्या भूमीवरून तेथील निवृत्ती कोपरे यांच्याशी वाद झाला होता. या प्रकरणी मोमीन यांनी मध्यस्थी करावी, म्हणून सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि जसप्रीतसिंग राजपाल यांनी जुलै २०१९ मध्ये भेट घेतली. मध्यस्थी यशस्वी झाल्यानंतर १ कोटी ३२ लाख रुपये देण्याचा उभयतांमध्ये करार झाला होता. त्यापोटी १८ लाख रुपये आगाऊ दिले होते. त्यानुसार मोमीन यांनी वादग्रस्त भूमीचा कायदेशीर हक्क अग्रवाल यांना मिळवून दिला होता. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर उर्वरित रकमेची मोमीन यांनी मागणी केली. तेव्हा आरोपींनी मोमीन यांना लष्कर भागातील महात्मा गांधी रस्त्यावरील कार्यालयामध्ये बोलावून धमकी दिली. या प्रकरणी मोमीन यांनी लष्कर न्यायालयामध्ये खासगी तक्रार प्रविष्ट केली. तेव्हा त्यांना पुन्हा धमकावण्यात आले. ३ मार्च २०२१ या दिवशी मुंबई उच्च न्यायालयामध्ये मोमीन आणि अग्रवाल यांची भेट झाली, तेव्हा ‘छोटा राजनशी आमचे थेट संबंध आहेत. अजय भोसलेवर गोळीबार झाल्याची घटना माहीत आहे ना ? तो वाचला, तू वाचणार नाहीस’, अशी धमकी दिल्याचे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
‘ससून’मधील शिपायाला ३ लाख रुपये दिले
‘ससून रुग्णालया’तील शिपाई अतुल घटकांबळे याला अशफाक मकानदार याने येरवडा येथील ‘बाल न्याय मंडळा’च्या आवारामध्ये ३ लाख रुपये दिल्याची माहिती अन्वेषणातून उघडकीस आली आहे. डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरि हळनोर यांच्या सांगण्यावरून त्याने पैसे स्वीकारले असून, त्याचे सी.सी.टी.व्ही. चित्रीकरण पोलिसांना मिळाले आहे.
रक्ताचा नमुना पालटण्याचा सल्ला
अपघातातील अल्पवयीन मुलाच्या ऐवजी आईचे रक्त पडताळणीसाठी देण्याचा सल्ला अशपाक आणि डॉ. तावरे यांनी दिल्याचे अन्वेषणातून समोर आले, तसेच मुलाचे वडील विशाल यांची मकानदार याने एका कॅफेमध्ये भेट घेतली. तुमच्यावर कारवाई होईल, अशी चेतावणी दिल्यानंतर मुलाचे वडील विशाल अग्रवाल छत्रपती संभाजीनगर येथे पसार झाले होते.
आणखी १४ दिवसांची पोलीस कोठडी
‘ससून रुग्णालया’तील अधिष्ठाता डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरि हळनोर, शिपाई अतुल घटकांबळे यांची कोठडीची समयमर्यादा संपत असल्याने ७ जून या दिवशी न्यायालयासमोर उपस्थित केले. तेव्हा न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आता या ३ जणांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा ७ आणि १३ यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.
‘एम्.पी. जी. क्लब’वर कारवाई !
अग्रवाल कुटुंबियांचे महाबळेश्वर (जिल्हा सातारा) येथील ‘एम्.पी.जी. क्लब’मध्ये विनापरवाना बांधकाम आणि बार असल्याचे निष्पन्न झाले होते. यापूर्वी हा क्लब मोहोरबंद (सील) करण्यात आला होता. आता त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ‘राज्य उत्पादन शुल्क विभागा’ने ८ जून या दिवशी कारवाई केली. क्लबमध्ये विनापरवाना बांधलेल्या १२ खोल्या भुईसपाट करण्यात आल्या.