विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांसह १० जूनला ‘मनुस्मृति’ दहनाला विरोध करणार ! – अजयसिंह सेंगर, प्रमुख, महाराष्ट्र करणी सेना

श्री. अजय सिंह सेंगर, महाराष्ट्र करणी सेना, प्रमुख

मुंबई – आनंदराज आंबेडकर यांनी १० जून या दिवशी महाड येथे आयोजित केलेल्या मनुस्मृति दहनाला आमचा विरोध आहे. विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांसह मनुस्मृति दहनाला विरोध करू, अशी चेतावणी ‘महाराष्ट्र करणी सेने’चे प्रमुख श्री. अजयसिंह सेंगर यांनी दिली आहे.

याविषयी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये अजयसिंह सेंगर यांनी म्हटले आहे की,

मनुस्मृति दहन हा राज्यघटनेचा अवमान होय. राज्यघटनेमध्ये कोणत्याही धार्मिक ग्रंथाचा अवमान किंवा त्याचे दहन करण्यासाठी अनुमती देण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाने मनुस्मृति दहनाचा कार्यक्रम होऊ नये, यासाठी प्रशासनाने संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. मनुस्मृति हा हिंदूंचा प्राचीन धर्मग्रंथ आहे. मनुस्मृतीमध्ये विषमता असल्याचा आरोप केला जातो. तो सहस्रावधी वर्षांपूर्वी लिहिलेला ग्रंथ आहे. सद्य:स्थितीत देशात प्रत्येक जाती-धर्मा करता वेगवेगळे कायदे आहेत. ही विषमता नष्ट करण्याचा प्रयत्न मनुस्मृतीला विरोध करणारे का नाही करत ? कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया हिंदु स्त्री-पुरुषांनी केल्या. कुराणाची ढाल पुढे करून मुसलमानांनी मात्र कुटुंब नियोजनाला स्पष्टपणे नकार दिला, ही विषमता दिसत नाही ? हिंदूंना घटस्फोट घेण्यासाठी कायद्याची अनेक बंधने लादण्यात आली. यासह घटस्फोटित पत्नीला तिच्या उदरनिर्वाहासाठी योग्य ती पोटगी (रक्कम) देणे, हे हिंदूंसाठी बंधनकारक करण्यात आले; पण मुसलमान समाजावर पती-पत्नीच्या घटस्फोटासाठी कोणतेच कायदेशीर बंधन घालण्यात आलेले नाही. हिंदूंप्रमाणे घटस्फोटित पत्नीला पोटगी देणे बंधनकारक आहे; मात्र मुसलमानांना बंधनकारक नाही. मनुस्मृतीला विरोध करणार्‍यांना ही विषमता का दिसत नाही ?

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार नाहीत, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी !

मनुस्मृतीचे उपयुक्त श्लोक आजही न्यायालयांच्या निकालपत्रामध्ये नमूद असतात. अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचे नमूद केलेले श्लोक विद्यार्थ्यावरील संस्कारांकरता अतिशय योग्य आहेत. या श्लोकामध्ये चुकीचे लिहिले असेल, तर मनुस्मृतीच्या विरोधकांनी न्यायालयात जाऊन याचिका करावी. हिंदूच्या धार्मिक भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, असे अजयसिंह सेंगर यांनी म्हटले आहे.