सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने मिळालेल्या ‘दैवी प्रचीती’ आणि त्यामागील शास्त्र !

१. रामनाथी आश्रमातील कमलपिठात दोन कमळे विशिष्ट दिशेने उमलणे

१ अ. दैवी प्रचीती : २७.५.२०२४ या दिवशी रामनाथी आश्रमातील कमलपिठात दोन कमळे उमलली.

१ आ. वैशिष्ट्य : कमलपिठात उमललेले कमळ एरव्ही उमलणार्‍या कमळांच्या तुलनेत अधिक मोठे आणि सुंदर होते. एका कमळाचे तोंड रामनाथी आश्रमाच्या दिशेने, तर दुसर्‍या कमळाचे तोंड बाहेरच्या दिशेने होते.

१ इ. सूक्ष्मातील शास्त्र : कमलपिठात उमललेल्या कमळाकडे पाहिल्यावर भगवान विष्णूच्या कमलनयनांची (कमळांसारखे असलेले नयन) आठवण होते. एका कमळाचे तोंड रामनाथी आश्रमाकडे आणि दुसर्‍या कमळाचे तोंड बाहेरच्या दिशेने असणे, याचे दोन भावार्थ आहेत.

१. ‘कमळ हे विष्णुस्वरूप गुरुदेवांची कृपादृष्टी सनातनच्या विविध आश्रमांत राहून साधना करणार्‍या, तसेच आश्रमाच्या बाहेर, म्हणजे संसारात राहून साधना करणार्‍या साधकांवरही आहे’, याचे हे प्रतीक आहे.

२. कमलपिठात उमललेल्या कमळरूपी चैतन्याचा स्रोत तळमळीने साधना करणार्‍या साधकांकडे प्रक्षेपित होत आहे. काही साधक सनातनच्या आश्रमात राहून साधना करतात. यामुळे एका कमळाचे तोंड आश्रमाच्या दिशेने आहे. काही साधक संसारात राहून तळमळीने साधना करतात. यामुळे दुसर्‍या कमळाचे तोंड आश्रमाच्या बाहेरच्या दिशेने आहे.

२. साधक रहात असलेल्या नागेशी परिसरात सोनचाफ्याचे फूल उमलणे

२ अ. दैवी प्रचीती : २७.५.२०२४ या दिवशी साधक रहात असलेल्या नागेशी परिसरात सोनचाफ्याचे फूल उमलले.

२ आ. वैशिष्ट्य : साधक रहात असलेल्या नागेशी परिसरात मागच्या वर्षी म्हणजे ब्रह्मोत्सवाच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या) कालावधीत लावलेल्या सोनचाफ्याच्या लहान झाडावर फूल उमलले. अभ्यासकांच्या मते एवढ्या लहान झाडावर सहसा फूल उमलत नाही. याच परिसरात ३ – ४ वर्षे जुने असलेले एक सोनचाफ्याचे झाड आहे; मात्र आतापर्यंत त्याच्यावर एकदाही फूल उमललेले नाही. एक वर्षाच्या लहान झाडावर फूल उमलणे, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.

२ इ. सूक्ष्मातील शास्त्र : साधक रहात असलेल्या नागेशी परिसरात उमललेल्या सोनचाफ्याच्या पिवळ्या फुलाकडे पाहून भगवान श्रीविष्णूच्या ‘पितांबरधारी रूपाची (पिवळे वस्त्र धारण केलेल्या रूपाची)’ आठवण होते. श्रीविष्णु योगनिद्रेत असतांना अंतर्दृष्टीने सूक्ष्म जगताचे संचालन करतो. त्या वेळी त्याच्याभोवती पिवळ्या रंगाची सूक्ष्म प्रभावळ असते. हे पुष्प त्याचे, म्हणजे चैतन्याचे प्रतीक आहे.

३. २७ ते ३०.५.२०२४ या कालावधीत अनेक साधकांच्या घरी पुष्पे उमलणे

३ अ. दैवी प्रचीती : २७ ते ३०.५.२०२४ या कालावधीत अनेक साधकांच्या घरी झाडांवर वेगवेगळी पुष्पे उमलली.

३ आ. वैशिष्ट्य : फूल उमलण्यासाठी लागणार्‍या ठराविक वेळेपूर्वी किंवा ठराविक वेळेनंतर फूल उमलले, म्हणजे जणू फूल उमलण्यासाठी त्या विशिष्ट वेळेची वाट पहाट होते.

३ इ. सूक्ष्मातील शास्त्र : विविध पुराणांत सांगितल्याप्रमाणे आणि पुराणांवर आधारित दाखवण्यात येणार्‍या दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमध्ये दाखवले जाते की, अवताराचा भूतलावर जन्म होताच फूल उमलते, थंडगार वारा वाहू लागतो इत्यादी. याचे कारण असे की, ज्या ज्या वेळी भूमीवर अवतारांचे प्रगटीकरण होते, त्या त्या वेळी भूतलावरील सात्त्विकतेत काळानुसार लक्षणीय वाढ होते. सात्त्विकतेत झालेल्या वृद्धीमुळे प्रकृतीत सकारात्मक पालट होऊन फुले उमलणे इत्यादी घटना घडतात.

२७ ते ३०.५.२०२४ या कालावधीत साजर्‍या होत असलेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवामुळे वायूमंडलातील सात्त्विकतेत वाढ झाल्याने आणि साधकांमधील भावामुळे अनेक ठिकाणी फुले उमलली. यांतून ‘प्रकृतीही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाचा आनंद साजरा करत आहे’, अशा अनुभूती साधकांना आल्या.

४. नवचंडी यागाच्या कालावधीत यज्ञस्थळी फुलपाखरू आकृष्ट होणे

४ अ. दैवी प्रचीती : २८ ते ३०.५.२०२४ या कालावधीत सनातनच्या रामनाथी आश्रमात करण्यात आलेल्या नवचंडी यागाच्या तिन्ही दिवशी यज्ञ होतांना यज्ञस्थळी फुलपाखरू निरंतर येत होते.

४ आ. वैशिष्ट्य : अन्य दिवशी फुलपाखरू त्या परिसरात येत नाही. यज्ञ चालू असतांना फुलपाखरू एका ठिकाणी शांतपणे बसलेले असे, तर यज्ञाच्या वेळी मध्ये काही वेळ विश्राम असतांना ते फुलपाखरू यज्ञस्थळाच्या भोवती उडत असे; मात्र ते बाहेर जात नव्हते.

४ इ. सूक्ष्मातील शास्त्र : ज्या वेळी साधनेमुळे भूलोकातील एखादा भाग पुष्कळ सात्त्विक होऊन तेथे उच्च लोकांसारखे (महर्लाेक, जनलोक, तपलोक यांप्रमाणे) वातावरण निर्माण होते, त्या वेळी वाढलेल्या सात्त्विकतेमुळे तिकडे फुलपाखरे आकृष्ट होतात. यज्ञस्थळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती होती. त्या समष्टी गुरु असून त्यांची आध्यात्मिक पातळी उच्च आहे. संतांमधून प्रक्षेपित होत असलेल्या सात्त्विकतेमुळे फुलपाखरू यज्ञस्थळाकडे आकृष्ट झाले.

५. रामनाथी आश्रमात नवचंडी याग होत असतांना आश्रमाच्या मुख्य द्वारासमोर गायी बसणे

५ अ. दैवी प्रचीती : नवचंडी यागाच्या पहिल्या दिवशी, म्हणजे २८.५.२०२४ या दिवशी यागाला आरंभ होताच दोन गायी रामनाथी आश्रमाच्या मुख्य द्वाराच्या उजव्या बाजूला पुष्कळ वेळ बसल्या होत्या.

५ आ. वैशिष्ट्य : अनेक साधक रामनाथी आश्रमाच्या मुख्य द्वाराजवळ सेवा करत असतात. अन्य दिवशी त्या कालावधीत एकही गाय बसलेली दिसत नाही; मात्र नवचंडी यागाला आरंभ होताच एक गाय पुष्कळ वेळ मुख्य द्वाराजवळ बसली, हे वैशिष्ट्यपूर्ण होते.

५ इ. सूक्ष्मातील शास्त्र : गाय सात्त्विक प्राणी असून तिच्यात ३३ कोटी देवतांचे तत्त्व आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्याची क्षमता असते. यामुळे हिंदु धर्मात गायीला आदराचे स्थान आहे. गायीत अत्याधिक सात्त्विकता असल्याने तिच्या गोठ्यातही निर्गुण तत्त्व जाणवते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त केल्या जाणार्‍या यज्ञातूनही निर्गुण तत्त्व प्रक्षेपित होत होते. या निर्गुण तत्त्वाचे प्रक्षेपण आश्रमाच्या बाहेरपर्यंत होत होते. या निर्गुण तत्त्वाने आकृष्ट होऊन दोन गायी आश्रमाच्या मुख्य द्वाराच्या बाजूला बसल्या. थोडक्यात गायींचे या प्रकारे बसणे, हा एक शुभ संकेत आहे आणि सात्त्विकता ग्रहण अन् प्रक्षेपित होण्याचे प्रतीक आहे.

६. यज्ञातील चैतन्यामुळे देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील स्वयंपाकघरातील देवघरात ठेवलेल्या अन्नपूर्णादेवीला वाहिलेले फूल ईशान्य दिशेला सरकणे

६ अ. दैवी प्रचीती : २७.५.२०२४ या दिवशी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील स्वयंपाकघरातील देवघरात ठेवलेल्या अन्नपूर्णादेवीच्या मूर्तीच्या मधोमध झेंडूचे फूल वाहिले होते. देवीला वाहिलेले झेंडूचे फूल यज्ञानंतर ईशान्य दिशेकडे सरकलेले दिसले.

६ आ. वैशिष्ट्य : देवघरात वाहिलेली अन्य फुले तशीच होती. वार्‍यामुळे फूल हलले, असे समजले, तरी एकच फूल हलून अन्य फुले हलली नाहीत, असे होऊ शकत नाही.

६ इ. सूक्ष्मातील शास्त्र : वास्तूशास्त्रानुसार ईशान्य दिशा ही देवत्वाची दिशा गणली जाते. रामनाथी आश्रमात समष्टीसाठी होत असलेल्या नवचंडी यागातील सात्त्विकता देवद आश्रमातही निर्माण झाली. ही सात्त्विकता अन्य दिशांच्या तुलनेत ईशान्य दिशेकडे अधिक होती.

फुले दूरचित्रवाणीच्या ‘अँटिना’प्रमाणे ब्रह्मांडातील चैतन्य मूर्तीत आकृष्ट करणारी माध्यम असतात. देवद आश्रमातील ईशान्य दिशेला असलेल्या सात्त्विकतेत वाढ झाल्यामुळे ती सात्त्विकता ग्रहण करण्यासाठी फूल त्या दिशेला फिरले. ही वायूतत्त्वाशी निगडित अनुभूती आहे. यांतून स्थुलातून यज्ञ रामनाथी आश्रमात होत असला, तरीही त्याचा परिणाम साधना करणार्‍या सर्वत्रच्या समष्टीवर होत असल्याचे हे प्रतीक आहे.

७. कृतज्ञता

ज्या प्रकारे विजेची क्षमता वॉट (Watt) मध्ये मोजू शकतो, पाणी लिटरमध्ये मोजू शकतो, त्या प्रकारे अनुभूती हे अध्यात्मशास्त्राची परिणामकारकता मोजण्याचे एकक आहे. ‘या स्थूल आणि सूक्ष्म स्तरांवर आलेल्या विविध अनुभतींतून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व अन् दिव्य अस्तित्व यांची अनुभूती सर्वत्रच्या साधकांना घेता आली’, त्याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता !’

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.५.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक