सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना सहजरित्या स्थूल आणि सूक्ष्म स्तरावर दिलेली शिकवण !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य हाती घेतले; पण त्याआधी त्यांनी सेवाकेंद्रे आणि आश्रम येथे हिंदु राष्ट्र आणण्यापासून प्रारंभ केला. नीटनेटकेपणा, काटकसर आदी व्यष्टी गुण आणि अमर्याद समष्टी गुण असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी प्रत्येक कार्य आधी स्वतः करून मग ते साधकांना शिकवले. त्याचप्रमाणे साधकांमध्ये प्रीती, कुटुंबभावना आणि व्यापकता निर्माण होण्यासाठी कसे प्रयत्न केले, ते या लेखातून काही उदाहरणांद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आश्रमातील साधकांमध्ये कुटुंबभावना निर्माण करणे
श्रीमती पेठेआजी (आताच्या प.पू. पेठेआजी) यांच्या ७५
व्या वाढदिवसानिमित्त त्यांना पत्ररूपाने शुभेच्छा देतांना प.पू. डॉ. आठवले
१ अ. घर-दार सोडून पूर्णवेळ साधना करणार्या साधकांचा वाढदिवस कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे साजरा करायला सांगून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांच्या मनात कुटुंबभावना निर्माण करणे : ‘३१.३.१९९८ या दिवशी अनुराधाताईंचा (आताच्या सद्गुरु अनुराधा वाडेकर यांचा) वाढदिवस होता. त्या आणि कु. श्रुती शेलार (आताच्या सौ. जान्हवी शिंदे) या दोघी दैनिक ‘सनातन प्रभात’ मधील बोधचित्रे सिद्ध करत असत. अनुराधाताई तेव्हा प्रथमच गोव्यात आल्या असल्या, तरी काही साधकांना त्यांचा दिनांकानुसार वाढदिवस ठाऊक होता. त्यामुळे सर्व साधकांनी मिळून त्यांचा वाढदिवस साजरा केला. तेव्हा दैनिक ‘सनातन प्रभात’चे कार्यालय कै. प्रभाकर (भाई) वेरेकर आणि कै. डॉ. (सौ.) मंगला वेरेकर (वर्ष २०२३ ची दोघांची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांच्या निवासस्थानी होते. त्यामुळे त्यांनीही यात पुढाकार घेतला होता. गोव्यामधे साधकांच्या वतीने साजरा केलेला तो पहिलाच वाढदिवस होता. त्यानंतर लगेच २ मासांनी कु. कविता राठिवडेकर (वर्ष २०२३ ची आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) यांचा वाढदिवस होता; पण तेव्हा ‘कविताताईंचा वाढदिवस कुठल्या दिवशी आहे ?’, हे कुणालाच ठाऊक नव्हते; मात्र ज्या दिवशी कविताताईंचा वाढदिवस होता, त्याच दिवशी, म्हणजे २८.५.१९९८ या दिवशी प.पू. डॉक्टरांना ते कळले. त्यांनी लगेच उत्तरदायी साधकांना कळवले. तेव्हा प.पू. डॉक्टर आम्हाला म्हणाले, ‘‘साधक घर-दार सोडून येऊन पूर्णवेळ साधना करतात. त्यामुळे सर्व साधकांनी एका कुटुंबाप्रमाणे रहायला हवे. आपणच साधकांचा वाढदिवस साजरा करायला हवा.’’ त्यानंतर आम्ही कविताताईंचे औक्षण करून त्यांचा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर सर्व साधकांच्या वाढदिवसाची सूची बनवली गेली आणि त्या त्या दिवशी त्या त्या साधकांना औक्षण करून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येऊ लागला.
कविताताई तेव्हा प.पू. डॉक्टरांच्या खोलीच्या स्वच्छतेची सेवा करत असत. मला दैनिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा करणार्या साधकांप्रती जेवढा आपलेपणा वाटायचा, तेवढा आपलेपणा मला स्वयंपाक किंवा स्वच्छतेशी संबंधित सेवा करणार्या साधकांविषयी वाटत नसे. या प्रसंगातून प.पू. डॉक्टरांनी मला ‘साधना करणार्या प्रत्येकाविषयी प्रेमभाव वाटायला हवा’, हे शिकवले.
१ आ. ‘साधकाच्या शर्टची तुटलेली बटणे लावून दिली नाही’, ही चूक सत्संगात सांगून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांच्या मनात इतर साधकांप्रती आत्मीयता निर्माण करणे : वर्ष २००१ मध्ये सनातन संस्थेचे कार्य ‘सुखसागर’, फोंडा येथे चालू झाले. तिथे काही बांधकाम करायचे होते. प.पू. डॉक्टरांनी सर्व साधकांना बांधकामाच्या संदर्भातील सर्व सेवा शिकून घ्यायला सांगितल्या होत्या. स्वतः प.पू. डॉक्टरही या सेवा शिकायला येत असत. त्यांनी चिरे तासण्यापासून सर्व कामे स्वतः करून पाहिली. ते सकाळच्या वेळी बांधकामाच्या सेवेतील साधकांना साहाय्य करायचे. बांधकामाची सेवा करायला सिंधुदुर्ग येथून काही साधक आले होते. त्यांपैकी एक साधक साधारण ४० ते ४५ वर्षे वयोगटातील होते. त्यांच्या शर्टची २ बटणे तुटली होती, तरी ते साधक तो शर्ट तसाच घालत होते. प.पू. डॉक्टर आठवड्यातून एकदा सकाळी ९.३० ते ११.०० या वेळेत सत्संग घेत असत. एका सत्संगात प.पू. डॉक्टर आम्हा सर्व साधकांना म्हणाले, ‘‘या साधकाच्या शर्टची बटणे तुटली आहेत’, हे सर्व साधकांना दिसत असूनही कुणीही त्यांच्या शर्टला बटणे लावून दिली नाहीत. या वयात त्यांनी ते काम स्वतःच करायचे का ? हे कुणाच्या लक्षात कसे येत नाही ? आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या शर्टची बटणे तुटली असती, तर आपण तिला तो शर्ट तसाच घालू दिला असता का ?’’
या प्रसंगातून प.पू. डॉक्टरांनी ‘आम्ही सर्व साधक एकाच कुटुंबातील असून एकमेकांना आत्मीयतेने साहाय्य करायला हवे’, हे आम्हाला शिकवले.
फोंडा, गोवा येथील सुखसागर आश्रमात साधकांसह
बांधकामाची सेवा करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले (११.१०.२०००)
१ इ. ‘अंगात ताप असलेल्या साधकाला बसने घरी जाऊ दिले’, ही चूक दाखवून देऊन परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांप्रती कुटुंबभावना जोपासण्यास शिकवणे : ‘सुखसागर’, येथे असतांना सर्व साधकांसाठी आश्रमजीवन नवीनच होते. काही वेळा साधकांना ताप आला किंवा त्यांना बरे वाटत नसेल, तर ते साधक घरी जायचे. ‘आपली काळजी घेण्यासाठी साधकांना त्यांच्या सेवेतील वेळ द्यायला नको’, असा त्यांचा विचार असायचा. एकदा बांधकामाशी संबंधित सेवा करणार्या एका वयस्कर साधकांना ताप आला होता. त्यामुळे ते उत्तरदायी साधकांना सांगून घरी गेले. त्यांचे घर बसने १ ते १.३० घंट्याच्या अंतरावर होते. हे प.पू. डॉक्टरांना कळल्यावर त्यांनी उत्तरदायी साधकांना त्यांची चूक सांगितली. ते म्हणाले, ‘‘अंगात ताप असलेल्या वयस्कर साधकांना तुम्ही बसने जाऊ कसे दिले ? घरातील वडीलधार्या माणसांना अंगात ताप असतांना आपण असे बाहेर पाठवतो का ? त्या साधकांना घरी जायचेच होते, तर त्यांच्या समवेत एका साधकाला तरी पाठवायचे होते किंवा आपल्या गाडीने त्यांना घरी सोडायला हवे होते.’’
साधकांकडून होणार्या अशा प्रकारच्या चुका पुनःपुन्हा सांगून प.पू. डॉक्टरांनी साधकांच्या मनात साधकांविषयी कुटुंबभावना निर्माण केली.’
– सौ. विजयलक्ष्मी आमाती, फोंडा, गोवा. (२५.५.२०२४)
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची सतर्कता आणि सहजावस्था !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची सहजावस्था : एका साधकाची नवीन
दुचाकी चालवून पहातांना परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (मुंबई, वर्ष १९९७)
२ अ. पावसाळ्यात आगाशीत वाळत घातलेल्या कपड्यांकडे सतर्कतेने लक्ष देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले ! : वर्ष १९९८ मध्ये दैनिक ‘सनातन प्रभात’चे कार्यालय दोनापावला येथील (कै.) प्रभाकर (भाई) वेरेकर आणि कै. डॉ. (सौ.) मंगला वेरेकर (वर्ष २०२३ ची दोघांची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांच्या निवासस्थानी होते. तिथे प.पू. डॉक्टरांची खोली वरच्या माळ्यावर होती आणि त्यांच्या खोलीजवळच आगाशी (गच्ची) होती. प.पू. डॉक्टर आणि डॉ. (सौ.) कुंदाताई यांच्यासह सर्व साधक त्यांचे कपडे आगाशीत वाळत घालत असत. गोव्यात पाऊस हा क्षणात येतो आणि लगेच थांबून ऊनही पडते. अशा पावसाची सवय नसल्यामुळे कपडे वाळत घालणार्या साधकांच्या ते लक्षात यायचे नाही. आगाशीजवळच कु. अनुराधा वाडेकर (आताच्या सद्गुरु अनुराधा वाडेकर), कु. श्रुती शेलार (आताच्या सौ. जान्हवी शिंदे) आणि अन्य २ – ३ साधक सेवा करत असत. पाऊस आल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर ते साधक आगाशीतील वाळत घातलेले कपडे काढण्यासाठी धावत जायचे; परंतु त्यापूर्वीच प.पू. डॉक्टरांनी वाळत घातलेले कपडे काढलेले असायचे. काही वेळानंतर ऊन पडले असल्याचे साधकांच्या लक्षात आल्यावर ते साधक पुन्हा कपडे वाळत घालण्यासाठी आगाशीत जाईपर्यंत ‘प.पू. डॉक्टरांनी ते कपडे वाळत घातलेले असायचे.
२ आ. पावसाळ्यात कपडे वाळत घालतांना ‘दोरीच्या पलीकडील कपड्याचा भाग मोठा, तर अलीकडील भाग लहान ठेवल्याने पावसाळ्यात कपडे लवकर वाळतात’, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शिकवणे : एकदा एक साधिका आगाशीत कपडे वाळत घालत हाेती. ती कपडे वाळत घालतांना कपड्यांची दोन्ही टोके जुळवून व्यवस्थित वाळत घालत होती. तेव्हा प.पू. डॉक्टर आगाशीत आले आणि त्या साधिकेला म्हणाले, ‘‘इतर वेळी कपडे वाळत घालतांना त्यांची टोके नीट जुळवून घातले पाहिजेत; परंतु पावसाळ्यात कपडे लवकर वाळत नाहीत. त्यामुळे दोरीच्या पलीकडील कपड्याचा भाग मोठा ठेवायचा आणि दोरीच्या अलीकडील भाग जरा लहान ठेवायचा. त्यामुळे वार्याने कपड्यांची हालचाल होऊन कपडे लवकर वाळतील.’’
वरील दोन्ही प्रसंगांतून प.पू. डॉक्टरांची सतर्कता आणि सहजावस्था प्रकर्षाने जाणवते.’
– सौ. विजयलक्ष्मी आमाती, फोंडा, गोवा. (२५.५.२०२४)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |