सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८२ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पार पडला नवचंडीयाग !
रामनाथी (गोवा) – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८२ वा जन्मोत्सव २७ मे ते ३० मे या कालावधीत येथील सनातन संस्थेच्या आश्रमात भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने २८ ते ३० मे या कालावधीत आश्रमात ‘नवचंडीयागा’चे आयोजन करण्यात आले होते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, तसेच सनातनचे संत यांच्या वंदनीय उपस्थितीत हा याग करण्यात आला.
सनातनच्या पुरोहित पाठशाळेतील पुरोहितांनी या यागात दशद्रव्य मिश्रित पायस आदी द्रव्यांनी हवन केले. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा महामृत्युयोग टळून त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य मिळावे, तसेच साधकांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवरील त्रास दूर व्हावेत अन् लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, या उद्देशांच्या पूर्तीसाठी दैवी वातावरणात हा याग करण्यात आला. या वेळी सनातनचे साधक सर्वश्री विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) आणि राम होनप यांनी यागाच्या संदर्भात भावपूर्ण रूपाने सूत्रसंचालनाची सेवा केली.
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |