वैशाख मासात झालेल्या जन्मोत्सवातही उन्हामुळे कोणताही त्रास न होता साधकांनी अनुभवला श्रीगुरूंचा जन्मोत्सव !
१. ८० वा जन्मोत्सवाच्या वेळी उन्हातही पाय न भाजण्याची साधकांना आलेली अनुभूती !
‘२२.५.२०२२ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव झाला. या जन्मोत्सवाच्या वेळी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमापासून ते नागेशीपर्यंत रथोत्सव साजरा करण्यात आला. त्या वेळी रथोत्सवात नृत्य, ध्वज आणि टाळ पथकात सहभागी झालेले साधक अनवाणी (चप्पल न घालता) होते. रथोत्सवाच्या दुतर्फा उभे असलेले साधकही अनवाणीच होते. असे असूनही तेव्हा कुणालाच ‘उन्हामुळे पाय भाजले’ किंवा ‘चटका बसला’, ‘उन्हाळे लागले’, अशा प्रकारचे त्रास झाले नव्हते.
२. ८१ व्या जन्मोत्सवाच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती !
११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त फर्मागुडी येथील ‘गोवा अभियांत्रिकी महाविद्यालया’च्या मैदानात ब्रह्मोत्सव साजरा करण्यात आला. यावर्षीही साधकांना उन्हाचा त्रास जाणवला नाही. हवामान खात्याने, ‘गोव्यात १० आणि ११ मे या दिवशी हवेतील आर्द्रता आणि तापमान वाढीमुळे लोकांना अस्वस्थ करणारे वातावरण असेल’, असा अंदाज वर्तवला होता. प्रत्यक्षात मात्र साधकांनी मैदानात आल्हाददायक वातावरण अनुभवले.
२ अ. या दिव्य रथोत्सवाची मैदानातील पूर्वसिद्धता १० दिवस आधीपासूनच चालू झाली होती. त्यात सहभागी झालेल्या साधकांना उन्हाची तीव्रता जाणवत असली, तरी त्यामुळे कोणतेच शारीरिक त्रास झाले नाहीत.
२ आ. प्रत्यक्ष ब्रह्मोत्सवाच्या वेळी सहभागी झालेल्या रथयात्रेतील साधक अनवाणी होते, तरीही त्यांना उन्हाचा त्रास झाला नाही.
२ इ. वैशाखाच्या उष्ण वातावरणातही अनेक जिल्ह्यांतून साधक ब्रह्मोत्सवाला उपस्थित राहिले. त्यांचाही प्रवास सुखरूप झाला. त्यांना प्रवासात उन्हामुळे किंवा उष्णतेमुळे काही त्रास जाणवला नाही.
मे मासातील कडक उन्हाळा आणि दुपारची वेळ असूनही साधकांना कोणताही त्रास झाला नाही.’
येणार्या आपत्काळात अनेक नैसर्गिक आपत्ती येतील; मात्र ‘पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ज्यांच्या अधिपत्याखाली आहे, त्या गुरुरायांना शरण गेल्यास हा आपत्काळही साधकांना साधनेसाठी संपत्काळच असणार आहे’, हे या अनुभूतींद्वारे साधकांना शिकायला मिळाले. या अनुभूती देऊन साधकांवर कृपावर्षाव करणार्या गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
– सौ. सायली सुमंत लुकतुके (पूर्वाश्रमीची कु. सायली डिंगरे) आणि सौ. समीक्षा नागेश गाडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(१७.५.२०२३)
सूर्यनारायणाला प्रार्थना केल्यानंतर वातावरण आल्हाददायक बनणे !११.५.२०२३ या दिवशी ब्रह्मोत्सवाचा प्रारंभ दुपारी ४ वाजता झाला. तेव्हा पुष्कळ ऊन होते. ब्रह्मोत्सवाला प्रारंभ करतांना कार्यक्रमाचे सूत्रसंचालक श्री. विनायक शानभाग यांनी सूर्यनारायणाला ‘कार्यक्रमाच्या ठिकाणी शीतलता निर्माण कर’, अशी सामूहिक प्रार्थना करण्यास सांगितले. सर्वांनी प्रार्थना केल्यावर शीतल वारा वाहू लागला, ऊन अल्प होऊ लागले आणि वातावरण आल्हाददायक बनू लागले. सायंकाळी ६ नंतर संपूर्ण वातावरण आल्हाददायक आणि उत्साही बनले होते. या दोन्ही जन्मोत्सवांच्या वेळी साधकांनी श्रीगुरूंचे पंचमहाभूतांवर असलेले अधिपत्य अनुभवले आणि ‘अशक्य ते शक्य करिती गुरुमाऊली ।’, या सुवचनाची साधकांना प्रचीती आली. – सौ. सायली सुमंत लुकतुके (पूर्वाश्रमीची कु. सायली डिंगरे) आणि सौ. समीक्षा नागेश गाडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.५.२०२३) |
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |