श्रीविष्णूचा अवतार असलेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८२ व्या जन्मोत्सवाच्या दिवशी रामनाथी आश्रमात पंढरपूर येथून आणलेल्या काही वस्तू आणि छायाचित्रे यांचे प्रदर्शन लावणे अन् त्याच दिवशी श्री विठ्ठलाच्या मंदिरातील तळघरात श्रीविष्णु बालाजीची मूर्ती सापडणे
१. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी पंढरपूर येथून जतन करण्यासाठी काही चैतन्यदायी वस्तू आणि छायाचित्रे आणणे
‘सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या मागील काही वर्षे सप्तर्षींच्या मार्गदर्शनानुसार सनातन संस्थेच्या कार्यातील आणि साधकांच्या साधनेतील अडथळे दूर व्हावेत अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, यांसाठी विविध धार्मिक क्षेत्री जाऊन पूजा-विधी करतात, तसेच हिंदु संस्कृतीचे जतन आणि संवर्धन होण्यासाठी देशविदेशांत अभ्यास दौरेही करतात. एकदा त्यांनी महाराष्ट्रातील पंढरपूर येथून जतन करण्यासाठी काही चैतन्यदायी वस्तू आणि छायाचित्रे आणली.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव महर्षींच्या मार्गदर्शनानुसार साजरा केला जाणे
परात्पर गुरु डॉ. आठवले हे ‘श्रीविष्णूचे अवतार आहेत’, असे जीवनाडीपट्टीच्या वाचनातून महर्षींनी वेळोवेळी सांगितले आहे. महर्षींच्या मार्गदर्शनानुसार मागील काही वर्षे त्यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. या वर्षी २७ मे ते ३० मे २०२४ असे ४ दिवस त्यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. पहिल्या दिवशी सर्वत्रच्या साधकांनी आपापल्या ठिकाणी त्यांची मानसपूजा केली, तर उर्वरित ३ दिवस रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्री नवचंडी याग भावपूर्ण वातावरणात करण्यात आला. या ३ दिवसांत यागाच्या वेळी ‘कलियुगातील श्रीविष्णूच्या अवतारामागील रहस्य’ या विषयावर काही सूत्रे सांगण्यात आली.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने रामनाथी आश्रमात पंढरपूर येथून आणलेल्या काही वस्तू आणि छायाचित्रे यांचे प्रदर्शन लावण्यात येणे अन् त्याच दिवशी श्री विठ्ठलाच्या मंदिरातील तळघरात श्री बालाजीच्या रूपातील मूर्ती सापडणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने रामनाथी आश्रमात श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी पंढरपूर येथून आणलेल्या काही वस्तू आणि छायाचित्रे यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. विशेष म्हणजे ३० मेच्या रात्री २ वाजता श्री विठ्ठल मंदिरात एक तळघर सापडले आणि त्यामध्ये अन्य मूर्तीसह एक विष्णु बालाजीची साडेतीन फूट उंचीची मूर्ती सापडली. हा एक दैवी योग आहे. या घटनेतून जणू साक्षात् भगवंतच सांगत आहे, ‘सनातन संस्थेच्या साधकांना लाभलेले मोक्षगुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे प्रत्यक्ष श्रीमन्नारायणस्वरूप आहेत. तेच श्रीविष्णूचा अवतार आहेत.’
माझी वरील विचारप्रक्रिया श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना कळवल्यावर त्यांनी याला दुजोरा दिला. त्यामुळे मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. ‘आम्हा सर्व साधकांवर श्रीमन्नारायणस्वरूप श्री गुरूंची अखंड कृपादृष्टी रहावी, त्यांना अपेक्षित अशी साधना आमच्याकडून घडावी’, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करते.’
– कु. श्रावणी पेठकर (वय २२ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.६.२०२४)
|