खोट्या आरोपाखाली अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना भोगावा लागला होता कारावास !
कथित ‘हिंदु आतंकवादा’च्या षड्यंत्रात गोवण्यात आलेले झुंझार अधिवक्ता संजीव पुनाळेकर
‘अधिवक्ता संजीव पुनाळेकर हे महाराष्ट्रातील हिंदुत्वनिष्ठांचे आधारस्तंभ आहेत. त्यांनी खोट्या आरोपांखाली अटक केलेल्या अनेक हिंदुत्वनिष्ठांना विनामूल्य न्यायालयीन साहाय्य केले आहे. मालेगाव आणि मडगाव स्फोट इत्यादी खटल्यांतील हिंदुत्वनिष्ठांना त्यांनी निर्दाेष सोडवले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली. त्या खटल्यातील आरोपींचे अधिवक्ते म्हणूनही अधिवक्ता पुनाळेकर चांगल्या प्रकारे खटला लढवत होते. अचानकपणे वर्ष २०१९ मध्ये त्यांना केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (सीबीआयने) अटक केली. पुढे काही दिवसांतच त्यांना जामीन मिळाला. शेवटी त्यांची या आरोपातून निर्दाेष सुटका झाली आणि सत्याचा विजय झाला.
२ जून या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘कारावासातील अनुभवामुळे ईश्वरावरील श्रद्धा वृद्धींगत, दुखावलेल्या अधिकार्यांकडून अडकवण्याचा प्रयत्न’, ही सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत. (उत्तरार्ध)
या लेखाच्या आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/799658.html
८. मनोधैर्य खच्ची करण्यात अन्वेषण यंत्रणांना अपयश
मडगाव स्फोट प्रकरण, मुंबई बाँबस्फोट प्रकरण, मालेगाव स्फोट प्रकरण, सोहराबुद्धीन हत्या प्रकरण, हिंदु राष्ट्र सेनेचे श्री. धनंजय देसाई यांचा खटला अशा विविध खटल्यांच्या निमित्ताने माझे शेकडो आरोपींशी संभाषण झाले आहे. जेव्हा मला दाभोलकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आली, तेव्हा ‘ईश्वर न्याय करील’, अशी माझी श्रद्धा होती. त्यामुळे त्याचा माझ्यावर विशेष परिणाम झाला नाही आणि अन्वेषण यंत्रणांना मला जो त्रास द्यायचा होता, तो त्रास ते देऊ शकले नाहीत. माझ्या मनातील स्थिरतेला सीबीआय, राजकीय नेते, कथानक (नॅरेटिव्ह) निर्माण करणारे पत्रकार धक्का लावू शकले नाहीत. हाच माझ्यात आणि अन्य अधिवक्ते यांच्यातील भेद आहे.
मी ४२ दिवस कारावासात होतो. अटक झाल्यानंतर वातावरणात पालट झाला होता. त्यामुळे पहिल्या दिवशी मला झोप यायला उशीर झाला. त्यानंतर सर्व दिवस मला शांतपणे झोप लागली. अन्वेषण यंत्रणेच्या प्रश्नांना मी उत्तरे देत होतो. किंबहुना माझी उलट तपासणी घेतांना माझी उत्तरे स्वीकारण्याची त्यांचीच सिद्धता नव्हती. ‘तुम्ही सांगू नका’, असे ते मला परत परत सांगत होते. आपण त्यांना माहिती देण्याचा प्रयत्न केला, तर ‘नको नको, यात आपल्याला जायचेच नाही’, ‘हे आपल्याला बघायचेच नाही’, ‘हे सांगू नका’, असे ते मला म्हणायचे. एक अधिवक्ता म्हणून या प्रकरणाचा मी अभ्यास केला होता. माझ्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे होती. वास्तविक अधिवक्त्याला प्रश्न विचारायचा त्यांना अधिकारच नव्हता; कारण मुळात अटकच अवैध होती. त्यामुळे ते माझे मनोधैर्य खच्ची करू शकले नाहीत.
९. शरद कळसकरसाठी लढा चालूच रहाणार !
शरद कळसकर याला प्रथम नालासोपारा प्रकरणात अटक करण्यात आली. त्याही प्रकरणात मी अधिवक्ता होतो. मी अभिमानाने सांगतो की, मी कळसकरचे वकीलपत्र सोडून दिलेले नाही. मला त्याच्यात सहआरोपी केले. एका आरोपीला दुसर्या आरोपीचे वकीलपत्र घेता येत नाही. त्यामुळे मला दाभोलकर खटल्यातून नाईलाजाने बाहेर पडावे लागले. असे असले, तरी नालासोपारा प्रकरणात त्या आरोपीचा मी आजही अधिवक्ता आहे आणि पुढेही राहीन. मला अटक होणार आहे, याची शक्यता वर्तवली जात होती. त्या वेळी मी चित्रफीत प्रसारित करून सांगितले होते, ‘मला कुठल्याही प्रकरणात अटक केली, तरी चालेल, मी स्वत: हून बाहेर पडणार नाही. त्यामुळे तुम्ही अशा गोष्टीत पडू नका. तुम्ही मला घाबरवू शकणार नाही. त्यामुळे मला तुम्ही भीती दाखवू नये.’
१०. कारावासातील अनुभवाचा आध्यात्मिक लाभ
मी आयुष्यात गीतेचे पारायण सहस्रो वेळा केले आहे. त्यात ज्ञानयोग, ध्यानयोग, कर्मयोग, भक्तीयोग, संन्यस्तयोग यांविषयी भगवंताने ज्ञान दिले आहे. त्यात त्यांनी सांगितले, ‘कोणत्याही मार्गाने साधना केली, तरी ते शेवटी एकाच ठिकाणी जातात. सर्व योग एकाच ठिकाणी येतात आणि ईश्वरप्राप्ती होते.’ माझ्या वडिलांनी ५० वर्षांपूर्वी मला गीता दिली होती, जी आजही माझ्याकडे आहे. ही गीता मी कारागृहातही घेऊन गेला होतो. तेथे मी त्यातील संस्कृत श्लोकांच्या मराठी अनुवादाचे नियमित वाचन करत होतो. त्यात भगवंताने अर्जुनाला सर्व सांगितल्यावर शेवटी वचन दिले होते, ‘मी तुला सांगितलेले तुला पटले आहे. तसे तू वागल्यास मी तुझी सर्व पापांपासून मुक्तता करीन.’ या ४२ दिवसांच्या कारावासात मला भगवंताच्या ‘मी या सर्व पातकांतून तुला मुक्त करीन’, या एकाच वाक्याने आधार दिला. ‘आपल्याला सगळ्यांपासून मुक्त करणारा तो श्रीकृष्ण असल्याने आपले कुणी काहीही वाईट करू शकणार नाही’, अशी माझी श्रद्धा होती. आपण काहीही पाप केलेले नाही. आपल्याकडून काही चुका घडलेल्या असतील, तरी आपल्याला वाचवणारा देव आहे.
कारागृहात पुष्कळ अनुभव आणि ज्ञान मिळाले. ते एवढे खोलवर आणि प्रगाढ होते की, त्यामुळे माझ्या व्यक्तीमत्त्वातही बरेच परिवर्तन घडले. माझ्यात एक प्रकारची निर्भयता आणि प्रगल्भता आली. त्यामुळे मुक्तीकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आणि आजही त्या श्रद्धेवर पुढील कार्य करत राहू.
११. हिंदुत्वनिष्ठांना खोट्या आरोपांखाली गोवणारे अधिकारी व्यवस्थेसाठी धोकादायक !
आम्हाला खोट्या आरोपांखाली गोवणार्या अधिकार्यांवर कारवाई होण्यासाठी आम्ही दाद मागणार आहोत. त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे. त्यासाठी आम्ही उच्च न्यायालय, तसेच सर्वाेच्च न्यायालयातही जाऊ. लोकमान्य टिळक यांचे एक विधान आहे, ‘सर्व न्यायालयांच्या वरही एक ईश्वरी न्यायालय आहे. जे मला न्याय देईल.’ आज आपण सत्ययुगात नाही, तर कलियुगात रहात आहोत. त्यामुळे सत्याचा विजय लगेच होईल, असे म्हणणे चुकीचे ठरेल. याचा अर्थ सत्य पराजित होणार नाही; पण अंतिम विजय सत्याचा होईल, हे निश्चित. ज्यांनी सत्याची बाजू घेतली, त्यांना काही काळ हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या आणि त्यांना कारागृहात जावे लागले, हे अपेक्षित आहे. आज आम्ही लढा देत आहोत. त्यामुळे सत्याचा अंतिम विजय होईल. माझ्या हयातीत विजय मिळून त्या अधिकार्याला शिक्षा मिळाली पाहिजे, असेही नाही. शेवटी ‘कर्माच्या सिद्धांता’प्रमाणे ज्याने कर्म केले, त्याला त्याच्या कर्माची फळे ही भोगवीच लागणार आहेत आणि ती ईश्वर त्याला देणार आहे.
‘मी म्हणेल ती पूर्व दिशा’, या प्रकारची जी फॅसिस्ट किंवा जुलमी वृत्ती या तथाकथित पुरोगामी आणि डाव्या विचारसरणींच्या लोकांनी दाखवलेली आहे, त्या दडपशाहीच्या विरोधातील लढा चालू झाला आहे. या लढ्याच्या अंताला या संपूर्ण विचारसरणीचा दांभिक बुरखा आम्ही फाडून काढणार आहोत. त्यांना त्यांची सर्व दुकाने बंद करावी लागतील, तेव्हाच सत्याचा विजय होणार आहे. त्या वेळी आम्ही असलो किंवा नसलो, तरी अन्य अधिवक्ते आणि कार्यकर्ते असतील; पण सत्याचा विजय हा निश्चित होणारच आहे.
१२. दाभोलकर प्रकरणाचा कौटुंबिक जीवनावर परिणाम
पुरुषाच्या दृष्टीने आई, पत्नी, बहीण आणि मुलगी या ४ महिला महत्त्वाच्या असतात. अटकेच्या काळात माझी भाची (बहिणीची मुलगी) गरोदर होती आणि लवकरच आमच्या कुटुंबात प्रथमच एक बाळ जन्माला येणार होते. अटकेनंतर तिचे बाळंतपण झाले. माझ्या आईला रुग्णालयातून घरी घेऊन आलो होतो. अटकेच्या दुसर्या दिवशी पत्नीचा वाढदिवस होता. माझी मुलगी शासकीय विधी महाविद्यालयात शिक्षण घेत होती आणि ती दुसर्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती.
त्यामुळे तिला न्यायमूर्ती धर्माधिकारी यांच्या हस्ते पारितोषिक आणि प्रमाणपत्र मिळणार होते. (न्या. धर्माधिकारी यांच्या खंडपिठापुढे या दाभोलकर प्रकरणाची सुनावणी चालू होती. तेव्हा आरोपींचे ऐकले जात नव्हते; तर ज्या कुटुंबाने न्यायालयात साक्ष देण्याचे नाकारले, त्यांचे ऐकले जात होते.) तिच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा चालू झाली होती. एका अर्थाने माझ्या जीवनातील चारही महिलांच्या दृष्टीने तो काळ महत्त्वाचा होता. त्याच काळात मला अटक झाली होती.
या अटकेचा माझ्यावर काही परिणाम झाला नाही. पुढे योग्य ठिकाणी माझ्या मुलीचा विवाहही झाला. माझी आईही आज सुखरूप आहे. पत्नी माझ्या समवेत कायमच होती. बहिणीनेही कुटुंबाला सहकार्य केले. या दृष्टीने अन्वेषण यंत्रणा तसा आघात करू शकले नाही. त्यामुळे मी ईश्वराचा ऋणी आहे.
१३. सहकार्याला ‘सीबीआय’ अधिकार्याची धमकी
त्या वेळी माझ्यासमवेत विक्रम भावे होते. त्यांची परिस्थिती वेगळी होती. ते श्रीमंत घरातील आहेत. बंगला, गाडी, नोकरचाकर सर्व आहेत; पण स्वभावाने साधे आहेत. त्यांना ‘सीबीआय’च्या अधिकार्याने धमकावले, ‘तू बायकोची काळजी घे. तुझ्या बायकोचे काही बरे-वाईट होईल.’ हे नंतर मला कळले.
१४. कारावासातील काळात सहकारी आणि वकिली व्यवसायातील ग्राहक यांचे उत्स्फूर्त सहकार्य
माझे वकिली व्यवसायातील अनेक ग्राहक आणि मित्र आहेत. त्यांना हे सर्व प्रकरण ठाऊक होते. त्यातील एकानेही त्याचा खटला माझ्याकडून काढून घेतला नाही. मी ४२ दिवस कारावासात असतांना माझ्या सहकार्यांनी हे सर्व खटले अत्यंत खंबीरपणे लढवले. मी सुटून आल्यावर सर्व सूत्रे परत हातात घेतली. त्यामुळे ‘सीबीआय’ माझी फारशी हानी करू शकली नाही. ‘आपण निर्मळ मनाचे असाल आणि सरळ वागत असाल, तर लोक आपल्याला सहकार्य करतात.’ माझ्या ग्राहकांमध्ये काही कॉर्पाेरेट, सहकारी बँका, व्यक्ती, उद्योजक होते, तसेच काही कामगार वर्गातील मंडळीही होती. एकानेही मला सोडून दुसर्या अधिवक्त्याकडे जाण्याचा विचार केला नाही. याउलट अनेकांनी त्यांच्याकडील शिल्लक देयके घरी आणून दिली. काही जणांनी सहकार्य म्हणून आगाऊ रक्कम देऊ केली. त्या वेळी घराच्या इमारतीच्या खाली कायम पोलीस असायचे. अन्वेषण यंत्रणांचीही टेहाळणी होती. तरी कुणीही घाबरले नाहीत. माझ्या घरी लोकांची एवढी रीघ लागली होती की, लोकांना आश्चर्य वाटले होते.
माझ्या इमारतीत ९० टक्के लोक हे सिंधी आहेत. त्यातील बरेच जण उद्योजक आहेत. त्यांना आश्चर्य वाटले की, पुनाळेकर यांना अटक झाली आणि एवढे लोक त्यांच्या घरी भेटायला येत आहेत ! खरच हा चमत्कार होता. त्या काळात माझ्या घरी शेकडो नाही, तर सहस्रो व्यक्ती सांत्वनासाठी येत होत्या. माझ्या घरचे खंबीर होते. त्यामुळे ज्यांनी मला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यासाठी हा धडा होता. माझ्या अटकेचा काही जणांनी उघडपणे निषेध केला. त्यात काही राजकारणी होते, अधिवक्ते होते, तर काही कलाकारही होते. त्यांची संख्या एवढी मोठी आहे की, नावे घेतांना काहींची नावे राहून गेली, तर त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे होईल. या लोकांनी थेट उभे राहून आणि आंदोलन करून माझ्या अटकेचा निषेध केला. हे अभूतपूर्व असून याविषयी मी त्यांचा फार ऋणी आहे.
१५. पोलीस, सीबीआयचे अधिकारी, कारागृहातील कर्मचारी आणि बंदीवान यांचा अनुभव
मला ज्या कारागृहात ठेवले होते, त्या ठिकाणी माझ्या समवेत विक्रम भावे होते, तसेच कोरेगाव भीमा प्रकरणात शहरी नक्षलवादी म्हणून अटक झालेले लोक होते. ते सोडले, तर अन्य सर्व बंदीवान हे क्रूर आतंकवादी आणि ज्यांना फाशी ठोठावण्यात आली आहे; पण द्यायची आहे, असे बंदीवान होते. अशा कोठडीत आम्हाला ठेवण्यात आले होते.
या प्रकरणात ‘सीबीआय’चे अधिकारी एस्.आर्. सिंह यांची अन्यायाची भूमिका होती. शरद कळसकर हा गरीब मुलगा होता. त्याची आणि माझी भेट झाली कि नाही, हे शोधण्यासाठी त्यांच्याकडे सोपा मार्ग होता. ते त्याचे आणि माझे दूरभाष ‘ट्रॅकिंग’ पाहू शकले असते. माझे कार्यालय असलेल्या इमारतीमध्ये सर्वत्र ‘सीसीटीव्ही छायाचित्रक’ लावले आहेत. त्यामुळे तेही पडताळता आले असते. कळसकरची अटक आणि माझी भेट या कालावधीचा कालखंड दाखवण्यात आला, तो एक मासाचा होता. त्यामुळे हे सर्व तपासता आले असते; पण अन्वेषण अधिकार्याने यातील आपण काहीही पाहिले नाही, असे सांगितले. वस्तूस्थितीनुसार त्यांनी सर्व तपासले होते; पण काही मिळाले नव्हते. त्यामुळे ‘सीबीआय’चे अन्वेषण अतिशय भरकटले होते.
१६. अन्वेषण भरकटवण्यास दाभोलकर कुटुंबीय उत्तरदायी
अधिकार्यांनी आरोपी म्हणून अनेकांची नावे घेतली. ते सर्व निर्दाेष आहेत. मग त्यांनी शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांची नावे घेतली. त्यातही त्यांनी घोळ घातला. दाभोलकर कुटुंब ज्याच्या ज्याच्याकडे बोट दाखवत होते, ते ते दोषी आहेत, असे अन्वेषण अधिकारी म्हणत होते. त्यामुळे ‘सीबीआय’चे अन्वेषण वारंवार कुंठीत होत गेले.
१७. ‘सीबीआय’ अधिकार्याकडून पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांचा अनादर
सीबीआय अधिकारी आम्हाला अत्यंत अपमानास्पद गोष्टी विचारत होते. त्या काळी एस्.आर्. सिंह हे पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्याविषयी जे बोलायचे, ते येथे सांगू शकत नाही; कारण त्याचा पुरावा नाही. त्यांनी अतिशय वाईट विधाने केलेली आहेत. सिंह म्हणाले, ‘‘सोहराबुद्दीन प्रकरणात अमित शहा आमच्या पाया पडले होते आणि ढसाढसा रडले होते.’ सीबीआय अधिकारी असल्याचा त्यांना उन्माद होता. ही मंडळी त्यांच्या पदाचा अपवापर करत होते.
१८. तथाकथित पुरोगामी, साम्यवादी आणि नास्तिकतावादी यांचा पराभव
भगवान श्रीकृष्णाला अपेक्षित असे कार्य करण्याचा आम्हा अधिवक्त्यांचा दंडक आहे. आज मोठ्या संख्येने अधिवक्ते आणि कार्यकर्ते आमच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यामुळे आम्ही मागे हटणार नाही. जे खटले लढत आलो आहे, ते लढत राहू. एक गोष्ट निश्चित आहे. मागील ५ वर्षांच्या काळात आम्ही माध्यमांसमोर येण्याचे आणि वार्तालाप करण्याचे टाळले. या गोष्टीमुळे एकंदरीत या खटल्यावर परिणाम झाला असता. त्या काळात आम्ही आमचे काम करत होतो. यापुढेही आपण आपले काम करत रहावे. आम्ही आमचा लढा सोडणार नाही. हे जे काही तथाकथित पुरोगामी, साम्यवादी, अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करणारे आणि त्यांची दुकाने चालवणारे आहेत, त्यांनी आमच्या वाट्याला येऊ नये; कारण त्यांचा पराभव झालेला आहे अन् आजही त्यांची चर्चा करण्याची सिद्धता नाही. आज तोंड लपवून बसण्याची पाळी त्यांच्यावर आलेली आहे. त्यांना माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. आजपर्यंत आम्ही सहन केले. न्याययंत्रणेचा मान राखला. आता तुम्ही तो राखावा, अशी अपेक्षा आहे.’
(समाप्त)
– अधिवक्ता संजीव पुनाळेकर, सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद.