Prashant Kishor : ‘४०० हून अधिक जागा मिळणार’, या घोषणेने भाजपची झाली हानी !
राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा दावा
पाटलीपुत्र (बिहार) – लोकसभा निवडणुकीच्या मतदानोत्तर चाचणीत भाजपप्रणीत आघाडीला ४०० हून अधिक जागा मिळू शकतात, असे अंदाज बहुतेकांनी वर्तवले होता; मात्र प्रत्यक्षात या आघाडीला २९२ जागाच मिळाल्या आहेत. अंदाज वर्तवणार्यांमध्ये राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर हेही सहभागी होते. आता त्यांनी त्यांच्या चुकलेल्या अंदाजावरून क्षमा मागितली आहे आणि त्यांचे निवडणुकीत लागलेल्या निकालाविषयी मत मांडले आहे. यात त्यांनी भाजपच्या ‘४०० हून अधिक जागा मिळणार’ (अब की बार ४०० पार) या घोषणेने त्याचा घात केल्याचे म्हटले आहे.
कार्यकर्ते आणि मतदार दोघेही होते नाराज !
‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर म्हणाले की, भाजपची सर्वांत मोठी दुर्बल बाजू काय असेल, तर तो वाजवीपेक्षा अधिक प्रमाणात मोदी यांच्यावर अवलंबून रहाणे, ही आहे. कार्यकर्ते ४०० हून अधिक जागा मिळणार, ही घोषणा घेऊन बसले होते. त्यांना वाटले की, खरंच तेवढ्या जागा येतील. ‘आता आपल्या खासदाराला थोडा धडा शिकवला पाहिजे’, असे मतदारांनी ठरवले होते. मी माझ्या मतदारसंघातील चित्र सांगतो. बिहारच्या आरा येथील आर्.के. सिंह यांचे उदाहरण घ्या. कुणालाही त्यांच्याविषयी विचारा ते सांगतील ‘सिंह यांनी चांगले काम केले आहे, मंत्री म्हणूनही ते चांगले होते’; पण कार्यकर्ते नाराज का आहेत ? तर ते कार्यकर्त्यांची विचारपूसही करायचे नाहीत. भाजपाला पाठिंबा देणार्या लोकांना वाटले होते, ४०० हून अधिक जागा येतील, अशी घोषणा दिली आहे, तर भाजपच्या ४०० पार जागा येतील. वाराणसीत मतमोजणीत मोदी आरंभीला पिछाडीवर होते. वर्ष २०१४ च्या तुलनेत त्यांच्या मतांची टक्केवारी २ टक्क्यांनी घटली आहे. मागच्या वेळी मोदी यांच्या विरोधकाची मतांची टक्केवारी २०.९ होती. या वेळी ती ४१ टक्के झाली. वाराणसीत मतदारांना हे वाटत होते ‘मोदी यांना रोखायचे आहे.’
सौजन्य : India Today
अंदाज चुकल्याने राजकीय समज संपत नाही !
प्रशांत किशोर यांनी अंदाज वर्तवला होता की, वर्ष २०२४ मध्ये भाजप ३०३ जागा किंवा त्याहून अधिक जागा मिळतील आणि काँग्रेसला १०० जागांपेक्षाही अल्प जागा मिळतील. त्याबाबत प्रशांत किशोर म्हणाले की, मला मान्य आहे की, माझा अंदाज चुकला; पण हे घडू शकते. अखिलेश यादव, अमित शहा यांनीही विविध अंदाज वर्तवले होते. तेदेखील चुकले. याचा अर्थ असा होत नाही की, अंदाज वर्तवणार्यांची राजकीय जाण संपली. राहुल गांधीही ‘मध्यप्रदेशात आमचे सरकार येईल’ असे म्हणाले होते. तिथे भाजपचे सरकार आले. याचा अर्थ असा नाही की, त्यांची राजकीय समज संपली आहे. अंदाज वर्तवण्यात चूक होऊ शकते.
४०० पारची घोषणा लोकांना अहंकाराचे प्रतीक वाटली !
प्रशांत किशोर म्हणाले की, ४०० हून अधिक जागा मिळण्याची घोषणा दिल्यामुळे भाजपला सर्वाधिक फटका बसला. अशी घोषणा लोकांना अहंकाराचे प्रतीक वाटली. त्यावर विरोधी पक्षाने असाही प्रचार केला की, भाजपला ४०० हून अधिक जागा मिळाल्या, तर तो देशाची राज्यघटना पालटणार. ४०० हून अधिक जागा मिळणार, ही घोषणा चांगली आहे; पण ही अर्धवट आहे. ४०० हून अधिक जागा मिळणार’, इतकीच घोषणा देऊन ती सोडून देण्यात आली. वर्ष २०१४ मध्ये भाजपची घोषणा होती, ‘बहुत हो गयी महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार !’ ४०० हून अधिक जागा मिळणार, या घोषणेच्या मागे पुढे असे काही नव्हते. मतदारांना ही घोषणा पटली नाही.