Corridor For Hindus : भारतातील हिंदु आणि जैन यांना पाकिस्तानातील मंदिरात येता येण्यासाठी ‘धार्मिक कॉरिडॉर’ बांधणार ! – सिंध प्रांताचे पर्यटन मंत्री
(कॉरिडॉर म्हणजे सुसज्ज मार्ग)
दुबई – आम्ही एक ‘धार्मिक कॉरिडॉर’ सिद्ध करू शकतो, जेणेकरून भारतातील हिंदु आणि जैन समाजाचे लोक आमच्या (सिंध) प्रांतात येऊन त्या ठिकाणी पूजा-अर्चा करू शकतील, असे प्रतिपादन सिंधचे पर्यटनमंत्री झुल्फिकार अली शाह यांनी दुबईत सिंध प्रांतातील पर्यटनाच्या प्रचाराशी संबंधित एका कार्यक्रमात बोलतांना केले.
ते पुढे म्हणाले की, उमरकोट आणि नगरपारकर येथे कॉरिडॉर बनवता येईल. उमरकोटमध्ये भगवान शिवाचे मंदिर आहे. हे मंदिर २ सहस्र वर्षांपूर्वी बांधले गेले होते. नगरपारकरमध्येही अनेक जैन मंदिरे आहेत. येथे मोठ्या संख्येने हिंदु लोक रहातात. पाकिस्तानमधील धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने हिंदु आणि जैन भारतातून येऊ इच्छितात. पाकिस्तानमध्ये हिंदु हा सर्वात मोठा अल्पसंख्याक समुदाय आहे. अधिकृत अंदाजानुसार, पाकिस्तानमध्ये ७५ लाख हिंदु रहातात. परमहंसजी महाराज समाधी (खैबर-पख्तुनख्वा), बलुचिस्तानमधील हिंगलाज मातामंदिर, पंजाबमधील चकवाल जिल्ह्यातील कटास राज कॉम्प्लेक्स आणि पंजाबमधील मुलतान जिल्ह्यातील प्रल्हाद भगत मंदिर ही पाकिस्तानातील काही प्रमुख हिंदु मंदिरे आहेत.