मुंबई सेवाकेंद्रात येणार्या साधकांना सर्व प्रकारच्या सेवा करायला शिकवून परिपूर्ण घडवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘मुंबई येथील सेवाकेंद्रात मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा प्रत्यक्ष सत्संग लाभला. प.पू. डॉक्टर माझ्या जीवनात आल्यामुळे मला जीवनाचे ध्येय समजले आणि त्यांच्या कृपेने मला तिथे साधना अन् सेवा करण्याची संधी लाभली. माझ्या साधनेच्या आरंभीच्या काळात त्यांनी मला व्यवहार आणि साधना यांची प्रत्यक्ष शिकवण देऊन घडवले. साधनेच्या मार्गावर चालण्यासाठी त्यांनी मला शक्ती, बुद्धी आणि प्रेरणा दिली. ‘प्रत्येक क्षणी प.पू. डॉक्टर माझ्या पाठीशी असून तेच माझ्याकडून सर्व करून घेत आहेत’, याची मला सतत जाणीव असते. ‘आतापर्यंत माझ्याकडून झालेली साधना’, ही केवळ आणि केवळ प.पू. डॉक्टरांची कृपाच आहे. त्यामुळे मला त्यांच्याविषयी वाटणारी कृतज्ञता शब्दातीत आहे. तरीही त्यांनीच व्यक्त करून घेतलेली कृतज्ञतारूपी शब्दसुमने त्यांच्या सुकोमल चरणी अर्पण करतो.
(भाग १)
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची झालेली प्रथम भेट !
१ अ. श्री. प्रकाश शिंदे यांच्याशी ओळख होणे : ‘माझा चुलत भाऊ श्री. विष्णु कदम आणि श्री. प्रकाश शिंदे (रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. दिनेश शिंदे यांचे भाऊ) हे दोघे दादर, मुंबई येथे टपाल कार्यालयात नोकरी करत होते. श्री. विष्णुदादांना भेटण्यासाठी माझे दादर टपाल कार्यालयात वरचेवर जाणे होत असे. त्यामुळे श्री. प्रकाश शिंदे यांच्याशी माझा परिचय झाला.
१ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वेगवेगळ्या साप्ताहिकात संमोहनशास्त्राविषयी येणारे लेख वाचून श्री. प्रकाश शिंदे यांनी जिज्ञासेने त्यांची भेट घेणे : पूर्वी प.पू. डॉक्टरांचे वेगवेगळ्या साप्ताहिकांतून संमोहनशास्त्राविषयी लेख प्रसिद्ध होत असत. ते लेख वाचून श्री. प्रकाश शिंदे प.पू. डॉक्टरांकडे उपायांसाठी जात असत. ते उपाय करून त्यांना पुष्कळ लाभ होत होता. श्री. विष्णु कदम आणि श्री. प्रकाश शिंदे यांना प.पू. डॉक्टरांनी साधना करायला सांगितली. ती साधना केल्यावर त्यांना चांगले अनुभवही आले. त्यानंतर ६ मासांनी त्यांनी मला सांगितले, ‘‘आधुनिक वैद्य डॉ. आठवले हे प्रत्येक गुरुवारी साधनेविषयी मार्गदर्शन करतात.’’ अनुमाने वर्ष १९९० मध्ये मी, श्री. विष्णु कदम आणि श्री. प्रकाश शिंदे यांच्यासह प.पू. गुरुदेवांना भेटण्यासाठी मुंबई सेवाकेंद्रात गेलो. तेव्हा त्यांना भेटायला जातांना ‘व्यवहार चांगला चालावा आणि अडचणी दूर व्हाव्यात’, हाच माझा उद्देश होता.
१ इ. पहिल्या भेटीतच प.पू. डॉक्टरांनी कुलदेवतेचा नामजप करायला सांगणे, प.पू. डॉक्टरांचा आधार वाटून ‘तेच मार्गदर्शन करून जीवनात पुढे नेतील’, असे वाटणे : आम्ही सेवाकेंद्रात गेल्यावर प.पू. डॉक्टरांनी आमच्याकडे पाहून स्मितहास्य केले. थोडे अनौपचारिक बोलणे झाल्यानंतर श्री. विष्णु कदम यांनी माझी ओळख करून दिली आणि ‘हा साधना करू इच्छितो’, असे सांगितले. त्यावर प.पू. डॉक्टरांनी त्यांच्यासमोर मला डोळे मिटून बसायला सांगितले. मी डोळे मिटून बसलो. काही मिनिटांनी त्यांनी मला डोळे उघडायला सांगितले आणि म्हणाले, ‘‘तू साधना चांगल्या प्रकारे करू शकतोस !’’ त्यांनी मला ‘कुलदेवतेचा नामजप प्रतिदिन ९ माळा करायला सांगितला आणि पुन्हा ९ मासांनी भेटूया’, असे सांगितले. प.पू. डॉक्टरांकडे पाहून, ‘हेच आपल्याला मार्गदर्शन करू शकतील’, असे मला वाटले. मला त्यांचा आधार वाटला; कारण प.पू. डॉक्टरांचे दर्शन होण्यापूर्वी जीवनात योग्य मार्गदर्शन करणारे, पुढे नेणारे, असे कुणीच नव्हते. आई-वडील गावी होते. मुंबईमध्ये कुणीच नव्हते.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी निर्माण झालेल्या ओढीमुळे त्यांनी ९ मासांनी बोलावले असूनही लगेच दुसर्या दिवशीच त्यांना भेटायला सेवाकेंद्रात जाणे
प.पू. डॉक्टरांनी मला ‘९ मासांनी परत भेटूया’, असे सांगितले होते; परंतु मला त्यांना भेटण्याची ओढ लागली होती. मला वाटायचे, ‘मला मिळेल, तो सर्व वेळ मी प.पू. डॉक्टरांसाठी दिला पाहिजे आणि त्यांच्याकडे सेवा केली पाहिजे.’ मी एका वीज जोडणीची (‘इलेक्ट्रीक’ची) कामे करणार्या ठेकेदाराकडे कामाला होतो. माझ्या कामाची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होती. दुसर्या दिवशी कामावरून सुटल्यानंतर मी थेट मुंबई सेवाकेंद्रात प.पू. डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी माझ्याकडे पाहून स्मितहास्य केले आणि म्हणाले, ‘‘अरे ! तू आलास का ? ये.’’ त्यांनी लगेच मला एक सेवा करायला दिली.
३. प्रतिदिन मुंबई सेवाकेंद्रात जाऊन सेवा करू लागणे आणि सेवेतून पुष्कळ आनंद अनुभवणे
तेव्हा प.पू. डॉक्टर विविध विषयांवर ग्रंथांसाठी लिखाण करत असत. ते ग्रंथांमध्ये घ्यायच्या लिखाणाची ‘टाचणे’ काढून ठेवत आणि त्या टाचणांवर ‘हे लिखाण कुठल्या ग्रंथात घ्यायचे आहे’, हे लिहून ठेवत. ते वाचून त्या टाचणांतील एकेका ग्रंथासाठीची टाचणे एकत्र करायची सेवा मला मिळाली होती. ती सेवा करतांना मला पुष्कळ आनंद मिळाला. ‘ती सेवा करतांना किती वेळ गेला’, हे मला कळलेही नाही. मी साधारण २ घंटे तिथे होतो. शेवटी प.पू. डॉक्टरांनी माझी विचारपूस केली. मी त्यांना म्हणालो, ‘‘मी प्रतिदिन संध्याकाळी सेवाकेंद्रात येण्याचा प्रयत्न करीन.’’ त्यानंतर प्रतिदिन संध्याकाळी मी सेवाकेंद्रात सेवेसाठी जाऊ लागलो.
(क्रमशः)
– (सद्गुरु) सत्यवान धोंडू कदम (वय ६१ वर्षे), कुडाळ सेवाकेंद्र (जि. सिंधुदुर्ग) (२७.०२.२०२४)