कायदा-सुव्यवस्थेच्या कारणावरून मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पोलिसांनी अनुमती नाकारली !
अंतरवाली सराटी येथील ग्रामस्थांचाही होता विरोध !
जालना – सगेसोयर्यांचा कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ८ जूनपासून पुन्हा एकदा ‘आमरण उपोषणा’ची घोषणा केली होती; मात्र त्यांच्या या उपोषणाला पोलिसांनी अनुमती नाकारली आहे. यापूर्वी मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्र असलेल्या अंतरवाली सराटी गावातील ग्रामस्थांनी जरांगे यांच्या ‘आमरण उपोषणा’ला विरोध केला होता.
आंदोलनामुळे गावातील जातीय सलोखा बिघडत आहे, तसेच ग्रामपंचायतीच्या कामांना अडथळा आणि महिला अन् शालेय विद्यार्थी यांना होणारा त्रास लक्षात घेऊन पोलिसांनी आमरण उपोषणाला अनुमती नाकारली आहे. ‘४ दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले होते. ‘गावात आणि परिसरात जातीय सलोखा बिघडत असल्याने उपोषणास अनुमती देऊ नये’, अशी मागणी ग्रामस्थांनी या निवेदनातून केली होती. या निवेदनावर ७० गावकर्यांच्या स्वाक्षर्या असल्याची माहिती समोर आली होती.