भारताच्या विकासाला नवी दिशा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी !
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान म्हणून पदावर बसणार आहेत. ३ वेळा मुख्यमंत्री पदावर बसणारे आणि नंतर ३ वेळा पंतप्रधान होणारे नरेंद्र मोदी भारतातील एकमेव राजकारणी आहेत. विशेष म्हणजे मोदी आमदारकीची निवडणूक न लढवता थेट मुख्यमंत्रीपदी बसले आणि खासदार झाल्यावर थेट पंतप्रधान पदावर त्यांना बसवण्यात आले. देशात असे अन्य कुणीही झालेले नाही. राजीव गांधी थेट पंतप्रधान झाले होते; मात्र ते पुढच्या वेळी पुन्हा पंतप्रधान होऊ शकले नव्हते. मोदी यांच्या या यशाचा अभ्यास करणे आवश्यक आहे; कारण केवळ विकास आणि करिश्मा (चमत्कार) असला, म्हणजे जनता मत देते, असे होत नाही, तर जनतेचा विश्वास प्राप्त करणे सर्वांत महत्त्वाचे असते अन् तो विश्वास पंतप्रधान मोदी यांनी प्रथम पक्षाचा, नंतर मुख्यमंत्री म्हणून गुजरात राज्याचा आणि आता पंतप्रधान म्हणून देशातील जनतेचा संपादन केला आहे. इतकेच नव्हे, तर विदेशात रहाणारे भारतीय आणि अनेक विदेशी नागरिक, राष्ट्रप्रमुखही मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करू लागले आहेत.
७ जून या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘मोदी यांचे ५३ वर्षांचे सार्वजनिक जीवन, हिंदु धर्माला पुनर्प्रतिष्ठा मिळवून देणारे संन्यस्त वृत्तीचे पहिले प्रखर हिंदुत्वनिष्ठ पंतप्रधान’ यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/801430.html
४. मोदी यांनी पंतप्रधानपदी आल्यावर विविध क्षेत्रांत केलेले कार्य !
४ आ ४. राफेल खरेदी : यापूर्वी संरक्षणविषक शस्त्र खरेदी करतांना त्यात भ्रष्टाचार झाला नाही, असे झाले नव्हते. ‘बोफोर्स’ हे त्याचे एक मोठे उदाहरण आहे. मोदी यांनी हा इतिहास पालटला. फ्रान्सकडून ‘राफेल’ या लढाऊ विमानांची खरेदी करतांना कोणताही भ्रष्टाचार किंवा दलालीची घटना घडली नाही.
४ आ ५. चीन सीमेवर सैन्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे : मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम चीन सीमेवर सैन्यासाठी पायाभूत सुविधा युद्धपातळीवर निर्माण करण्यास प्रारंभ केला. येथे गेल्या १० वर्षांत रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी, हिवाळ्यात सैन्याला सीमेपर्यंत रसद पुरवठा अखंडित होण्यासाठी अनेक ठिकाणी बोगदे बांधण्यात आले. गेल्या ७५ वर्षांत जे करण्यात आले नाही, ते मोदी यांनी १० वर्षांत चीनच्या सीमेवर करून दाखवले. या सुविधा नसल्यामुळेच वर्ष १९६२ च्या युद्धात भारतीय सैन्याला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याची पुनरावृत्ती होऊ नये, असा निर्णय आणि प्रयत्न नंतर काँग्रेसने अन् अन्य कोणत्याही सरकारने केला नव्हता. वर्ष २०२० मध्ये चीनसीमेवरील डोकलाम येथे चीन आणि भारतीय सैन्य यांच्यात झालेल्या संघर्षांत भारताचे २० सैनिक वीरगतीला प्राप्त झाले; मात्र भारताने चीनचे ४० हून अधिक सैनिकांना यमसदनी पाठवले, हे शौर्य त्याचेच दर्शक होय.
४ इ. सामाजिक
४ इ १. स्वच्छता अभियान : मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी लगेचच ‘स्वच्छ भारत अभियान’ प्रारंभ केला आणि आजही ते ठिकठिकाणी यासाठी प्रयत्न करत आहेत. मोदी स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छता करत असल्याचे चित्र अनेकदा पहायला मिळाले आहे.
४ इ २. शेतकर्यांना पैसे : शेतकर्यांना आर्थिक साहाय्य म्हणून त्यांनी प्रत्येक मासाला १ सहस्र रुपये म्हणून थेट बँकेत जमा करण्यास चालू केले. त्यामुळे शेतकर्यांना थोडासा दिलासा मिळत आहे.
४ इ ३. कोरोना महामारीवरील लस : कोरोनाच्या काळात अमेरिका आणि काही युरोपीय देशांनी लस बनवण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी भारतानेही प्रयत्न केला आणि त्यात यशस्वी झालो; मात्र अन्य देशांनी शोधलेली लस कधीही विदेशांतील गरीब अन् गरजवंत देशांना पुरवली नाही, ते कार्य मोदी यांनी केले. संकटाच्या समयी भारत जगाला साहाय्य करण्यासाठी धावून गेला. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ (संपूर्ण पृथ्वी हे कुटुंब आहे.) हे प्रत्यक्ष कृती करून दाखवून दिले.
४ इ ४. विनामूल्य धान्य : कोरोना काळात आणि नंतरही काही मास जनतेला रेशनच्या माध्यमातून विनामूल्य धान्य उपलब्ध करून दिले.
४ इ ५. मन की बात : जनतेशी थेट संवाद करणारे पंतप्रधान मोदी हे जगातील पहिलेच पंतप्रधान असतील, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. आज उपग्रह दूरचित्रवाहिनीच्या युगात, सामाजिक माध्यमांच्या युगात पंतप्रधान मोदी यांनी रेडिओच्या माध्यमातून जनतेशी प्रत्येक मासाला संवाद साधण्याचा प्रयत्न केला. महिन्याभरात देशात विविध लोकांनी जे काही चांगले केले, त्यांना या कार्यक्रमातून प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. गेली जवळपास १० वर्षे हा कार्यक्रम नियमित चालू आहे.
४ ई. अर्थ (वित्त)
४ ई १. नोटाबंदी : वर्ष २०१४ मध्ये काँग्रेसकडून भाजपकडे सत्ता आल्यानंतर देशात भ्रष्टाचाराची पुष्कळ प्रकरणे होती; कारण ‘काँग्रेस म्हणजेच भ्रष्टाचार’, अशी व्याख्या करावी लागते. याखेरीज पाकिस्तानकडून भारताच्या ५०० रुपयांच्या बनावट नोटा भारतात पाठवण्यात येत होत्या. काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी याच नोटांचा वापर करत होते. भ्रष्टाचार आणि आतंकवाद यांच्यावर आघात करण्यासाठीच पंतप्रधान मोदी यांनी अचानक नोटाबंदी करत ५०० रुपयांच्या नोटा बाद केल्या. या निर्णयावरून त्यांच्यावर टीकाही झाली; मात्र काश्मीरमधील दगडफेकीच्या घटना हळूहळू बंद झाल्या.
४ ई २. जगातील ५ वी अर्थव्यवस्था : भारताला जगातील ५ वी मोठी अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे स्वप्न मोदी यांनी ठेवले आणि ते प्रत्यक्षात साकारही केले. आता त्यांनी भारताला ३ री मोठी अर्थव्यवस्था करण्याचे ठरवले आहे. ते यात यशस्वीही होतील, असेच तज्ञांचेही म्हणणे आहे.
४ ई ३. युपीआय : युपीआय ही पैसे देवाणघेवाण करणारी भारताची निर्मिती आहे आणि जगाला त्याचे आश्चर्य आहे. अनेक देश त्यांच्या देशामध्ये ही प्रणाली लागू करण्यास प्रयत्नरत आहेत. अनेक देशांमध्ये या प्रणालीद्वारे भारतीय रुपयांद्वारे पैशांचे व्यवहार करू शकत आहेत.
४ उ. राष्ट्र
४ उ १. कलम ३७० रहित करणे : काश्मीरला भारतापासून नेहमीच वेगळे वागवणारे हे कलम हिंदूंसाठी आणि देशवासियांसाठी त्रासदायक होते, तर आतंकवादी आणि जिहादी यांना लाभदायी होते. ते कलम रहित करणे, हे भाजपचे अनेक वर्षांचे ध्येय होते. हे ध्येय पंतप्रधान मोदी यांनी पूर्ण केले. कलम ३७० रहित करण्यासहित काश्मीर आणि लडाख यांना वेगळे केले; कारण या दोन्ही भागांतील संस्कृती वेगवेगळी होती. काश्मीरमुळे लडाखचा विकास झाला नव्हते, हेही पंतप्रधान मोदी यांनी लक्षात घेऊन लडाख वेगळे ‘केंद्रशासित राज्य’ बनवले.
४ ऊ. परराष्ट्र धोरण : गेल्या १० वर्षांत भारताच्या परराष्ट्र धोरणांत आमूलाग्र पालट झाला आहे, हे भारतच नाही, तर संपूर्ण जग म्हणत आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी जगात भारताची बाजू ठामपणे आणि मुत्सद्दीपणे मांडली आहे. पंतप्रधान मोदी यांचे आखाती देशांशीही चांगले संबंध निर्माण झाले आहेत. कधी नव्हे, तर संयुक्त अरब अमिरातमध्ये पहिले हिंदु मंदिरे उभारण्यात आले. काही इस्लामी देशांनी मोदी यांना त्यांच्या देशाचा सर्वाेच्च पुरस्कार दिला आहे. पंतप्रधान मोदी ज्या देशांत जातात तेथील भारतीय वंशांच्या लोकांची विशेष भेट घेतात. मोठ्या संख्येने रहाणार्या देशांतील हिंदूंसाठी वेगळा कार्यक्रम आयोजित करतात. उदा. अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया. त्यामुळे विदेशात रहाणार्या भारतियांना एक प्रकारचा आत्मविश्वासच निर्माण झाला आहे, तसेच त्या देशांतील शासनकर्त्यांनाही तेथील भारतियांकडे भारताच्या पंतप्रधानांचे लक्ष आहे, हे समजते.
४ ऊ १. युक्रेन-रशिया युद्ध : या युद्धात अमेरिकेने रशियावर अनेक बंधने घातली. तसेच रशियाशी कुणीही संबंध ठेवू नये, असे सांगितले; मात्र भारताने याकडे दुर्लक्ष करत रशियाकडून इंधन तेल खरेदी केले. यावर अमेरिकेने भारताला काहीच म्हटले नाही. उलट ‘ते भारताचे स्वातंत्र्य आहे’, असे सांगितले. यावरून भारताची जागतिक मंचावर पत दिसून येते. भारताने रशियाकडून तेल घेऊन युरोपीय देशांना विकले. असे कधी होईल, असे कुणालाच कधी वाटले नव्हते, ते भारताने केले.
(क्रमशः सोमवारच्या दैनिकात)
– श्री. प्रशांत कोयंडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.