द्वेषमूलक वक्तव्यांचे स्वरूप आणि ते थांबवण्याचे उपाय !

उदयनिधी स्टॅलिन

‘गेली ४-५ वर्षे चित्रपट निर्माते, नट-नट्या, राजकारणी यांच्याकडून हिंदू आणि सनातन हिंदु धर्म यांना लक्ष केले जात आहे. अलीकडे तमिळनाडूचे उदयनिधी स्टॅलिन, ए. राजा आणि बिहारचे स्वामी प्रसाद मौर्य यांनी केलेली विधाने आपल्याला ठाऊक आहेतच. अशा लोकांना महाराष्ट्रातील हिंदुविरोधी मंडळी समर्थन करत असतात. काही मौलवी जाणीवपूर्वक हिंदुविरोधी वक्तव्ये करतात. अभिनेते नसिरुद्दीन शहा, गीतकार जावेद अख्तर यांसारखी मंडळी, तर कायमच गरळओक करत असतात. अशा लोकांच्या विरुद्ध गुन्हे नोंदवल्याचे दर्शवले जाते; मात्र पुढे काहीच कारवाई होत नाही. यावर लोकशाही मार्गाने काय उपाययोजना करू शकतो, हे या लेखात पाहूया.

(पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी

१. हिंदूंच्या विरोधात द्वेषमूलक प्रचार

तबलिगींनी भारतात ‘कोविड’ हा दुर्धर रोग अधिक प्रमाणात पसरवला, हे देशभरात समजले. त्यानंतर धर्मांधांनी एक नवीन खेळी खेळली. ‘उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये झालेल्या कुंभमेळ्यातून हा आजार पसरला’, असा द्वेषमूलक खोटा प्रचार करण्यात आला. वास्तविक ज्या उत्तरेत कुंभमेळा भरतो, तेथील गंगेच्या परिसरात कुणीही रुग्ण आढळून आले नाहीत. याउलट ज्या ज्या शहरांमध्ये तबलिगी गेले, त्या त्या मोठ्या शहरांमध्ये हा आजार वेगाने पसरला. कावेबाज धर्मांधांनी मोदी सरकारमध्ये त्यांचे फाजील लाड होणार नाहीत, हे ओळखले. त्यानंतर साम्यवादी, समाजवादी, पुरोगामी अशा सर्वांनी उजव्या विचारसरणीच्या लोकांविरुद्ध कुभांड रचणे चालू केले. आधी हिंदूंची खोडी काढायची, दंगली करायच्या, हिंदूंवर आक्रमणे करायची आणि त्याला प्रतिकार झाला की, मग ओरडत फिरायचे, हे त्यांचे नित्याचेच आहे. अयोध्येवरून रेल्वेने परतणार्‍या ५९ कारसेवकांना जिवंत जाळण्यात आले. त्यानंतर झालेला प्रतिकार धर्मांधांना सहन करता आला नाही; परंतु त्या निमित्ताने हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधात आजही द्वेषमूलक विधाने केली जातात. हीच गोष्ट मुंबईत झाली. राधाबाई चाळपासून बेहराम पाड्यापर्यंत अनेक हिंदूंच्या हत्या झाल्या. त्याला प्रतिकार करण्यात आला. त्यानंतर श्रीकृष्ण आयोग नेमण्यापर्यंत धर्मांधांचे रडगाणे चालू झाले.

२. धर्मांधांचे आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये वर्चस्व

आंतरराष्ट्रीय स्तरावर द्वेषमूलक वक्तव्याचा काय अर्थ आहे ? आणि तो कुणासाठी वापरला आहे, हे जाणून घेऊया. संयुक्त राष्ट्रे किंवा ‘युनेस्को’ या आंतरराष्ट्रीय संस्थांनी ‘द्वेषमूलक’ हा शब्द धर्मांध मुसलमानांचे हित जपण्यासाठी काढला. त्याचा सर्व युरोपमध्ये उदो उदो झाला. त्यानंतर धर्मांधांवरील कथित अत्याचारांविषयी तेथे याचिका प्रविष्ट (दाखल) झाल्या. त्यातही त्यांचे हित जोपासले गेले. ‘हमास’च्या आतंकवाद्यांनी इस्रायलचे नागरिक मारले आणि काही नागरिकांना ओलीस ठेवून त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. त्यानंतर इस्रायलने त्याचा प्रतिशोध घेतला, तेव्हा धर्मांध सर्व जगभर रडत फिरले आणि त्यांच्यावर कसा अन्याय होत आहे, हे दाखवले. आजही युरोपमध्ये धर्मांध मुसलमानांचे कोडकौतुक केले जाते. संयुक्त राष्ट्रांच्या व्याख्येत रवांडामध्ये वर्ष १९९४ मध्ये तुत्सू लोकांचे जे हत्याकांड झाले, त्याला ‘जेनोसाईड’ (वंशविच्छेद) असे म्हटले गेले. वर्ष १९९० मध्ये काश्मीरमध्ये धर्मांध मुसलमानांनी साडेचार लाख हिंदूंना हाकलून दिले आणि लक्षावधी हिंदूंचा वंशविच्छेद केला, तसेच त्यांची घरेदारे, फळबागा हस्तगत केल्या; पण त्याला संयुक्त राष्ट्रे ‘जेनोसाईड’ म्हणायला सिद्ध नाही. त्यांच्या पुनर्वसनाविषयी एकाही जागतिक संघटनेला प्रयत्न करावेसे वाटत नाहीत.

३. द्वेषमूलक वक्तव्यांविषयी न्यायालयांचा दुजाभाव

समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य

या द्वेषमूलक वक्तव्यांविषयी सर्वोच्च न्यायालयाची अनेक निकालपत्रे आलेली आहेत. ‘प्रवासी भलाई संघटना विरुद्ध केंद्र सरकार’, ‘जाफर इमाम नबी विरुद्ध निवडणूक आयोग’, ‘तहसीन पुनावाला विरुद्ध केंद्र सरकार’, ‘कोंडून गुल्लूर फिल्म सोसायटी विरुद्ध केंद्र सरकार’, अशी काही निकालपत्रे द्वेषमूलक वक्तव्यांविषयी आहेत. ही निकालपत्रे धर्मांधांवर अतिशय अत्याचार होत आहेत, अशा आशयाची आहेत. त्याचा उपयोग हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह, ‘सुदर्शन’ वृत्तवाहिनीचे संपादक सुरेश चव्हाणके यांच्यासारख्या हिंदु धर्माभिमान्यांना सभेत बोलण्यापासून परावृत्त करण्यासाठी होत असतो. आज उदयनिधी स्टॅलिन, स्वामीप्रसाद मौर्य, ए. राजा यांनी हिंदूंच्या विरोधात ‘डास, डेंग्यू याप्रमाणे चिरडून टाकू, संपवू’, अशी वक्तव्ये केली; मात्र त्यांना काहीही झाले नाही. ‘रामचरितमानस जाळून टाकायला पाहिजे’, असे वक्तव्य करणार्‍या स्वामी प्रसाद मौर्य यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. तेव्हा ते सर्वोच्च न्यायालयात गेले आणि त्यांनी फौजदारी गुन्ह्यांचे खटले स्थगित करण्याची विनंती केली. त्यानंतर न्यायालयाने त्यांच्या बाजूने आदेश दिला.

अशा अनेक गोष्टी हिंदूंच्या विरोधात घडत असतांना हिंदू निमूटपणे बघत असतात. प्रत्येक गोष्टींचे पक्षीय दृष्टीकोनातून मूल्यांकन केले जाते. कुणी हिंदु धर्माला संपवण्याची भाषा केली, तरी हिंदूंना वाईट वाटत नाही; कारण त्यांची मने मुर्दाड झाली आहेत.

४. द्वेषमूलक वक्तव्यांच्या विरोधात उपाययोजना

अ. द्वेषमूलक वक्तव्याने धार्मिक आणि जातीय भावना दुखावणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे त्या विरोधात ‘प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल ॲक्ट’, कलम ७; ‘रिलिजिअस इन्स्टिट्यूशन्स ॲक्ट (प्रिव्हेंशन ऑफ मिसयुज)’ कलम ३ ते ६ प्रमाणे गुन्हा नोंदवता येतो. लिखाण, भाषण, कार्टून, सामाजिक माध्यमे, वृत्तवाहिन्या आदींच्या माध्यमातून द्वेषमूलक वक्तव्ये केली जातात. त्यामुळे सर्वप्रथम द्वेषमूलक वक्तव्ये कोणत्या माध्यमातून केली आहेत, याचा शोध घ्यावा. हे सर्व आपल्याकडे संग्रही पुरावा म्हणून जपून ठेवावे. त्या विरोधात लोकशाही मार्गाने हिंदु समाज आणि हिंदूंच्या विविध संघटना यांमध्ये जागृती करावी. त्यानंतर काही संघटना, अधिवक्ते, पत्रकार यांनी पोेलिसांकडे लेखी तक्रार द्यावी. द्वेषमूलक वक्तव्याच्या विरोधात फौजदारी गुन्हे नोंदवण्यासाठी आग्रही रहावे. ‘माहिती-तंत्रज्ञान कायदा’, ‘भारतीय दंड विधान कलम, १५३ अ, १५३ ब, १५३ (२), तसेच २९५, २९८, ५०५ (१) (२) या अंतर्गत गुन्हा नोंद होऊ शकतो.

आ. राजकारण्यांनी द्वेषमूलक विधाने केली असतील, तर त्यांच्याविरुद्ध ‘रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्ट १९५१, कलम ८ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यासाठी आग्रही राहू शकतो. जर हा गुन्हा भारतीय दंड विधानाप्रमाणे आणि ‘रिलिजिअस इन्स्टिट्यूशन्स ॲक्ट (प्रिव्हेंशन ऑफ मिसयुज)’ कलम ३ ते ६ प्रमाणे गुन्हा सिद्ध झाला, तर संबंधित राजकारणी ६ वर्षे निवडणूक लढवू शकत नाही.

इ. द्वेषमूलक वक्तव्य करणार्‍या लोकप्रतिनिधींच्या विरोधात परिस्थितीनुसार विधान परिषद आणि विधानसभा यांचे सभापती, राज्यपाल, राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष किंवा राज्यसभेचे सभापती यांच्याकडे निवेदन देऊ शकतो. त्यानंतर त्यांच्या विरोधात काहीच कारवाई झाली नाही, तर ना उमेद न होता दोषीविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यासाठी रिट याचिका करता येते.

ई. द्वेषमूलक वक्तव्य करणार्‍या राजकीय नेत्यांच्या विरोधात त्यांच्या सभा किंवा कार्यक्रम यांच्या ठिकाणी जाऊन लोकशाही मार्गाने विरोध दर्शवता येतो. आपल्या भागात नेहमी द्वेषमूलक वक्तव्य करणार्‍याची सभा असल्यास त्या विरोधात स्थानिक जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिकारी यांना भेटू शकतो, तसेच त्यांना ‘संबंधित व्यक्तीमुळे समाजात जातीय तेढ निर्माण होऊन अशांतता निर्माण होऊ शकते’, या आशयाचे निवेदन देता येते. (२३.५.२०२४)

५. पोलिसांनी द्वेषमूलक तक्रारींची नोंद न घेतल्यास काय करावे?

द्वेषमूलक वक्तव्याच्या विरोधात केलेल्या फौजदारी तक्रारीची पोलिसांनी नोंद घेतली नाही, तर अधिवक्त्याच्या माध्यमातून ‘फौजदारी प्रक्रिया संहिते’च्या १५६ (३) अन्वये न्यायालयात प्रकरण प्रविष्ट करून गुन्हा नोंदवू शकतो. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई होऊ शकते. आपण उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय येथे द्वेषमूलक वक्तव्य केल्याप्रकरणी पीडितांसाठी दाद वा हानीभरपाईही मागू शकतो, तसेच पीडितांना संरक्षण मिळण्यासाठी आग्रही राहू शकतो.

६. द्वेषमूलक वक्तव्याच्या विरोधात सनदशीर मार्गाने यश मिळाल्याची उदाहरणे

द्वेषमूलक वक्तव्याच्या विरोधात सनदशीर मार्गाने यश मिळाल्याची अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. धर्मद्वेष्टे चित्रकार एम्. एफ्. हुसेन यांच्या विरुद्ध १ सहस्र २०० तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे ते भारतात मरेपर्यंत येऊ शकले नाहीत, तसेच मेल्यानंतरही त्यांचे भारतभूमीत दफन होऊ शकले नाही. त्याचप्रमाणे हिंदुद्वेष्टे डॉ. झाकीर नाईक यांच्या विरोधातही अनेक निवेदन देण्यात आली आणि फौजदारी याचिका करण्यात आल्या. परिणामी सरकारने त्यांच्या संघटनेवर बंदी घालण्यात आली.

७. द्वेषमूलक वक्तव्यांच्या विरोधात सक्षम कायदे करणे आवश्यक !

आपण जेव्हा विविध स्तरावर संघटित होऊन हिंदुद्वेष्ट्यांच्या विरोधात एखादे सूत्र आग्रहपूर्वक पुढे रेटतो, तेव्हा सध्याचे कायदे त्यांना दंडित करण्यासाठी सक्षम आहेत का ? याचाही विचार करणे आवश्यक आहे. सध्या देहलीत हिंदुत्वनिष्ठ सरकार तिसर्‍यांदा सत्तेत येत आहे. त्यामुळे द्वेषमूलक वक्तव्य करणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करणारे कायदे करण्यासंदर्भात त्यांना आग्रह करू शकतो.

८. द्वेषमूलक वक्तव्यांच्या विरोधात प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जागृती

द्वेषमूलक वक्तव्य लक्षात आल्यावर त्याविरोधात फेसबुक, एक्स (पूर्वीचे ट्विटर), इन्स्टाग्राम आदी सामाजिक माध्यमांतून जागृती करावी. ज्यांच्या विरोधात द्वेषमूलक वक्तव्य करण्यात आली, त्यांच्या पाठीशी उभे रहाण्याचा प्रयत्न करावा. याखेरीज दोषी व्यक्तींविरुद्ध आपण वर्तमानपत्रात लेख लिहू शकतो, तसेच सामाजिक माध्यमातून संबंधित विषयाचे खंडण करून हिंदूंमध्ये जागृती करू शकतो. आज ‘सङ्घे शक्तिः कलौ युगे’ (कलियुगात संघटितपणातच सामर्थ्य आहे.) ही उक्ती महत्त्वाची आहे. त्यामुळे सर्वांनी संघटित राहून हे धर्मकार्य करावे.’

श्रीकृष्णार्पणमस्तु ।

– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय (२३.५.२०२४)द्वेषमूलक वक्तव्यांविषयीचे प्रातिनिधिक चित्र