डॉ. बापूजी साळुंखे अभियांत्रिकी महाविद्यालयात विविध शिष्यवृत्ती योजना घोषित !
कोल्हापूर, ७ जून (वार्ता.) – श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या ‘डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी’ मध्ये शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि संस्थामाता श्रीमती सुशिलादेवी साळुंखे शिष्यवृत्ती घोषित करण्यात येत आहे. उच्च दर्जाचे अभियांत्रिकी शिक्षण विद्यार्थ्यांना अगदी माफक शुल्कामध्ये उपलब्ध व्हावे, असा उद्देश या शिष्यवृत्तीच्या निर्मितीमागे आहे, अशी माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कौस्तुभ गावडे पुढे म्हणाले, ‘‘या योजनेच्या अंतर्गत जे विद्यार्थी महाविद्यालयात प्रवेश घेतील, त्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार शैक्षणिक शुल्कात सवलती मिळतील. या योजनेच्या अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेमध्ये ९५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळतील, त्यांना १०० टक्के शिक्षणशुल्क माफ होईल. ज्यांना ८५ ते ९५ टक्के इतके गुण मिळतील, त्यांना ७५ टक्के शिक्षणशुल्क माफ होईल, तसेच ज्यांना ७५ ते ८५ टक्के गुण मिळतील, त्यांचे ५० टक्के शिक्षणशुल्क माफ होईल.’’
या प्रसंगी प्राचार्य वीरेन भिर्डी म्हणाले, ‘‘यंदाच्या वर्षीपासून आम्ही ‘ए.आय. ओरिएन्टेड’ पदविका चालू करत आहोत. यासाठी ६० जागा असतील. आमच्या महाविद्यालयात अभियांत्रिकेची पदविका करणार्या १०० विद्यार्थ्यांना आम्ही विविध आस्थापनांमध्ये चाकरी देतो. यंदा दुबईतील आस्थापनात आमच्या विद्यार्थ्यांना चाकरी मिळाली आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभय कुमार साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणार्या या योजनांचा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांनी घ्यावा.’’