‘तिरुमला’चे सुरेश कुटे आणि अर्चना कुटे पोलिसांच्या कह्यात !

बीड येथील कोट्यवधी रुपयांचे ‘ज्ञानराधा बँक घोटाळ्या’चे प्रकरण !

बीड – राज्यभर गाजलेल्या कोट्यवधी रुपयांच्या ‘ज्ञानराधा बँक घोटाळ्या’च्या प्रकरणी ‘तिरुमला उद्योग समुहा’चे प्रमुख सुरेश कुटे, त्यांच्या पत्नी अर्चना कुटे आणि सहसंचालक आशिष पाटोदेकर यांना बीड पोलिसांनी पुणे येथून कह्यात घेतले आहे. त्यांना पोलिसांनी ठेवीदारांच्या ठेवी कशा परत करणार ?, तसेच ‘आर्.बी.आय.’ समवेत झालेला पत्रव्यवहार सादर करण्यास सांगितले आहे. सुरेश कुटे यांच्यावर ठेवीदारांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी ११ गुन्हे नोंद आहेत. ठेवीदारांचे पैसे कसे देणार ? या संदर्भात कुटे यांना पोलिसांना पुरावे सादर करावे लागणार आहेत, हे पुरावे जर समाधानकारक नसतील, तर पोलीस त्यांच्यावर अटकेची कारवाई करतील, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

महाराष्ट्रामधील एक प्रमुख उद्योगसमूह म्हणून ओळख असलेल्या बीडमधील तिरुमला उद्योग समूह खाद्यतेल, दुग्धजन्य पदार्थ, तेल, वाहनांचे सुटे भाग यांसह अन्य उत्पादने सिद्ध करतो. या उद्योगसमुहात ६ लाख ५० सहस्र ठेवीदारांचे ३ सहस्र कोटी रुपये अडकले आहेत. गेल्या ८ दिवसांपासून ज्ञानराधाच्या ५१ पैकी २६ शाखा बंद आहेत. ज्ञानराधाच्या संचालक मंडळाच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करूनही गुन्हा नोंद न झाल्याने खातेदारांनी न्यायालयात तक्रार प्रविष्ट केली. यावर सुनावणी होऊन न्यायाधीशांनी आदेश दिल्यास ज्ञानराधाच्या विरोधात गुन्हे नोंद झाले.