पुणे येथे किरकोळ कारणावरून पोलीस कर्मचार्याकडून मारहाण !
पुणे – ‘पोलीस लाईनमध्ये (पोलीस वसाहतीमध्ये) कशाला येता ?’, असे म्हणत पोलीस शिपाई मंगेश कांबळे यांनी मारहाण केल्याची तक्रार खडक पोलीस ठाण्यात सोमनाथ शेडगे यांनी केली आहे. ही घटना ५ जून या दिवशी दुपारी साडेबारा वाजता स्वारगेट पोलीस लाईन येथे घडली आहे. या प्रकरणी मंगेश कांबळे या पोलीस कर्मचार्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (अशा प्रकारे नागरिकांना दरडावणारे आणि मारहाण करणारे कायद्याचे रक्षक असू शकतात का ? – संपादक)
तक्रारदार हे पोलीस लाईनशेजारी रहातात. ४ जून या दिवशी त्यांनी स्वत:ची दुचाकी पोलीस लाईनमध्ये उभी करून ते बाहेर गेले. परत आल्यानंतर ते दुचाकी घेण्यासाठी पोलीस लाईनमध्ये गेले. तेव्हा कांबळे यांनी ‘तुम्ही येथे थांबू नका’, असे म्हणत शिवीगाळ केली, तसेच हातातील स्टीलचे ताट तोंडावर मारले. घरातून लोखंडी सळई (रॉड) घेऊन तक्रारदाराच्या पाठीवर आणि डोक्यात वार करून घायाळ केले.