रक्ताचा नमुना हा मुख्य अल्पवयीन आरोपीच्या आईचाच !
पुण्यातील ‘पोर्शे’ कार अपघात प्रकरण
|
पुणे – कल्याणीनगर ‘पोर्शे’ कार अपघातातील अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी त्याची आई शिवानी अग्रवाल यांनी स्वत:च्या रक्ताचा नमुना दिला होता. रक्ताचा नमुना हा आईचाच असल्याचा अहवाल ‘प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळे’ने दिला आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयामध्ये दिली. पुरावा नष्ट करण्यासाठीच हे कृत्य केले असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. या प्रकरणामध्ये मुलाची आई, वडील, डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरि हळनोर, शिपाई अतुल घटकांबळे यांच्या पोलीस कोठडीत १० जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. हा आदेश विशेष न्यायाधिश व्ही.आर्. कचरे यांनी दिला.
अस्वच्छ कोठडीत ठेवले जात आहे !
अल्पवयीन मुलाची आई शिवानी यांना फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारातील कोठडीमध्ये ठेवण्यात आले आहे. कोठडीत अस्वच्छता आहे. त्यामुळे त्रास होत असल्याची तक्रार त्यांनी न्यायालयामध्ये केली. त्यांच्या तक्रारीची नोंद घेत ‘अधिवक्त्यांद्वारे न्यायालयामध्ये तक्रार नोंदवावी’, असे न्यायालयाने सांगितले.
आधुनिक वैद्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस !
‘ससून’मधील डॉ. तावरे आणि डॉ. हळनोर यांना अटक केल्यानंतर ‘महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल, मुंबई’ने ‘कारणे दाखवा’ नोटीस दिली आहे. त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी ७ दिवसांची समयमर्यादा दिली आहे.
‘कागदपत्रे मिळावीत’, अशी डॉ. हळनोर यांची मागणी !
‘महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल, मुंबई’ने ‘कारणे दाखवा’ नोटीसीला उत्तर देण्यासाठी ‘डॉ. हळनोर यांना कागदपत्रांची आवश्यकता असून ती कागदपत्रे बी.जे. मेडिकल महाविद्यालयातील खोलीत आहेत. ती खोली मोहोरबंद (सील) करण्यात आली आहे. भ्रमणभाष पोलिसांच्या कह्यात आहे. खोलीतील कागदपत्रे मिळावीत’, अशी मागणी डॉ. हळनोर यांची बाजू मांडणारे अधिवक्ता ऋषिकेश गानू यांनी केली. त्यावर अन्वेषण अधिकारी साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयामध्ये सांगितले, ‘बी.जे. मेडिकल महाविद्यालयातील डॉ. हळनोर यांची खोली पोलिसांनी नाही, तर ‘ससून प्रशासना’ने मोहोरबंद केली आहे.’
अल्पवयीन आरोपीला १२ जूनपर्यंत ‘बालसुधारगृहा’त ठेवा !
अपघातातील मुख्य अल्पवयीन आरोपीला ५ जूनपर्यंत ‘बालसुधारगृहा’मध्ये ठेवण्याचा आदेश दिला होता; परंतु मुलाचे अद्याप समुपदेशन चालू आहे. सुधारगृहातून सुटका झाल्यास त्याच्या जीविताला धोका आहे, अशी माहिती मंडळातील सरकारी अधिवक्ते आणि पोलीस यांनी दिली. त्यावर त्याला १२ जूनपर्यंत ‘बालसुधारगृहा’मध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
पबमालकांच्या जामीन अर्जावर १० जून या दिवशी सुनावणी !
अल्पवयीन मुलांना मद्य दिल्याच्या प्रकरणी ‘हॉटेल ब्लॅक’ आणि ‘कोझी पब’चे मालक अन् व्यवस्थापक यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर १० जून या दिवशी सुनावणी होणार आहे.