व्यष्टी आणि समष्टी साधना करून सहजतेने शीघ्र आध्यात्मिक उन्नती करून देणारा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी निर्मिलेला गुरुकृपायोग !
६ जून २०२४ या दिवशीच्या भागात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची माहिती पाहिली. या भागात त्यांनी निजधर्म पाळून ‘साधना आणि धर्मरक्षण यांसाठी कसे प्रयत्न करायला सांगितले ?’, ते कीर्तनसेवेच्या माध्यमातून पहाणार आहोत.
(भाग ४)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/801105.html
९. साधनेने जिवातील रज-तम न्यून होऊन सत्त्वगुण वाढतो, म्हणजेच ‘जिवाची आध्यात्मिक पातळी वाढते.
(आध्यात्मिक पातळी, म्हणजे वस्तू किंवा जीव यांच्यातील सात्त्विकतेची पातळी !)
९ अ. आध्यात्मिक पातळी : ‘ईश्वर म्हणजे १०० टक्के आध्यात्मिक पातळी’, असे येथे गृहीत धरले आहे.
१. दगड किंवा निर्जीव वस्तू यांची आध्यात्मिक पातळी १ ते ५ टक्के, इतर जीवसृष्टी यांची ६ ते १९ टक्के असते. जीव जेव्हा मनुष्याचा जन्म घेतो, तेव्हा त्याची पातळी २० टक्के असते. जसा त्याच्यातील सत्त्वगुण वाढत जातो, तशी त्याची पातळी वाढत जाते.
२. आध्यात्मिक पातळी २५ टक्के असतांना व्यक्तीचे मन ‘मौजमजा करणे’ यात रमते, तर ३० टक्के पातळी झाल्यावर ‘थोडे फार देवाचे करणे, पोथी वाचन करणे, स्तोत्रे म्हणणे, देवळात जाणे, कीर्तन-प्रवचन ऐकणे’ इत्यादींत रमते.
३. आध्यात्मिक पातळी ३५ टक्के झाल्यावर व्यक्ती नामजपासाठी वेळ काढू लागते आणि तिचा नामजप एकाग्रतेने होऊ लागतो.
४. आध्यात्मिक पातळी ४० टक्के झाल्यावर व्यक्तीचा अधूनमधून आपोआप नामजप होऊ लागतो आणि व्यक्ती दैनंदिन कामकाज सांभाळून नामजप अन् ध्यान करते.
५. आध्यात्मिक पातळी ५० टक्के असतांना नामजप आणि ध्यानधारणा याला आधी महत्त्व दिले जाते, त्यानंतर इतर कामे केली जातात.
६. आध्यात्मिक पातळी ५५ टक्के झाल्यावर मनुष्याकडून तन-मन-धन यांचा त्याग होऊ लागतो आणि त्याच्या जीवनात गुरु येतात.
प्रत्येकाने अंतर्मुख होऊन ‘आपली पातळी किती आहे ?’, हे जाणून घ्यावे. पातळी वाढवण्यासाठी अष्टांग साधनेचा आधार घेऊन प्रयत्न करावा; कारण शेवटी प्रत्येक जिवाचे ध्येय ईश्वरप्राप्तीच आहे.
९ आ. गुरुकृपायोगानुसार साधना करून साधकांची झालेली आध्यात्मिक उन्नती : गुरुकृपायोगानुसार साधना करून आतापर्यंत १ सहस्र ५८ साधक ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाले आहेत, तर १२७ साधक ७० टक्के आध्यात्मिक पातळी गाठून संतपदावर आरूढ झाले आहेत.
९ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी लावलेल्या साधनेच्या इवल्याशा रोपाचा आता वटवृक्ष झाला असणे : ३० – ३५ वर्षांपूर्वी सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींनी साधनेचे जे इवलेसे रोप लावले होते, त्याचा आज वटवृक्ष झाला आहे.
इवलेसे रोप लावियेले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी ।
याप्रमाणे समष्टी सेवेचा वटवृक्ष बहरला आहे. तो कसा ?
९ ई. पोवाडा
गुरुआज्ञापालने धर्मप्रसारासाठी सभा घेतल्या,
दिली विज्ञानाची साथ धर्माला ।
केला निधर्मींचा पारिपात,
आले धर्माला वैभव खास हो जी जी ।। १ ।।
गुरुकृपायोग साधना शिकवी साधकाला,
दूर सारण्या दोषांना, अष्टांग साधनेची जोडूनी साथ ।
समष्टी सेवेला देऊनी महत्त्व,
झाली मग साधकांची भरभराट हो जी जी ।। २ ।।
धर्मशिक्षण कारणे केला ग्रंथ लेखनाला,
ज्ञान सांगण्याला, शेकडो ग्रंथांचा केला आविष्कार ।
धर्माचे रूप दाविले साकार,
‘सनातन प्रभात’ची केली सुरुवात हो जी जी ।। ३ ।।
हिंदुत्व टिकवण्यासाठी, न्याय मिळण्यासाठी,
जागृत करण्यासाठी, हिंदु जनजागृतीचा उद्गार ।
हिंदू विधीज्ञ परिषद देती ललकार,
हिंदु राष्ट्र्राची झाली पुकार हो जी जी ।।४ ।।
१४ विद्या ६४ कला या माध्यमे केला, चाचण्या घेतल्या,
जगा शिकविण्या योग्य आचार ।
होण्या ईश्वरीय साक्षात्कार,
स्थापिले अध्यात्म विश्वविद्यालय हो जी जी ।। ५।।
हिंदूंचे व्हावे संघटन, दुष्ट प्रवृत्तींचे निर्दालन,
आंतरराष्ट्र्रीय अधिवेशन ।
करण्या धर्माचे उत्थान, योजिले गोमंतक हे स्थान,
होणार आता वैश्विक अधिवेशन हो जी जी ।। ६ ।।
१०. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सनातन धर्माच्या प्रगतीसाठी उचललेल्या गोवर्धन पर्वताला साधकांनी गोपगोपींप्रमाणे काठ्या लावून स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असणे
आपण आता समष्टी कार्याचे जे विविध प्रकार ऐकले, त्या माध्यमातून सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सनातन धर्माच्या उत्थानाचा गोवर्धन पर्वत उचलला असून आपल्याला गोप-गोपींप्रमाणे त्याला काठ्या लावून स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे.
बंधू-भगिनींनो, याप्रमाणे वेळ, काळ आणि परिस्थिती यांनुसार स्वतःचा निजधर्म ओळखा आणि त्यासाठी सज्ज व्हा ! बाबा गर्दे आपल्याला मूळ पदात हेच सांगतात की, या माध्यमातूनच आपल्याला मोक्षप्राप्ती होणार आहे, म्हणजेच जीवनातील परमोच्च आनंद मिळणार आहे.
निजधर्मी रत झाला..
‘प.पू. गुरुदेव, तुम्हीच ही कीर्तन सेवा आमच्याकडून करून घेतली’, यासाठी आम्ही तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’
(समाप्त)
– ह.भ.प. श्रीमती लीला घोले (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ८१ वर्षे) आणि सौ. श्रेया साने, पुणे. (जून २०२३)