‘ऑल आईज ऑन राफा’ (All Eyes on Rafah)च्या (सर्वांच्या नजरा ‘राफा’वर) निमित्ताने वास्तव…
(टीप : ‘राफा’ हे दक्षिण गाझामधील इजिप्तच्या सीमेलगत असणारे एक शहर आहे.)
मी आजवर कधीच कोणत्याही बॉलीवूड अभिनेत्री-अभिनेते यांना महत्त्व दिले नाही; कारण ‘करमणुकीच्या पलीकडे एक व्यक्ती म्हणून ही लोक आदर्श वगैरे आहेत’, असे मला कधी वाटले नाही. त्यामुळे समाजमाध्यमांवर त्यांना कधी ‘फॉलो’ (अनुनय) करण्याचा प्रश्नच आला नाही. मराठीतील काही प्रसिद्ध अभिनेते – अभिनेत्रींविषयी केवळ आपलेपणा वाटतो; म्हणून त्यांना मी समाजमाध्यमांवर ‘फॉलो’ करते. ही लोक ‘व्यक्ती’ म्हणून मला आदर्श वाटतात म्हणून नाही. त्यांचे प्रतिदिनचे ‘स्टेट्स’ (समाजमाध्यमांवर संदेश स्वरूपात देण्यासाठी येणारी माहिती, छायाचित्र किंवा अभिप्राय) पहाण्यासाठी तर मला वेळही नसतो. ‘ऑल आईज ऑन राफा’ या ‘ट्रेंडिंग पोस्ट’च्या (समाजमाध्यमांवर चर्चेत असलेले लिखाण) निमित्ताने आज अशाच काही मराठी – हिंदी अभिनेत्यांचे वा वलयांकित व्यक्तींचे ‘स्टेटस’ मी मुद्दाम उघडून पाहिले आणि पुष्कळ आश्चर्य वाटले.
ही लोक समाजात घडणार्या प्रत्येक अन्यायकारक गोष्टींवर कधी विशेष व्यक्त होत नाहीत आणि पल्याड घडणार्या गोष्टींची जिथे नक्की काय घडते आहे, याची खरीखुरी माहिती नसतांना निव्वळ एक ‘ट्रेंड’ म्हणून काहीतरी अर्धवट माहितीची गोष्ट प्रसारित करत आहेत, याचे आश्चर्य अधिक वाटले. त्यांच्या कमी माहितीची, दांभिकपणाची कीव करावीशी वाटते. प्रत्येक व्यक्तीला मतस्वातंत्र्य आहेच; पण ते स्वातंत्र्य जेव्हा सोयीस्कररित्या आणि खुळ्यासारखे वापरले जाते, तेव्हा त्यावर हसावे कि दुर्लक्ष करावे, हे मला समजत नाही.
१. ‘राफा’मध्ये असे काय झाले, ज्यामुळे चर्चा होत आहे ?
‘राफा’ नक्की कुठे आहे ? तेथील भौगोलिक आणि नागरी रचना कशी आहे ? तेथील सरकार कसे आहे ? अशी सगळी माहिती यांना (अभिनेत्यांचे वा वलयांकित व्यक्तींना) ठाऊक असणे, ही तर मला दूरचीच गोष्ट वाटत आहे. प्रत्येक वेळी अल्पसंख्यांक गटावरच अत्याचार होत असतो, असे नाही.
इस्रायलने नुकतेच राफा या दक्षिण गाझामधील इजिप्तच्या सीमेलगत असणार्या एका शहरात हमासविरुद्ध लष्करी कारवाई चालू केली आहे. संपूर्ण गाझामध्येच लोकसंख्येची घनता अतीप्रचंड आहे. याखेरीज ‘हमास’ या आतंकवादी संघटनेचे जिहादी कोणताही वेगळा गणवेश परिधान न करता सामान्य माणसाच्या वेशात राहूनच इस्रायली सैन्याशी मुकाबला करत असतात. इस्रायली सैन्यावर आक्रमण करून गाझातील सामान्य नागरिकांना जिथे स्थलांतरित केले आहे, त्या छावण्यांमध्ये येऊन हमासचे आतंकवादी लपून बसतात आणि त्यांची शस्त्रास्त्रे, दारूगोळा यांचा साठाही ठेवतात. या छावण्या संयुक्त राष्ट्रे, अरब देश, अमेरिका, इस्रायल यांच्या साहाय्य निधीतून बांधले गेले आहेत. या छावण्यांमध्ये कापडी तंबूची तात्पुरती घरे आहेत.
इस्रायल गुप्तचर यंत्रणेद्वारे या अशा आतंकवाद्यांची माहिती मिळवत असते. नुकतेच इस्रायली सैन्याने नागरिकांच्या तंबूत लपलेल्या हमासच्या २ वरिष्ठ आतंकवाद्यांना नष्ट करण्यासाठी त्या आतंकवाद्यांच्या एकाच तंबूवर अचूकतेने हवाई आक्रमण केले. या आक्रमणाच्या अवशेषामुळे किंवा जवळच साठा केलेल्या दारूगोळ्याचा स्फोट होऊन आसपासच्या तंबूना आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. इस्रायल याचे अजूनही अन्वेषण करत आहे. यात दुर्दैवाने आजूबाजूचे निष्पाप लोक, लहान मुले, बायका मारले गेले; पण जगात मात्र ‘इस्रायली सैन्याने ‘राफा’तील सर्वसामान्य नागरिकांना मारले’, असे पसरवले जात आहे.
२. खोटारड्या हमासच्या म्हणण्यावर विश्वास ठेवणे हे धोकादायक !
याखेरीज नुकतेच इस्रायलने गाझातील २ रहिवाशांचा भ्रमणभाष रेकॉर्ड करून तो प्रसिद्धही केला आहे. त्यात ते बोलत आहेत, ‘जवळच साठा केलेल्या हमासच्या शस्त्रास्त्रांचा स्फोट होऊन आग लागली.’ यापूर्वीही अनैतिक वृत्तीच्या हमासने इस्रायली सैन्यावर असाच खोटा आळ घातल्याच्या अनेक गोष्टी झाल्या आहेतच. ऑक्टोबरमध्ये इस्रायलवर सोडण्यासाठी म्हणून हमासने गाझामधून रॉकेट्स डागली; पण ते अयशस्वी होऊन त्यांच्याच आवारात फुटली होती आणि तिथे आग लागली होती. ते आवार एका रुग्णालयाचे होते आणि ‘इस्रायलने गाझातील एका रुग्णालयावर हवाई आक्रमण केले’, असे पसरले. इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेने जेव्हा दिशा, नकाशे, ड्रोन वापरून जेव्हा जगाला खरे पुरावे सादर केले, तेव्हा सगळे गप्प बसले. नोव्हेंबरमध्ये ‘हमासच्या कह्यात असलेली एक इस्रायली वृद्ध ओलिस महिला मेली आहे’, असा व्हिडिओ हमासने प्रसिद्ध केला; कारण तिच्या आणि अन्य ओलिसांच्या नातेवाइकांना मानसिकरित्या घाबरवण्यासाठी; परंतु डिसेंबरमध्ये झालेल्या तात्पुरत्या युद्धबंदित या मृत घोषित केलेल्या महिलेला हमासने मुक्तही केले. अशा अनेक झालेल्या गोष्टी माहिती म्हणून लिहिता येतील. त्यामुळे खोटारड्या हमासच्या म्हणण्यावर विश्वास ठेवणे, ही धोकादायक गोष्ट आहे.
३. जगभरात हिंदु, ख्रिस्ती आणि यझिदी अशा अल्पसंख्यांकांवर होत असलेल्या अत्याचारांविषयी कथित वलयांकित व्यक्ती बोलणार का ?
शेवटी हे युद्ध इस्रायल विरुद्ध हमास आणि आतंकवाद असे आहे. इस्रायलचे युद्ध गाझातील लोकांशी – नागरिकांशी नाही. ७ ऑक्टोबरसारखे आक्रमण परत होऊ नये, यासाठी स्वतःच्या देशाच्या संरक्षणासाठी हमास या आतंकवादी संघटनेचे जेवढे शक्य होईल, तेवढे उच्चाटन करण्याचा इस्रायलला अधिकारच आहे; पण जर हमास स्वतःच्या बचावासाठी गाझातील नागरिकांचा ढाल म्हणून वापर करून घेत असेल, तर त्यात नक्की चूक कुणाची ?
‘आज जगात रशिया- युक्रेन, नायजेरियातील ख्रिस्ती लोकांवर होत असलेले अत्याचार, पाकिस्तान आणि बांगलादेश येथे अल्संख्यांक असलेल्या हिंदूंवर होत असलेले अनन्वित अत्याचार, इसिसचे यझिदी लोकांवरील अत्याचार आणि अशा अनेक अन्यायकारक गोष्टी सोडून फक्त इस्रायल – हमास या युद्धाचा निव्वळ राजकारण म्हणून वापर केला जात आहे, असे वाटत नाही का ? आणि जर तसे असेल, तर आपल्यासारख्या सामान्यांना या राजकारणातील किती अन् काय खरे-खोटे कळणार आहे ?’, असेही ‘ट्रेंड’चे अनुसरण करतांना या लोकांना वाटत नाही का ?
– समता गोखले-दांडेकर, तेल अवीव, इस्रायल (२९.५.२०२४)