‘काही वेळा वार्याचा जोर पुष्कळ असूनही झाडाच्या फांद्या न तुटणे, तुटणे किंवा वृक्ष उन्मळून पडणे’, यांमागील सूक्ष्मातील प्रक्रिया !
‘काही वेळा वार्याचा जोर पुष्कळ असल्याने झाडाच्या फांद्या पुष्कळ हलतात; पण त्या लवकर का तुटत नाहीत ? काही वेळा फांद्या का तुटतात ? काही वेळा वृक्ष उन्मळून का पडतो ?’, यांविषयी देवाच्या कृपेमुळे मला सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान पुढे दिले आहे.
१. भूमीच्या खाली ‘गर्भिणीदेवी’चा वास असणे
भूमीच्या खालील पुष्कळ खोल भागाला ‘भूमीचा गर्भ’, असे म्हणतात. पृथ्वीवरील भूमीला सांभाळते, ती ‘गर्भिणीदेवी’ होय आणि जी भूमीतील मातीचा भाग सांभाळते, ती ‘मातंगीदेवी’ होय. ‘गर्भिणीदेवी’कडून खालून वर भूमीच्या दिशेने ‘गर्भलहरी’ प्रक्षेपित होत असतात.
२. वृक्षांमधील ‘वृक्षकेशी’ शक्ती आणि ‘केशलहरी’
वृक्षांमध्ये ‘वृक्षकेशी’ नावाची शक्ती असते. वृक्षकेशीतून भूमीच्या दिशेने (खाली) ‘केशलहरी’ सतत प्रवाहित होत असतात. त्या लहरी मनुष्याच्या केसांप्रमाणे लांब आणि बारीक असतात. त्यामुळे त्या लहरींना ‘केशलहरी’, असे म्हणतात. केशलहरींमध्ये ‘पृथ्वी’ आणि ‘आप’ ही तत्त्वे असतात.
३. भूमीच्या खालील ‘गर्भिणीदेवी’ आणि ‘गर्भलहरी’
भूमीच्या खाली वास करत असलेल्या ‘गर्भिणीदेवी’कडून ‘गर्भलहरी’ वरच्या, म्हणजे भूमीच्या दिशेने सतत प्रक्षेपित होत असतात. वृक्षाच्या ‘केशलहरी’ आणि भूमीच्या ‘गर्भलहरी’ यांमध्ये चुंबकीय आकर्षण असते.
४. वृक्षातील ‘केशलहरी’ आणि भूमीतील ‘गर्भलहरी’ यांच्या मीलनातून ‘गुहू’ अन् ‘अमोघ’ या रसायनांची निर्मिती होणे
भूगर्भातून गर्भलहरी भूमीच्या (वरच्या) दिशेने प्रचंड प्रमाणात प्रक्षेपित होत असतात. त्या लहरींमध्ये पुष्कळ प्रमाणात तेजतत्त्व असते. भूमीत बिजाला अंकुर फुटतो. त्यानंतर त्याचे रोप होते. ही प्रक्रिया भूमीतील क्षार आणि पाणी यांद्वारे घडते. रोपाची हळूहळू वाढ होऊन काही काळाने त्याचे रूपांतर वृक्षात होऊ लागते. या प्रक्रियेत रोपाला भक्कमपणे उभे रहाण्यासाठी भूमीकडून आणखी शक्ती हवी असते. त्याला ही शक्ती भूमीतील गर्भलहरींतील तेजतत्त्वाद्वारे प्राप्त होते. वृक्षातील ‘केशलहरी’ आणि भूमीतील ‘गर्भलहरी’ यांच्या मीलनातून ‘गुहू’ अन् ‘अमोघ’ या द्रव स्वरूपातील रसायनांची निर्मिती होते.
४ अ. ‘गुहू’ रसायन : ‘गु’ या शब्दाचा अर्थ वृक्ष आणि भूमी अन् ‘हू’चा अर्थ ‘घट्ट जोडणारे रसायन.’ वृक्ष आणि भूमी यांना घट्ट जोडणारे रसायन, म्हणजे ‘गुहू’ होय.
४ आ. ‘अमोघ’ रसायन : यातील ‘अ’ या शब्दाचा अर्थ ‘तेज’ आणि ‘मोघ’चा अर्थ ‘मोठे’, असा आहे. पुष्कळ तेज असलेल्या रसायनाला ‘अमोघ’, असे म्हणतात.
५. ‘गुहू’ अन् ‘अमोघ’ या रसायनांची निर्मिती होण्याची प्रक्रिया
वृक्षातील ‘केशलहरीं’मध्ये पृथ्वी आणि आप या तत्त्वांचा समावेश असतो अन् ‘गर्भलहरीं’मध्ये तेजतत्त्व असते. जेव्हा या दोन लहरींचे मीलन होते, तेव्हा पृथ्वी, आप आणि तेज या तत्त्वांचा संयोग होतो. त्याचा परिणाम म्हणून त्यातून द्रव स्वरूपातील ‘गुहू’ आणि ‘अमोघ’ या रसायनांची निर्मिती होते.
६. ‘गुहू’ आणि ‘अमोघ’ या रसायनांचे वृक्षाला होणारे लाभ
६ अ. विविध रंगांची निर्मिती होणे : वृक्षाचे लाकूड, फळे आणि पाने यांचे रंग या रसायनांतून निर्माण होतात.
६ आ. सौंदर्य प्राप्त होणे : रसायनांमुळे वृक्षाला विशिष्ट आकार, रंग आणि गंध प्राप्त होतो. त्यामुळे वृक्षाला सुंदरता प्राप्त होते. (गंध दिसत नसला, तरी रसायनांमुळे त्याचा गुणधर्म वृक्षात आलेला असतो. त्यामुळे येथे ‘सुंदरते’त गंध अंतर्भूत केला आहे.)
६ इ. भूमीवर दीर्घकाळ उभे रहाता येणे : वृक्ष एकाच ठिकाणी दीर्घकाळ उभा असतो. त्यासाठी आवश्यक असणारी शक्ती त्याला या रसायनांद्वारे प्राप्त होते.
६ ई. विविध परिस्थितींमध्ये टिकून रहाता येणे : विविध पशू आिण पक्षी झाडावर बसतात. त्यांचा भार पेलण्याची, तसेच पाऊस, थंडी, ऊन आणि वारा अशा भिन्न परिस्थितींमध्ये टिकून रहाण्याची क्षमता वृक्षात या रसायनांमुळे निर्माण होते.
७. वृक्षातील ‘केशलहरी’ आणि भूमीतील ‘गर्भलहरी’ यांचा परस्परांशी असलेला संबंध
लोहचुंबक आणि लोखंड यांच्यात जसे आकर्षण असते, तसे आकर्षण वृक्षातील ‘केशलहरी’ अन् भूमीतील ‘गर्भलहरी’ यांत असते. भूमीमध्ये वृक्षाचे प्रथम ‘बीज’ असते. त्यात मातीतील क्षार, पाणी आणि तेजतत्त्व एकत्रित होतात. त्यांपैकी तेजतत्त्वामुळे बिजाला अंकुर फुटतो. त्यामुळे वृक्षातील ‘केशलहरी’ आणि भूमीतील ‘गर्भलहरी’ एकमेकांशी संलग्न असतात. भूमीतील तेजतत्त्वामुळे वृक्षाला टिकून रहाण्याची शक्ती प्राप्त होते.
८. भूमीच्या गर्भलहरींतील तेजाचे भूमीवरील निसर्गरूपातील सौम्य दर्शन, म्हणजे वृक्ष होय. त्याला ‘तेजोदर्शन’, असेही म्हणतात.
९. जोराचा वारा वाहिल्यावर वृक्षाच्या फांद्या न तुटण्यामागील कारण
वृक्षातील ‘केशलहरी’ भूमीच्या दिशेने (खाली) सातत्याने प्रक्षेपित होत असतात. जोराचा वारा सुटला की, वृक्षातील केशलहरी दुर्बळ होतात; कारण त्या वेळी केशलहरींची शक्ती भूमीवर भक्कमपणे टिकून रहाण्यासाठी व्यय होते. त्याच क्षणी गर्भलहरींद्वारे भूमीतील तेजतत्त्व केशलहरींना, म्हणजेच त्या वृक्षाला वेगाने प्राप्त होते. त्यामुळे वृक्षाचे भूमीला घट्ट धरून ठेवण्याचे बळ वाढते; परिणामी जोराचा वारा वाहिला, तरी वृक्षाच्या फांद्या तुटत नाहीत.
१०. ‘वादळी वारा वाहिल्यावर वृक्षाच्या फांद्या तुटणे किंवा तो उन्मळून पडणे’, यांमागील कारण
जेव्हा वादळी वारा वहातो, तेव्हा वृक्षातील ‘केशलहरी’ दुर्बळ होतात. त्याच क्षणी गर्भलहरींद्वारे भूमीतील तेज केशलहरींना, म्हणजेच त्या वृक्षाला वेगाने प्राप्त होते; परंतु जोरदार वादळी वार्यामध्ये वायुतत्त्वाचा प्रकोप अधिक असल्यास गर्भलहरींचा, म्हणजे भूमीतील तेजाचा प्रभाव न्यून होतो. त्यामुळे काही वेळा वादळी वारा वाहिल्यावर वृक्षाच्या फांद्या तुटतात किंवा तो उन्मळून खाली पडतो.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.८.२०२३)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |