९० गुन्हे नोंद असलेल्या कुख्यात गुंडाला अटक !

पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) – हत्या आणि घरफोडी करणार्‍या कुख्यात गुन्हेगाराला निगडी पोलिसांनी हडपसर येथून अटक केली आहे. आरोपी विकीसिंग जालिंदरसिंग कल्याणी याच्यावर हत्येचा प्रयत्न, हत्या, दरोडा, घरफोडी, जबरी चोरी इत्यादी ९० गुन्हे नोंद आहेत. निगडी येथील दागिन्यांचे दुकान फोडल्याच्या प्रकरणी आरोपीकडून १० तोळे सोन्याचे दागिने, ८ किलो चांदी आणि दोन तलवारी असा एकूण २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, तसेच अब्दुल शेख या सोनाराला पोलिसांनी अटक केली. आरोपीने चोरी केलेले सोन्याचे दागिने शेखला विकले होते. (पहिल्याच गुन्ह्यात आरोपीला कठोर शिक्षा झाली असती, तर पुढील अनेक गुन्हे करण्याचे त्याची हिंमत झाली नसती ! आरोपीच्या वृत्तीत पालट होण्यासाठी, तशी शिक्षा त्याला देणे अपेक्षित ! – संपादक)

पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी येथील ‘श्रीलक्ष्मी ज्वेलर्स’ नावाच्या दुकानात आरोपी विकीसिंग याने ३ साथीदारांसह चोरी केली होती. तिजोरी फोडून ३० तोळे सोन्याचे दागिने, १० किलो चांदीचे दागिने आणि १८ सहस्र रुपये रोख रक्कम चोरली होती. यानंतर तो दुकानातील सीसीटीव्हीचा डी.व्ही.आर्. (सीसीटीव्ही छायाचित्रणाचे रेकॉर्डिंग आणि साठवणूक करण्यासाठी उपकरण) घेऊन साथीदारांसह पसार झाला होता. निगडी पोलीस ठाण्यात घरफोडी प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. सीसीटीव्हीद्वारे घरफोड्या करणारा कुख्यात विकीसिंगपर्यंत निगडी पोलीस पोचले. विकीसिंगला पकडणे आव्हानात्मक असल्याने पोलीस उपनिरीक्षक अमरीश देशमुख यांच्यासह इतर गटाने विकीसिंगच्या घराला वेढा घालून त्याला घेरले आणि अटक केली. अटक केल्यानंतर तपासात त्याने ‘ज्वेलरी शॉप’ फोडल्याचे मान्य केले. त्याचसमवेत पुण्यातील बिबवेवाडीत बंद फ्लॅट फोडल्याचेसुद्धा समोर आले आहे.

संपादकीय भूमिका

  • एवढे गुन्हे करेपर्यंत पोलीस प्रशासन झोपले होते का ?