आमदार नितेश राणे करणार आंदोलनाचे नेतृत्व !

लोणी काळभोर (पुणे), ६ जून (वार्ता.) – येथे आपल्या अधिकाराचा गैरवापर करत हिंदुत्वनिष्ठांवर खोटे गुन्हे नोंद करून त्यांना मकोका आणि तडीपार होण्यास भाग पाडणार्‍या भ्रष्ट पोलीस अधिकार्‍यांच्या विरोधात ‘चिल्लर फेक’ आंदोलन करण्यात येणार आहे. लोणी काळभोर परिसरात मागील काही काळापासून पोलिसांकडून वारंवार हिंदुत्वनिष्ठांची गळचेपी केली जात आहे.

गोमांस तस्करी करणारे वाहन कसायाकडून खंडणी घेत पोलिसांनी न्यायालयाकडून सोडवून दिले. ख्रिस्ती धर्मांतर रोखण्यासाठी स्थानिक धर्माभिमानी पोलीस ठाण्यात गेले असता हिंदु धर्मातील प्रथा-परंपरा आणि वर्णव्यवस्थेविषयी चुकीचे वक्तव्य करत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी कुचेष्टा केली, तसेच त्यांनी पोलिसांना गाड्या चोरीत साहाय्य करणार्‍या ओम गुरुंग या बांगलादेशी व्यक्तीला हाताशी धरून ६ गोरक्षकांवर बोगस गुन्हा नोंद केला.

धर्मयोद्धा शेखर अनिल मोडक यांचा वाढता हिंदुत्वाचा प्रभाव पाहून धर्मांधांच्या साहाय्याने त्यांचा सराईत गुन्हेगारी टोळीशी संबंध दाखवून मोक्का अंतर्गत कारवाई  केली, तर गोरक्षक अक्षय कांचन याच्यावर खोटे गुन्हे नोंद करून त्यांना तडीपार केले. उंच गतीरोधकामुळे संदीप खळदे यांची पत्नी अर्चना खळदे यांचा मृत्यू झाला. त्या वेळी पोलीस अधिकारी किरण धायगुडे यांनी कंत्राटदाराशी संगनमत करून एका रात्रीत गतीरोधकाची उंची कमी करून घेतली, तसेच अवैध गाडी विक्री ‘रॅकेट’मध्येही किरण धायगुडे यांचा हात असल्याचे हिंदुत्वनिष्ठांचे म्हणणे आहे. यामुळे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण आणि पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे यांच्या निलंबनासाठी अन् हिंदुत्वनिष्ठांना न्याय मिळावा यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली येत्या काही दिवसांत सकल हिंदु समाजाच्या वतीने आणि लोणी काळभोर येथील ग्रामस्थ, तसेच धर्माभिमानी हिंदूंनी भ्रष्ट पोलीस अधिकार्‍यांच्या विरोधात ‘चिल्लर फेक’ आंदोलनाची हाक दिली आहे. (भ्रष्ट आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे पोलीस जनतेचे रक्षण काय करणार ? कुंपणानेच शेत खाल्ल्यावर दाद कुणाकडे मागणार ? ही उक्ती लागू पडणारे भ्रष्ट पोलीस खाते !  – संपादक)