विविध प्रसंगांत देवाने श्री. विक्रांत चंद्रकांत मुळे यांचे प्राण वाचवण्याच्या संदर्भात त्यांची आई श्रीमती जयश्री मुळे यांना आलेल्या अनुभूती

‘माझा मधला मुलगा श्री. विक्रांत चंद्रकांत मुळे याचे ‘विविध प्रसंगांत देवाने प्राण कसे वाचवले ?’, या संदर्भात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती पुढे दिल्या आहेत.

श्री. विक्रांत मुळे

१. खेळतांना हौदात पडल्यावर काही मुलांनी मिळून वाचवणे

‘वर्ष १९७७ मध्ये आम्ही धाराशिव येथे रहात होतो. आमच्या घराजवळच एक बंद बंगला होता. तेथे पाण्याचा हौद होता. त्या बंगल्याच्या परिसरात लहान मुले खेळायला जात असत. एकदा मुले खेळत असतांना विक्रांत त्या हौदात पडला; पण काही मुलांनी प्रयत्न करून त्याला हौदातून बाहेर काढले. पुष्कळ अवघड प्रसंग आला होता; पण त्या मुलांच्या माध्यमातून देवाने त्याला वाचवले.

२. शाळेतील वसतीगृहात रहात असतांना गुडघ्याच्या खालील दोन हाडांचा अस्थीभंग होणे

२ अ. सायकल चालवतांना खाली पडल्यामुळे एका पायाचा अस्थीभंग होणे : वर्ष १९८४ मध्ये विक्रांत (वय ९ वर्षे) अकलूज येथील ‘ग्रीन फिंगर्स’ या शाळेत शिकत होता. तो तेथील वसतीगृहात रहात होता. तो शाळेत सायकल शिकतांना ‘त्या सायकलचे ‘ब्रेक’ निकामी आहेत’, हे त्याला ठाऊक नव्हते. त्यामुळे तो जोरात पडला आणि त्याच्या एका पायाची गुडघ्याखालची दोन्ही हाडांचा (‘टिबीया-फिब्युला’) यांचा अस्थीभंग झाला.

श्रीमती जयश्री मुळे

२ आ. शिक्षकांनी विक्रांतची वर्तणूक आणि अभ्यास यांवरून इयत्ता सहावीच्या वर्गात त्याला प्रवेश देणे अन् त्याचा धीटपणा आणि संयम या गुणांची प्रशंसा करणे : शाळेतील शिक्षक आणि मुख्य व्यवस्थापिका यांनी त्याला रुग्णालयात नेले. रुग्णालयात त्याच्या पायाचे शस्त्रकर्म करण्यात आले आणि त्याच्या पायाला ‘प्लास्टर’ घातले. शिक्षक आणि मुख्य व्यवस्थापिका यांनी ८ दिवसांनंतर आम्हाला पत्र पाठवले. त्यात त्यांनी लिहिले होते, ‘हा अपघात परीक्षेच्या काळात झाला असल्यामुळे त्याच्या मागील वर्षातील वर्तणूक आणि अभ्यास यांवरून त्याला इयत्ता सहावीच्या वर्गात प्रवेश दिला आहे.’ त्यात त्यांनी हेही लिहिले होते, ‘त्याच्या पायाचे शस्त्रकर्म चांगले झाले आहे.’ त्यांनी त्याचा धीटपणा आणि संयम या गुणांची प्रशंसाही केली होती.

३. (कै.) पू. परूळेकर महाराजांनी पाण्यापासून विक्रांतला सांभाळायला सांगणे

वर्ष १९८६ मध्ये आम्हाला जेव्हा कोल्हापूरला (कै.) पू. परूळेकर महाराज भेटले होते, तेव्हा त्या महाराजांनी विक्रांतविषयी मला २ सूत्रे सांगितली, ‘‘त्याचा आजार आणि प्रकृती यांविषयी आधुनिक वैद्यांना कळणार नाही. त्याला पाण्यापासून सांभाळा.’’ तेव्हा ‘लहानपणी खेळतांना हौदात पडल्यावर विक्रांतला पाण्यापासून देवानेच वाचवले’, याची आठवण झाली.

४. विक्रांत काकांच्या घरी जातांना मुसळधार पावसामुळे नाले तुडुंब भरून वहाणे, पाणी हळूहळू विक्रांतच्या गळ्यापर्यंत वाढल्यावर तो घाबरणे; पण नामजप करत राहिल्याने देवाने त्याला वाचवणे

वर्ष २००३ मध्ये पावसाळ्याच्या दिवसांत एकदा विक्रांत त्याच्या काकांच्या घरी जायला निघाला. तेव्हा त्याच्यावर एक कठीण प्रसंग ओढवला. तसे ते खेडेगावच होते. तो केज (जिल्हा बीड) या गावी पोचताच पुष्कळ जोरात पाऊस चालू झाला. मुसळधार पाऊस पडत राहिल्याने नाले तुडुंब भरले आणि नाले अन् रस्ते एकच होऊन सगळीकडे पाणी झाले. पाणी हळूहळू त्याच्या गळ्यापर्यंत वाढल्यामुळे तो घाबरला. तो देवाचे नाव घेत चालत राहिला आणि सुखरूप घरी पोचला. अशा भीषण प्रसंगातून देवाने त्याला वाचवून आमच्यावर मोठी कृपा केली.

५. अपघात झाल्यावर बेशुद्ध होणे आणि कुणीतरी रुग्णालयात घेऊन गेल्यामुळे प्राण वाचणे

जुलै २००५ मध्ये विक्रांतचा मोठा अपघात झाला. तो दुचाकीवरून जात असतांना वाटेत कुत्रे आले. त्यामुळे तो खाली पडला आणि तेथेच बेशुद्ध झाला. कुणीतरी त्याला उचलून रुग्णालयात नेले. त्यामुळे त्याचे प्राण वाचले.

६. मुसळधार पावसामुळे मुंबईत पूर येणे; पण विक्रांतच्या आईला अर्धांगवायू झाल्याने तो तिला भेटायला आल्यामुळे देवाने आईची काळजी दूर करणे

जुलै २००५ मध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला चेहर्‍याचा अर्धांगवायू (पॅरालिसीस) झाला. विक्रांतला कळल्यावर तो लगेचच मला भेटायला गावी आला. त्याने १५ ते २० दिवस राहून माझी काळजी घेतली. त्याच काळात मुंबईत मुसळधार पाऊस पडल्यामुळे पूर आला होता. देवाने अशा प्रकारे माझी काळजी दूर केली. तो त्या वेळी मुंबईत असता, तर आम्हाला काळजी वाटली असती. देवाच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.

७. विविध सेवांमध्ये सहभागी होणे

आता विक्रांत ठाणे येथे रहातो. देवाच्या कृपेनेच तो प्रासंगिक सेवा करतो, तसेच दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ यांचे वितरण करणे, ‘सात्त्विक उत्पादनांचे वितरण करणे, प्रसंगानुरूप संतांना चारचाकी वाहनाने ने-आण करणे, हिंदु राष्ट्र-जागृती सभांमध्ये सेवा करणे, लिखाणाचे इंग्रजीत भाषांतर करणे, विज्ञापने आणि अर्पण आणणे’, अशा विविध सेवा करतो.

८. एका संतांनी ‘तू आता आजारी पडू नये; म्हणूनच नामजप कर’, असे सांगणे आणि तेव्हापासून विक्रांत आजारी न पडणे

वर्ष २०१९ मध्ये आम्हाला एका संतांचा सत्संग लाभला. त्या वेळी विक्रांतने त्यांना सांगितले, ‘‘मी आजारी पडल्यावर आई मला नामजप करायला सांगते. तेव्हा मी नामजप करतो.’’ त्या वेळी ते संत त्याला म्हणाले, ‘‘तू आता आजारी पडू नये; म्हणूनच नामजप कर.’’ खरोखरच संतांचे वाक्य म्हणजे वचनच ! तेव्हापासून आतापर्यंत तो आजारी पडला नाही.

‘सर्वज्ञानी, सर्वसाक्षी, सर्वशक्तीमान, सर्वव्यापी अशा सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करत आहे. त्यांनी मलाच नाही, तर माझ्या मुलांनासुद्धा सांभाळले आणि मला कितीतरी अगम्य अशा अनुभूती दिल्या आहेत. देवा, आपल्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’

– श्रीमती जयश्री मुळे (वय ७५ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.१०.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक