Pakistan Reaction : मोदी पुन्हा पंतप्रधान बनल्यास भारत ‘हिंदु राष्ट्र’ बनेल !

पाकचे माजी परराष्ट्र सचिव एजाज अहमद चौधरी यांचा दावा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी

इस्लामाबाद (पाकिस्तान) – नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनल्यास त्यांना राज्यघटना पालटण्याचा अधिकार मिळेल, तसेच भारत ‘हिंदु राष्ट्र’ बनेल, असा दावा पाकचे माजी परराष्ट्र सचिव एजाज अहमद चौधरी यांनी भारतातील लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागण्याच्या काही घंटे आधी केला.

चौधरी यांनी मांडलेली सूत्रे

राज्यघटनेत सुधारणा करतील !

नरेंद्र मोदी प्रचंड बहुमताने पंतप्रधान बनले आणि भाजपप्रणीत आघाडीला संसदेत दोन तृतीयांश जागा मिळाल्या, तर भाजपला घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार मिळेल. भाजपला हे बळ मिळताच ते भारताला ‘हिंदु राष्ट्र’ बनवण्यास प्रारंभ करतील.

मोदी निवडणुकीतील आश्‍वासने पूर्ण करतात !

भाजप निवडणूक प्रचारात जे काही आश्‍वासने देते, ते सत्तेत आल्यानंतर पूर्ण करते. आजवर आपण पाहिले आहे. मोदी निवडणूक प्रचारात जे काही बोलले, ते त्यांनी त्यांचा प्राधान्यक्रम ठरवून त्याची कार्यवाही (अंमलबजावणी) केली. वर्ष २०१९ मधील निवडणुकीत त्यांनी कलम ३७० रहित करण्याचा उल्लेख केला होता. सत्तेत आल्यानंतर लगेचच त्याची कार्यवाही केली होती. मला वाटते की, या वेळी त्यांची सर्वांत मोठी प्राथमिकता भारताला ‘हिंदु राष्ट्र’ बनवणे, ही आहे. त्यासाठी त्यांनी काम चालू केले आहे.

भारत हिंदु राष्ट्र होण्यावर पाकिस्तानचा आक्षेप नाही !

मुळात भारत हिंदु राष्ट्र होण्यासाठी पाकिस्तानात कुणाचाही आक्षेप नाही. तिथे हिंदु बहुसंख्य असतील, तर हिंदु राष्ट्र निर्माण करा. त्याने आम्हाला काय फरक पडतो ? पण भाजपवाले आधीच मुसलमान आणि इतर धर्माच्या लोकांना त्रास देत आहेत. हिंदु राष्ट्र बनल्यानंतर आणखी संकटे निर्माण करतील, असा दावा चौधरी यांनी केला.

पाकिस्तानात घुसून मारण्याचा भारताचे धाडस वाढेल !

भाजप प्रचंड बहुमताने सत्तेवर आल्यास पाकिस्तानात घुसून मारण्याचा भारताचे धाडस वाढेल. पाकिस्तानसाठी ही चिंतेची गोष्ट आहे. इतर देशांसाठीही ही चिंतेची गोष्ट आहे, असे मला वाटते. पाकिस्तानने आतापासूनच सिद्धता चालू करावी.