अत्यंत चुरशीच्या लढतीत बीडमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे विजयी !

डावीकडून पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे

बीड – संपूर्ण राज्यात लक्षवेधी झालेल्या लढतींपैकी एक असलेली आणि राज्यात सर्वांत विलंबाने निकाल लागलेली निवडणूक म्हणजे बीड येथील होय ! येथे भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. फेरमतमोजणीमध्ये २४ व्या फेरीअखेर भाजपच्या पंकजा मुंडे या ३० सहस्र ४६१ मतांनी आघाडीवर होत्या; मात्र पुढच्या फेर्‍यांमध्ये त्यांचे मताधिक्य अल्प होत गेले आणि ३२ व्या फेरीअखेर ६ सहस्र ५५३ मतांनी बजरंग सोनवणे यांना विजयी घोषित करण्यात आले. बजरंग सोनवणे यांना ६ लाख ८३ सहस्र ९५० मते मिळाली.

येथे अशोक थोरात नावाच्या व्यक्तीला तुतारी हे चिन्ह मिळाले होते. त्यांना ५५ सहस्र मते मिळाली. या मतदारसंघात मुख्यत्वेकरून मराठा आरक्षणाचे सूत्र महत्त्वपूर्ण होते. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा जोर याच परिसरात होता. पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी या भागात पंतप्रधानांची सभाही झाली.

आयुष्यातील सर्वांत विचित्र, वेगळी अशी ही निवडणूक ! – पंकजा मुडे

पराभवानंतर पत्रकारांशी बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘‘माझ्या आयुष्यातील सर्वांत विचित्र, वेगळी अशी ही निवडणूक होती. मी जेव्हा मतमोजणी केंद्राच्या बाहेर आले, तेव्हा समोरील जमाव फारच आक्रमक होता. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा जमावाने माझ्या कारच्या काचांना बुक्क्या मारल्या. मी विजय-पराभव सगळे पाहिलेले आहे; पण बीड जिल्ह्यात मी असे कधी पाहिले नाही. हेच थोडे अस्वस्थ करणारे आहे. मला या जिल्ह्याची काळजी वाटत होती. आता बघू आमच्या आयुष्याच्या वाट्याला, अनुभवाला काय काय येते.’’