‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी निर्मिलेली विश्वातील एकमेवाद्वितीय आध्यात्मिक प्रयोगशाळा !
‘पूर्वी तक्षशिला, नालंदा अशी विद्या आणि कला यांचे शिक्षण देणारी विद्यापिठे होती, त्याप्रमाणेच ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ ही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रेरणेने स्थापन झालेली एकमेवाद्वितीय आध्यात्मिक प्रयोगशाळा आहे’, असे मला वाटते. तेथे प्रयोगजीवी ललित कलांवर (performing arts) आध्यात्मिक दृष्टीकोनातून संशोधन होते. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातील संगीत विभागात आध्यात्मिक स्तरावर होत असलेला अभ्यास, त्याची वैशिष्ट्ये आणि त्याचा साधक कलाकारांना होत असलेला लाभ’ यांविषयी येथे दिले आहे.
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘कला आणि अध्यात्म यातून ईश्वरप्राप्ती’ ही संकल्पना मांडणे
प्राचीन काळापासून आजपर्यंत प्रयोगजीवी कलांवर (गायन, वादन, नृत्य आणि नाट्य यांवर) पुष्कळ संशोधन अन् सखोल अभ्यास झालेला आढळतो; मात्र जागतिक पातळीवर अद्याप कुठेही या प्रयोगजीवी कलांवर किंवा कोणत्याही अन्य कलांवर आध्यात्मिक दृष्टीने संशोधन झालेले आढळत नाही. फारतर ‘कलेतून आध्यात्मिक उपचार’ (meditational healing) या विषयाकडे सध्या काही संशोधक वळले आहेत. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘कला आणि अध्यात्म यांतून ईश्वरप्राप्ती, कलाकाराची साधना, त्यातून त्याची आध्यात्मिक उन्नती’ ही संकल्पना मांडली आहे. ‘याआधी ही संकल्पना कुणाकडून क्वचितच् मांडली गेली आहे’, असे मला वाटते.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना कलेशी संबंधित सूक्ष्म स्तरावर अभ्यास करायला शिकवून त्यांना कलेच्या शिक्षणातील पुढच्या आध्यात्मिक टप्प्यावर नेणे
कोणतीही कला मग ती नृत्यकला असो, संगीत असो कि नाट्य असो, त्यातील शिक्षण आज एका पातळीपर्यंत सिमीत झाले आहे, म्हणजे तेथे कलाकार स्वतःच्या प्रस्तुतीतील आनंद घेण्यापर्यंतच सिमीत रहातो. सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींनी ‘कलेचा आध्यात्मिक दृष्टीने अभ्यास कसा करायचा ? कलाकारांनी स्वतःतील कलाकौशल्य वाढवून ईश्वरप्राप्ती कशी करायची ?’, यांविषयी कलाकार साधकांना सांगितले आहे, उदा. कला आणि पंचमहाभूते, कला आणि षट्चक्रे, कला आणि त्रिगुण (सत्त्व, रज, तम) यांविषयी अभ्यास करणे. परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांना सूक्ष्म स्तरावर अभ्यास करायला शिकवून त्यांना कलेतील पुढच्या आध्यात्मिक टप्प्यावर नेत आहेत.
३. कला सादर करतांना सूक्ष्म स्तरावरील अभ्यासाची जोड दिल्याने कलाकाराला दिव्य आध्यात्मिक अनुभूती येऊ शकणे
साधक कलाकारांनी कला सादर करतांना सूक्ष्म स्तरावरील अभ्यासाची जोड दिल्याने ते सूक्ष्म स्तरावरील दिव्य आध्यात्मिक अनुभूतीही घेऊ शकतात, उदा. गायन, वादन, नृत्य, नाट्य यांच्या सरावाच्या अंतर्गत सूक्ष्म नाद ऐकू येणे, सूक्ष्म सुगंध येणे इत्यादी. त्यामुळे ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय ही दिव्य आध्यात्मिक प्रयोगशाळा आहे’, असे मला वाटते.
४. साधक कलाकाराला कला सादरीकरणाच्या प्रयोगातून योग्य-अयोग्य, सत्य-असत्य शिकता येणे
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात कलाकार एखादी कला सादर करतांना त्याचे सूक्ष्म परीक्षण केले जाते. कला सादर करतांना त्यातून प्रक्षेपित होणार्या सत्त्व-रज-तम या स्पंदनांविषयी समजते. त्यामुळे साधक कलाकाराला साधनेच्या दृष्टीने कलेतील योग्य-अयोग्य, सत्य-असत्य यांविषयी शिकता येते.
एकदा साधक कलाकाराने भक्तीगीत गाणे आणि चित्रपटातील गीत गाणे, असा प्रयोग केल्यानंतर भक्तीगीत गायल्यानंतर त्या साधकामधील सकारात्मक स्पंदने वाढली; मात्र त्याने चित्रपटातील गीत गायल्यानंतर त्याच्यामधील सकारात्मक स्पंदनांत घट होऊन त्याच्यातील नकारात्मक स्पंदनांत वाढ झाली. यातून त्या साधकाच्या लक्षात आले की, कुठल्या प्रकारचे गीत गायल्याने स्वत:ला लाभ होतो.
५. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातील कलाकार साधकाला साधनेचा पाया असल्याने त्याच्यात कलेचा अहं अल्प असणे
सामान्यपणे कलाकार हा वलयांकित क्षेत्रात वावरत असतो. त्याला अल्प-अधिक प्रमाणात त्याच्या कलेचा अहं असतोच. बाहेर कलेचे शिक्षण देणार्या नामांकित संस्था आहेत. तेथे उत्तम कलाकार घडतात आणि ते नावारूपालाही येतात; मात्र ‘त्यांचा अहं कधी वाढतो ?’, हे त्यांच्या लक्षातही येत नाही. कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कलाकाराला त्याच्या कलेचा अहं होऊ नये, याचे शिक्षण देणारा अभ्यासक्रम नाही. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेविषयी शिकवत असल्याने कलाकाराला त्याच्यातील अहं अल्प व्हायला साहाय्य होते. साधक कलाकाराने स्वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया राबवल्याने त्याला अनेक लाभ होतात. कला देवाला अपेक्षित अशी सादर करण्याकडे त्याचा कल असतो.
६. ‘कला ही केवळ मनोरंजनाची गोष्ट नसून ती जिवाची आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी आहे’, असे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी शिकवणे
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात साधक केवळ कलेचे सादरीकरण करत नाहीत, तर ‘कलेच्या माध्यमातून साधना कशी होईल ?’, हे पहातात. साधक कलेचा अभ्यास करतांना ‘त्याला नामजपाची जोड देणे, ‘कला ईश्वरासाठी सादर करत आहे’, असा भाव ठेवणे इत्यादी प्रयत्न करतात. ‘कला ही केवळ मनोरंजनाची गोष्ट नसून ती जिवाची आध्यात्मिक उन्नती करणारी आहे’, अशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची शिकवण आहे. त्यासाठी साधक कलाकाराने स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून गुणवृद्धी करणे अपेक्षित आहे. हेच येथील प्रयोगातून शिकायला मिळाले.
माझ्यासारख्या जिवाला गुरुमाऊलींच्या कृपेने (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने) महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात शिकण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सौ. शुभांगी शेळके, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (१९.५.२०२४)
|