Winnability Of Defectors : पक्षांतर करून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ५६ पैकी २०, तर काँग्रेसचे २९ पैकी ७ विजयी
लोकसभा निवडणुकीत पक्षांतर करून निवडणूक लढवणारे ६६ टक्के उमेदवार पराभूत !
नवी देहली – लोकसभा निवडणुकीत पक्षांतर करून तिकीट मिळालेल्या ६६ टक्के उमेदवारांचा पराभव झाला आहे. सर्व पक्षांनी मिळून १२७ पक्षांतर केलेल्यांना त्यांच्या पक्षाच्या वतीने उमेदवारी दिली होती. त्यांपैकी केवळ ४८ उमेदवार विजयी झाले, तर ८४ जणांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपने इतर पक्षांतून आलेल्या ५६ जणांना उमेदवारी दिली होती. यांपैकी केवळ २० जण जिंकले, तर ३६ पराभूत झाले. काँग्रेसने इतर पक्षांतून आलेल्या २९ नेत्यांना उमेदवारी दिली होती. त्यांपैकी केवळ ७ उमेदवार जिंकू शकले, तर २२ जणांना पराभवाला सामोरे जावे लागले. बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने पक्षांतर करणार्या ६ नेत्यांना उमेदवारी दिली; पण आसनसोलमधून विजयी झालेले शत्रुघ्न सिन्हा वगळता पाचही उमेदवार निवडणुकीत पराभूत झाले. (असे पक्षबदलू नेते नव्या पक्षाशी एकनिष्ठ रहातील कशावरून ! – संपादक)
काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन इतर पक्षांतर्फे निवडणूक लढवलेल्या ४४ उमेदवारांपैकी केवळ १२ विजयी
काँग्रेस सोडलेल्या ४४ नेत्यांनी इतर पक्षांच्या तिकिटावर निवडणूक लढवली. त्यांपैकी केवळ १२ जिंकू शकले. इतर पक्षांनी भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या २४ नेत्यांना तिकीट दिले. त्यांपैकी केवळ ६ जण जिंकले. समाजवादी पक्षाने इतर पक्षांतील १८ नेत्यांना उमेदवारी दिली. त्यांपैकी १० जण विजयी झाले.