Gaza Attack : गाझावर इस्रायलने केलेल्या आक्रमणात १९ जण ठार !

तेल अविव (इस्रायल) – मध्य आणि दक्षिण गाझामध्ये इस्रायलने केलेले हवाई आक्रमण आणि गोळीबार यात किमान १९ लोक ठार झाले. अनुमाने ८ मासांपासून चालू असलेली ही लढाई संपवण्याच्या आंतरराष्ट्रीय आवाहनानंतर इस्रायलने आक्रमणे आणखी तीव्र केली आहेत. दुसरीकडे हमासने एक निवेदन प्रसारित करत म्हटले की, जोपर्यंत इस्रायल स्पष्टपणे युद्धविरामाचे आश्‍वासन देत नाही आणि त्यांचेे सैन्य मागे घेत नाही, तोपर्यंत लढाई थांबणार नाही.

पॅलेस्टिनी अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार ‘अल्-बुरीज’ आणि ‘अल्-मगाझी’ या शरणार्थी शिबिरांवर अन् मध्य गाझामधील ‘देर अल्-बालाह’ शहरावर इस्रायली आक्रमणात १७ लोक मारले गेले. राफामध्ये मानवतावादी साहाय्य पोचवणारे २ पोलीसही या आक्रमणात ठार झाले.

स्लोव्हेनियानेही पॅलेस्टाईनला ‘देश’ म्हणून मान्यता दिली !

पॅलेस्टाईनला ‘देश’ म्हणून मान्यता देणारा स्लोव्हेनिया हा नवा युरोपीय देश बनला आहे. याआधी स्पेन, आयर्लंड आणि नॉर्वे यांनी पॅलेस्टाईनला तशी मान्यता दिली आहे. हे करण्यामागे स्लोव्हेनियाचा उद्देश युद्ध थांबवण्यासाठी इस्रायलवर दबाव आणणे हा आहे.