Pakistan Debt Become Double : दिवाळखोर होऊ लागलेल्या पाकचे विदेशी कर्ज झाले दुप्पट !

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ ५ दिवसांच्या चीन दौर्‍यावर गेले आहेत. या भेटीत ते चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत. पाकिस्तान चीनसोबतच्या संबंधांचे पुनर्मूल्यांकन करत आहे. या पार्श्‍वभमूीवर ही भेट होत आहे. ‘चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्गा’कडून पाकिस्तानला आशा आहेत; मात्र गेल्या दशकात पाकिस्तानचे कर्ज दुपटीने वाढले आहे. पाकिस्तानला त्याच्या खराब अर्थव्यवस्थेतून बाहेर पडायचे आहे. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचे लक्ष आहे.

१. शाहबाज शरीफ चीनच्या शिआन आणि शेनझेन शहरांना भेट देणार आहेत. ही शहरे चीनच्या विकासाचे प्रतीक असणारी शहरे म्हणून ओळखली जातात. शनझेनची निवड तत्कालीन नेते डेंग झियाओपिंग यांनी देशातील पहिले विशेष आर्थिक क्षेत्र म्हणून केली होती.

२. आर्थिक महामार्गामुळे पाकिस्तानचा विकास होऊ शकला नाही; मात्र त्याचे कर्ज सातत्याने वाढत आहे. वर्ष २०१३ मध्ये जेव्हा नवाझ शरीफ सत्तेत होते, तेव्हा पाकिस्तानचे विदेशी कर्ज ४ लाख ९१ सहस्र कोटी रुपये होते. आज एक दशकाहून अधिक काळानंतर पाकिस्तानचे कर्ज आता १० लाख ३३ सहस्र कोटी रुपयांच्या वर आहे. त्यांपैकी २ लाख ५० सहस्र कोटी रुपयांचे कर्ज एकट्या चीनने दिले आहे.

३. पाकिस्तानच्या अल्प होत चाललेल्या परकीय गंगाजळीवरील कर्जाच्या ओझ्यामुळे आयात-निर्भर देशासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. पाकिस्तानच्या सेंट्रल बँकेकडे केवळ ७५ सहस्र कोटी रुपये आहेत जे २ महिन्यांच्या आयातीसाठी पुरेसे आहेत.