Mayawati : मुसलमानांनी आम्हाला मतदान न केल्याने आमचा पराभव ! – बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती
|
नवी देहली – बहुजन समाज पक्षाचा (बसपाचा) विशेष भाग असलेल्या मुसलमान समाजाला निवडणुकीत योग्य प्रतिनिधित्व देऊनही बसपला लाभ झाला नाही. मुसलमानांनी आम्हाला मतदान केले नाही. मी त्यांना नेहमीच तिकीट दिले. माझ्याच जातीच्या लोकांनी आमच्या पक्षाला मतदान केले. त्यामुळे आता अशा स्थितीत पक्षाकडून बारकाईने विचार करूनच त्यांना (मुसलमानांना) निवडणुकीत संधी दिली जाणार आहे. जेणेकरून भविष्यात पक्षाची मोठी हानी होणार नाही, अशा शब्दांत बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी त्यांच्या पक्षाच्या पराभवाला मुसलमानांना उत्तरदायी ठरवले. वर्ष २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बसपाला १० ठिकाणी विजय मिळाला होता; मात्र आताच्या निवडणुकीत त्यांचा एकही उमेदवार जिंकू शकला नाही. या निवडणुकीत मायावतींनी मुसलमान उमेदवारांना तिकीट देऊन आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले होते. बसपने उत्तरप्रदेशात २३ मुसलमान आणि १५ ब्राह्मण यांना तिकीट दिले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी ६ मुसलमानांना उमेदवारी दिली होती.
मायावती पुढे म्हणाल्या की, या निवडणुकीत विशेषत: संपूर्ण देशाचे लक्ष उत्तरप्रदेशावर लागले होते आणि येथील निकालही जनतेसमोर आहेत. आमचा पक्ष हे गांभीर्याने घेईल आणि प्रत्येक स्तरावर त्याचे सखोल विश्लेेषण करेल आणि पक्षाच्या हितासाठी आवश्यक ती पावले उचलेल.
संपादकीय भूमिकाप्रत्येक पक्षाला ही जाणीव झाल्यावरच लांगूलचालनाचे राजकारण थांबेल ! |