खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंह याला ५० सहस्रांहून अधिक मतांची आघाडी !
चंडीगड – पंजाबमधील ‘वारीस पंजाब दे’ या संघटनेचा प्रमुख आणि खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंह याने पंजाबमधील खदूर साहिब मतदारसंघातून अपक्ष म्हणून लोकसभेची निवडणूक लढवली होती. निवडणूक आयोगाने सकाळी १०.३० वाजेपर्यंत घोषित केलेल्या मतमोजणीच्या आकडेवारीनुसार अमृतपाल सिंह याने ५० सहस्र ४०५ मतांची आघाडी घेतली होती. खदूर साहिब लोकसभा मतदारसंघात अमृतपाल सिंह विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार कुलबीर सिंह झिरा अशी चुरशीची लढत झाली. येथील आम आदमी पक्षाचा उमेदवार ५१ सहस्र ३२८ मतांनी पिछाडीवर आहे.
एप्रिल २०२३ मध्ये अमृतपाल सिंह याला अटक करण्यात आली होती. अमृतपालच्या सहकार्याला अटक केल्यामुळे पोलीस ठाण्यावर जमावाने आक्रमण केल्यानंतर अमृतपाल सिंह चर्चेत आला होता. खलिस्तान समर्थक असलेल्या अमृतपाल सिंह याच्या विरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद असून सध्या तो आसाममधील दिब्रुगढ येथील कारागृहात आहे. वर्ष २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत खदूर साहिब मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार जसबीर सिंह गिल विजयी झाले होते.