मुंबईत उद्धव ठाकरे गटाचा जोर कायम, महाविकास आघाडीने ६ पैकी ४ जागा जिंकल्या !
मुंबई – मुंबईमध्ये शिवसेना आणि भाजप यांना मोठा फटका बसला. शिवसेनेला मुंबईमध्ये एकही जागा जिंकता आली नाही. मुंबईतील ६ पैकी ४ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. शिवसेनेमध्ये शिंदे आणि ठाकरे दोन गट असूनही अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होऊनही उद्धव ठाकरे यांना मुंबईतील जोर कायम ठेवण्यात यश आले.
केवळ मुंबई उत्तर मतदारसंघात भाजपचे पियुष गोयल विजयी झाले. मुंबई उत्तर-पूर्व मतदारसंघात संजय पाटील या ठाकरे गटाच्या उमेदवारांनी भाजपच्या मिहिर कोटेचा यांचा पराभव केला. मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात अटीतटीच्या सामन्यात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी भाजपचे उमेदवार अधिवक्ते उज्ज्वल निकम यांचा पराभव केला. मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघात सलग २ वेळा निवडून आलेले शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांनी पराभूत केले. मुंबई दक्षिण मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांनी शिवसेनेच्या यामिनी जाधव यांचा पराभव केला. मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघामध्ये पहिल्या निकालामध्ये उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर हे अटितटीच्या लढतीमध्ये विजयी झाले होते; मात्र शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी फेरमतमोजणीची मागणी केली. फेरमतमोजणीमध्ये रवींद्र वायकर ४८ मतांनी विजयी झाले. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर रात्री ८.३० वा अमोल किर्तीकर एका मताने पुढे असल्याचे वृत्त आले. मनसेला महायुतीमध्ये घेऊनही मुंबईमध्ये महायुतीला अधिक प्रभाव पाडता आला नाही.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नारायण राणे विजयी
रत्नागिरी – लोकसभेच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या लढतीत शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत यांचा भाजपचे नारायण राणे यांनी ४७ सहस्र ८५८ मतांनी पराभव केला. राणे यांना ४ लाख ४८ सहस्र ५१४, तर राऊत यांना ४ लाख ६५६ मते मिळाली. या मतदारसंघात एकूण ९ उमेदवार रिंगणात होते; मात्र मुख्य लढत राणे आणि राऊत यांच्यातच होती.
नारायण राणे यांच्या विजयानंतर राणे कुटुंबीय आणि कार्यकर्ते यांनी मतदारसंघात फटाके फोडून आणि ढोलताशांच्या गजरात आनंद साजरा केला.
कल्याण येथे श्रीकांत शिंदे विजयी !
कल्याण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे विजयी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचा पराभव केला. २ लाखांच्या मताधिक्याने शिंदे विजयी झाले.
विदर्भातील निकालाचा मतदारसंघनिहाय आढावा !
नागपूर येथे भाजपचे नितीन गडकरी विजयी !
नागपूर – नागपूर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उमदेवार नितीन गडकरी विजयी झाले आहेत. त्यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली होती. नितीन गडकरी यांनी काँग्रेसचे उमेदवार आणि पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांचा पराभव केला.
हिंगोली येथे उद्धव ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर विजयी !
हिंगोली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर विजयी झाले आहेत. पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले की, हिंगोली मतदारसंघातील मतदारांनी गद्दारांना त्यांची जागा दाखवून दिली असून हा मतदारसंघ शिवसेनेचा (उद्धव ठाकरे गट) बालेकिल्ला आहे, हे स्पष्ट आहे. आजचा विजय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चरणी अर्पण करत आहे.
चंद्रपूर येथे काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर विजयी !
चंद्रपूर – येथील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार श्रीमती प्रतिभा धानोरकर यांनी भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव केला. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलतांना त्या म्हणाल्या, ‘‘संघर्ष जेवढा मोठा राहील, विजय तेवढा शांत राहील. कॅबिनेट मंत्र्यांना हरवणे हा धानोरकर कुटुंबाचा इतिहास आहे. मंत्र्यांना पराभूत करण्याचा हा विजय इंडिया आघाडीचा मोठा विजय आहे.’’
जळगाव येथे भाजपच्या दोन्ही उमेदवार विजयी !
जळगाव मतदारसंघात भाजपच्या स्मिता वाघ आणि रावेर मतदारसंघाच्या उमेदवार रक्षा खडसे विजयी झाल्या आहेत. स्मिता वाघ यांनी उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांचा पराभव केला. रक्षा खडसे या सलग तिसर्यांदा विजयी झाल्या आहेत. रक्षा खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांचा पराभव केला.
यवतमाळ – येथे ठाकरे गटाचे संजय देशमुख विजयी झाले आहेत. त्यांनी महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांचा पराभव केला.
वर्धा – येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार रामदास तडस यांचा पराभव केला.
अमरावती – भाजपच्या खासदार नवनीत राणा यांचा पराभव झाला. तिकिटासाठी भाजपमध्ये जाऊनही त्यांना लाभ झाला नसल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे हे विजयी झाले आहेत. राणा यांना ३ लाख ४१ सहस्र ६८८ मते मिळाली, तर वानखेडे यांना ३ लाख ५९ सहस्र ४९२ मते मिळाली आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाचे दिनेश बुब यांना ५३ सहस्र १८३ मते मिळाली आहेत. बच्चू कडू यांच्या पक्षाने राणा यांच्या विरोधात उमेदवार दिला होता. या उमेदवाराने राणा यांची मते घेतली आहेत. त्यामुळे राणा यांचा पराभव झाल्याचे मानले जात आहे.
प्रकाश आंबेडकर यांचा अकोला येथे पराभव !
अकोला – वंचित बहुजन आघाडीला एकाही जागेवर आघाडी मिळाली नाही. त्यांची निराशाजनक कामगिरी दिसून आली. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे स्वतःच पराभूत झाले. महाविकास आघाडीसमवेत जागावाटपाची चर्चा फिस्कटल्यानंतर आंबेडकरांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा करत त्यांचे ६ उमेदवार उभे केले होते; मात्र राज्यात एकाही जागेवर वंचितच्या उमेदवाराला आघाडी मिळालेली नाही.
एम्.आय.एम्.चा सुपडा साफ !
छत्रपती संभाजीनगर – अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे शिवसेना उमेदवार संदिपान भुमरे १ लाखाहून अधिक मतांनी विजयी झाले. येथे एम्.आय.एम्.चे इम्तियाज जलील यांचा पराभव झाला. त्यांच्या पराभवामुळे महाराष्ट्रातून एम्.आय.एम्.चे अस्तित्व पूर्णतः संपलेले आहे.