साधकाने अनुभवलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची कृपा !
‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिराच्या माध्यमातून आम्हाला (मी आणि माझा लहान भाऊ कु. वेदांत सोनार यांना) गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) साधनेशी जोडले आणि तेथून आमच्या साधनेच्या प्रवासाला आरंभ झाला.
१. शिबिराच्या वेळी गुरुदेवांना प्रार्थना करणे आणि घरी शिबिरात झालेल्या विषयाची चर्चा करत असतांना सत्संग असल्यासारखे वाटणे
शिबिरात झालेल्या प्रत्येक विषयाची आम्ही घरी चर्चा करत होतो. तेव्हा तो एक प्रकारचा सत्संगच होत असे. या शिबिराच्या वेळी मी गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘तुम्ही आम्हाला हा मार्ग दाखवला. आम्हाला या मार्गावरून तुम्हाला अपेक्षित असे मार्गक्रमण करता येऊ दे. तुम्हीच आमच्याकडून साधना करून घ्या.’ त्याची अनुभूती मला आता ५ मासांनंतर आली.
२. व्यष्टी आणि समष्टी साधना यांचे प्रयत्न होणे
त्यानंतर आम्ही जळगाव सेवाकेंद्रात सेवा करणे, उपक्रमात सहभागी होणे, असे साधनेचे प्रयत्न केले. गुरुकृपेने आमच्याकडून व्यष्टी साधनेचेही प्रयत्न होऊ लागले.
३. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवेला जाण्याची संधी मिळणे
३ अ. आर्थिक स्थिती बेताची असूनही वडिलांनी रामनाथी आश्रमात जाण्याची अनुमती देऊन तिघांची तिकिटे काढून देणे : मी आणि माझ्या भावाने ‘रामनाथी आश्रमात ५ – ६ दिवस सेवेला जाऊ’, असे ठरवले. त्यानंतर अकस्मात् उत्तरदायी साधिकेने आमच्या आईचे (सौ. रेखा सोनार) नाव सुचवले. त्याविषयी बाबांना विचारले असता त्यांनी कसलाही विचार न करता आम्हाला २१ दिवस आश्रमात जाण्याची अनुमती दिली. आमची आर्थिक स्थिती बेताची असूनही बाबांनी ४ मास आधी आश्रमात जाण्याची आणि परतीची तिकिटेही काढून दिली. २० जुलैला आम्ही गुरुकृपेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पोचलो.
४. रामनाथी आश्रमात असतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
४ अ. आश्रमात आपलेपणा जाणवणे : आम्ही आश्रमात येताच ‘घरी आलो आहोत’, असे मला वाटले. या वेळी आमच्या समवेत आई असल्याने मला वेगळाच उत्साह वाटत होता. आम्हाला मागच्या शिबिरातील एकेक क्षण आठवून पुन्हा ते क्षण अनुभवता येत होते.
४ आ. ‘सर्व साधक गुरूंचीच रूपे आहेत’, असे जाणवणे : आम्हाला आश्रमात क्षणभरही ‘आम्ही नवीन आहोत. बाहेरून आलो आहोत’, असे वाटले नाही. आम्हाला वाटले, ‘आम्ही गुरूंच्या दारी आलो आहोत. सगळे साधक आपलेच आहेत, गुरूंचेच रूप आहेत.’ आम्ही सहजतेने सर्वांमध्ये मिसळलो. आईही प्रसन्न आणि आनंदी दिसत होती.
४ इ. व्यष्टी आणि समष्टी साधना करणे : आम्हाला भांडी घासणे, बॉयलर धुणे, प्रसाधनगृह स्वच्छता, अशा वेगवेगळ्या सेवा करता आल्या. आमचे व्यष्टी साधनेचे प्रयत्नही होऊ लागले.
४ ई. आश्रमातील मोठी भांडी घासण्याची सेवा करत असतांना उत्साह आणि आनंद जाणवणे : आश्रमात आल्यामुळे ‘स्वतःची कामे स्वतःच करावी’, हे शिकता आले. घरी आमच्या जेवणाची भांडी आम्हीच धूत होतो; पण तेव्हा मला कंटाळा येत असे; मात्र आमच्याकडून आश्रमातील मोठमोठी भांडी काही घंट्यांतच स्वच्छ होत होती. आमच्यात उत्साह आणि आनंद यांची वृद्धी होत असे.
४ उ. मनात नकारात्मक विचार आल्यास वैखरीतून कुलदेवतेचा नामजप केल्यावर आनंद अनुभवता येणे : काही वेळा आश्रमात असतांना माझे डोके आणि डोळे फार जड होत असत. त्यामुळे माझ्या मनात नकारात्मक आणि चिंतेचे विचार येत असत. त्या वेळी सेवा करतांना मी कुलदेवतेचा नामजप वैखरी वाणीतून (मोठ्याने) करत असे. तेव्हा मला योग्य दृष्टीकोन मिळून मी पुन्हा आनंद अनुभवत असे.
४ ऊ. अंतर्मनातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी घंटो न् घंटे अनुसंधान साधले जाऊन त्यांना अनुभवता येणे : गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) शिकवलेल्या अष्टांग साधनेपैकी ‘भावजागृती’ हा टप्पा मला पुष्कळ साहाय्य करत असे. गुरूंच्या शिकवणीमुळे माझ्या मनाच्या शक्तीने मी देवाला कुठेही अनुभवू शकतो. मी सर्व स्थिती गुरूंना सांगत असे. मी घंटो न् घंटे त्यांच्याशी बोलत असे. ते माझ्या मनात एकही शंका किंवा प्रश्न टिकू देत नव्हते.
४ ए. ‘रामनाथी आश्रमातील प्रत्येक वस्तू, साधक आणि वातावरण यांच्या माध्यमातून गुरुदेवांना अनुभवत आहे’, असे जाणवणे : गुरुदेव मला साधक, दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि मनातील योग्य विचार यांच्या माध्यमातून मार्गदर्शन करत असत. याची प्रचीती मी रामनाथी आश्रमात असतांना अधिकच आली. मी त्यांना ‘प्रत्येक वस्तू, साधक आणि तेथील वातावरण यांच्या माध्यमातून अनुभवतच आहे’, असे मला वाटत होते. एकदा मी असेच काळजीच्या विचारांमुळे पुन्हा उदास झालो. माझा आनंद हरपला. मी सभागृहात लावलेल्या प.पू. डॉक्टरांच्या प्रतिमेसमोर आसंदीवर बसून २ घंटे त्यांना माझी व्यथा सांगितली. तेव्हा ‘त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलत आहे’, असे मला वाटू लागले. ‘मी सभागृहात बसलो आहे’, हे मी विसरलो होतो.
४ ऐ. गुरुदेवांनी सूक्ष्मातून भविष्याबद्दल आश्वस्त करणे : गुरुदेवांना आत्मनिवेदन करत असतांना मला पुष्कळ रडू येत होते. मी त्यांच्या छायाचित्राकडे पाहिले, तर ते हसतच होते. मी त्यांना विचारले, ‘गुरुदेवा, हे कसे ? मला किती वाईट वाटत आहे. माझ्या मनाची स्थिती कशी आहे ? आणि तुम्ही तर हसत आहात.’ तेव्हा गुरुदेव सूक्ष्मातून मला म्हणाले, ‘अरे, तू तुझ्या आजच्या स्थितीकडे पाहून रडतोस; पण मी तुझा उद्या लिहिलेला आहे, तर मी हसणारच.’
४ ओ. गुरुदेव अंतर्मनात असल्याची अनुभूती घेता येणे : हे ऐकून मला फार कृतज्ञता वाटून मी आनंदी झालो. माझी श्रद्धा आणखी वाढली. कधी कधी मला वाटते, ‘हे सगळे माझ्या मनाचे खेळ आहेत’; पण गुरुदेव, माझा आत्मा मला सांगतो, ‘गुरुदेव माझ्यातच आहेत. ते माझ्या अंतरात वास करून प्रत्येक क्षणी मला सांभाळत आहेत.’ मी तुमच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायला असमर्थ आहे. इतका भरभरून गुरुकृपेचा वर्षाव आपण माझ्यावर करत आहात.
५. प्रार्थना
आपल्या चरणी प्रार्थना आहे, ‘गुरुवर, सर्व काही आपल्याच इच्छेप्रमाणे, आपल्याला अपेक्षित असेच करून घ्या. मला तुम्हाला अनुभवता येऊन तुम्हाला अपेक्षित अशी साधना आणि सेवा माझ्याकडून करून घ्या. गुरुदेव, मी आपल्या चरणी शरण आलो आहे. गुरुदेव, मला प्रारब्ध असणार, ते तुमची कृपा म्हणून त्याला सहन करण्याची शक्ती प्रदान करा. आपण दिलेले हे जीवन, हे मन, हा देह स्वीकार करा. गुरुदेव, मी आपल्या चरणी शरण आलो आहे. गुरुदेव, आपल्याच कृपेने मला आपल्या चरणांचा सेवक बनवून घ्या.
६. कृतज्ञता
मी रामनाथी आश्रमात येऊ शकलो, सेवा करू शकलो आणि क्षणोक्षणी तुम्हाला अनुभवू शकलो, ही आपलीच कृपा आहे. मी धन्य धन्य झालो. आपली सदा जय हो गुरुदेव ! मला स्वीकार करा, गुरुदेव ! आपणच माझ्याकडून हे लिहून घेतले. तुम्ही किती कृपा करता ! मी कृतज्ञ आहे, भगवंता !’
– श्री. संकेत अरुण सोनार, जळगाव (१.८.२०२३)
|