रा.स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक पू. माधव सदाशिव गोळवलकर ‘गुरुजी’ कसे झाले ?
आज पू. गोळवलकरगुरुजी यांचे पुण्यस्मरण आहे. त्या निमित्ताने…
पू. गोळवलकरगुरुजींना काही काळ परमार्थाचे वेड लागले आणि समाधीसाधनासाठी ते सारगाछी (बंगाल) येथील रामकृष्ण आश्रमाच्या शाखेत जाऊन राहिले. त्यांची दाढी आणि जटा हे त्या काळी प्राप्त झालेले वैभव गुरूंच्या आग्रहास्तव त्यांनी जन्मभर जतन केले. ‘स्वामी विवेकानंद घरोघर जावेत’, यासाठी कन्याकुमारी स्मारकाची कल्पना गुरुजींना स्फुरली. यात प्रेरणा पू. गोळवलकरगुरुजींची, कर्तृत्व एकनाथ रानडे यांचे आणि हात समाजाचे, असा प्रकार घडला. आपल्या जीवनसंगीतात स्वार्थाचा सूर नसावा, म्हणून गुरुजी यतीचे जीवन जगले.
पू. गोळवलकर यांना ‘गुरुजी’ हे पद कसे प्राप्त झाले ? गुरुजी बनारस विद्यापिठात शिकत होते. त्यांचे अनेक सांगाती संघ कार्यकर्ते होते. गुरुजी संघात जात नव्हते; पण कार्यकर्त्यांची तळमळ पाहून त्यांचे अभ्यासातील मागासलेपण दूर करण्यासाठी गुरुजी त्यांचे विषय स्वतः अभ्यासून त्यांना शिकवत. कामापायी तासिकेला उपस्थित न राहू शकणार्यांना गुरुजींनी तारले. कुणी तरी कृतज्ञतेने त्यांचे पाय धरले आणि ‘गुरुजी, धन्य तुम्ही’, असे म्हटले. तेव्हापासून ‘गुरुजी’ जगाचे आणि जन्माचे गुरुजी झाले.
– स्व. प्रा. शिवाजीराव भोसले
(साभार : सामाजिक संकेतस्थळ)