महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने शोधनिबंध सिद्ध करतांना श्री. शॉन क्लार्क आणि सौ. श्वेता क्लार्क यांनी अनुभवलेली गुरुकृपा !
१. ‘मास मिडिया’ या व्यापक स्तरावरील विषयावर शोधनिबंध सादर करतांना आलेली अनुभूती
१ अ. ‘मास मिडिया’ या विषयावरील लिखाण वेळेत पूर्ण कसे होईल ? या विवंचनेत असणे; माहितीजालावर (इंटरनेटवर) विषयाशी संबंधित लिखाण शोधत असतांना प.पू. गुरुदेवांनीच सूक्ष्मातून दोन ‘लिंक’ दाखवल्याने शोधनिबंधाचे लिखाण केवळ अर्ध्या दिवसात पूर्ण होणे : ‘वर्ष २०२२ मध्ये सप्टेंबर मासात (महिन्यात) अनेक परिषदा आणि इतर कार्यक्रम यांत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचा सहभाग असल्यामुळे या मासात सेवेच्या दृष्टीने आम्ही अधिक व्यस्त होतो. अनेक प्रयोग करून त्यांच्या नोंदी ‘यु.ए.एस्.’ (टीप १) या उपकरणाद्वारे घ्यायच्या होत्या. त्या नोंदींसमवेतच शोधनिबंध सिद्ध करण्याच्या सेवेत अनेक बारकावे होते आणि आमच्याकडे वेळ अल्प होता. ‘मास मिडिया (सर्वसामान्यांना माहिती पुरवणारी साधने, उदा. वृत्तपत्रे, आकाशवाणी, दूरचित्रवाणी इत्यादी)’ यावर एक नवीन परिषद होणार होती. ‘जनसंपर्क तंत्रज्ञानाचा समाजमनावर आध्यात्मिकदृष्ट्या होणारा परिणाम’, हा परिषदेचा विषय होता. ‘मास मिडिया’ किंवा ‘जनसंपर्कयंत्रणा’ हा तसा जटील विषय असून तो आध्यात्मिक दृष्टिकोनातून मांडायचा असल्यामुळे ‘त्याची रूपरेषा कशी असावी आणि तो शोधनिबंध वेळेत पूर्ण कसा होईल ?’, या विवंचनेत आम्ही होतो. त्या वेळी ‘प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ.आठवले) सूक्ष्मातून सतत आमच्यासमवेत असून तेच आमच्याकडून सेवा करवून घेत आहेत’, अशी अनुभूती आम्हाला आली. परिषदेच्या एक दिवस आधी माहितीजालावर आवश्यक असलेल्या विषयाशी संबंधित लिखाण आम्ही शोधत होतो. तेव्हा प.पू. गुरुदेवांनीच सूक्ष्मातून आम्ही शोधत असलेल्या लिखाणाच्या दोन ‘लिंक’ आम्हाला दाखवल्या. त्या लेखांचा संदर्भ, आम्ही केलेले आध्यात्मिक संशोधन आणि साधकांना सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान यांच्या आधारे आमच्या शोधनिबंधाचे लिखाण केवळ अर्ध्या दिवसात पूर्ण होऊ शकले. एरव्ही विषयाच्या जटीलतेनुसार लिखाण पूर्ण करायला किमान ५ दिवस ते १ आठवडा एवढा कालावधी लागतो.
टीप १ – ‘यु.ए.एस्.’ उपकरणाची ओळख : ‘या उपकरणाला ‘ऑरा स्कॅनर’ असेही म्हणतात. या उपकरणाद्वारे घटकांची (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांची) ऊर्जा आणि त्यांची प्रभावळ मोजता येते. हे उपकरण भाग्यनगर, तेलंगाणा येथील माजी परमाणू वैज्ञानिक डॉ. मन्नम मूर्ती यांनी वर्ष २००५ मध्ये विकसित केले. ‘वास्तू, वैद्यकशास्त्र, पशूवैद्यक शास्त्र, तसेच वैदिक शास्त्र यांमध्ये येणार्या अडचणींचे निदान करण्यासाठी या उपकरणाचा वापर करता येतोे’, असे ते सांगतात.’
१ आ. महर्षि आध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने श्री. शॉन क्लार्क यांनी परिषदेत सादर केलेल्या शोधनिबंधाला ‘सर्वाेत्कृष्ट सादरीकरणा’चा पुरस्कार मिळणे आणि सर्व गोष्टींचे कर्ता-करविता असूनसुद्धा स्वतः नामानिराळे रहाणार्या प.पू. गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता वाटणे : प.पू. गुरुदेवांनी सूक्ष्मातून आम्हाला ‘लिंक’च्या माध्यमातून आवश्यक लेख दिल्याबद्दल आम्हाला प्रत्येक क्षणी त्यांच्या प्रती कृतज्ञता वाटत होती. दुसर्या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने श्री. शॉन क्लार्क यांनी परिषदेत सादर केलेल्या शोधनिबंधाला ‘सर्वाेत्कृष्ट सादरीकरणा’चा पुरस्कार देण्यात आला. या परिषदेत २४ देशांनी १०० शोधनिबंध सादर केले होते. त्यांतील ५ जणांना ‘सर्वाेत्कृष्ट सादरीकरणा’चे पुरस्कार मिळाले होते. आम्हाला मात्र अंतर्मनातून ठाऊक होते, ‘प.पू. गुरुदेवांमुळेच आम्ही हे सर्व करू शकलो होतो.’ सर्व गोष्टींचे कर्ता-करविता असूनसुद्धा ते स्वतः आपले नाव कधीच कशावरही लिहीत नाहीत. (त्यांनी केले, असे ते कुठेही दाखवत नाहीत.) त्यांनी आम्हाला सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही त्यांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञ आहोत.
२. प.पू. गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे आध्यात्मिक उपाय केल्यावर एका प्रयोगाच्या नोंदीत येणारे अडथळे दूर होणे, तेव्हा प.पू. गुरुदेवांच्या कृपेविना आध्यात्मिक संशोधन करणे अशक्य असल्याचे लक्षात येणे
याच मासात (सप्टेंबर २०२२ मध्ये) संगीत आणि नृत्य यांवर आधारित ‘भारतीय शास्त्रीय संगीत आणि नृत्य’ यांच्या उत्पत्तीत भारतीय मंदिरांचे महत्त्व’, या विषयावर एक जागतिक ‘वेबिनार’ होणार होता. त्यात सहभागी असल्याने आम्हाला वेगवेगळ्या स्थानी, उदा. सभागृह, मंदिर आणि आध्यात्मिक संशोधन केंद्र येथे भारतीय शास्त्रीय संगीत अन् नृत्य यांचे विविध प्रयोग करून ‘यु.ए.एस्.’द्वारे त्यांच्या नोंदी घ्यायच्या होत्या. या सगळ्यांसाठी अत्यल्प वेळ असल्यामुळे ते संशोधन पूर्ण करण्यासाठी २० साधक दिवस-रात्र काम करत होते. त्या वेळी एका प्रयोगाच्या नोंदी योग्य आल्या नसल्याचे आमच्या लक्षात आले. त्या वेळी ‘अनिष्ट शक्तींनी सूक्ष्मातून आक्रमण केले असावे’, असा संशय आल्याने आम्ही एका संतांना त्याविषयी विचारले. त्यांनी आम्हाला ‘‘आध्यात्मिक स्तरावरील उपाय करून पुन्हा प्रयोग करा’’, असे सांगितले. त्यानंतर आम्ही केलेल्या प्रयोगांचे परिणाम उत्तम आले. ‘प.पू. गुरुदेवांच्या कृपेविना आध्यात्मिक संशोधन करणे अशक्य आहे. केवळ परात्पर गुरुच सर्व अडथळे दूर करून योग्य दिशेने मार्गदर्शन करू शकतात आणि अनिष्ट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण करतात’, हे आमच्या लक्षात आले.
३. ‘वेबीनार’साठी आदल्या रात्री लिखाण करतांना श्री. आणि सौ. क्लार्क या दोघांनाही चैतन्य आणि उत्साह जाणवणे अन् ‘गुरुतत्त्वाकडून अतिशय वेगाने विचारांचा ओघ येत आहे’, असे जाणवून त्यांचा भाव दाटून येणे
जागतिक ‘वेबीनार’साठी लागणार्या सर्व यु.ए.एस्.च्या नोंदी रात्री २ वाजेपर्यंत पूर्ण झाल्या. ‘वेबीनार’ दुसर्याच दिवशी असल्यामुळे आम्ही त्याचे लिखाण करायला आरंभ केला. एरव्ही रात्रीच्या वेळी आपल्याला जडपणा जाणवतो; पण श्री. शॉन यांना आणि मला (सौ. श्वेता क्लार्क) लिखाण करतांना प्रचंड प्रमाणात चैतन्य आणि उत्साह जाणवत होता. लिखाण करतांना आमच्या लक्षात आले की, दोघांच्याही मनात एकसारखेच विचार येत आहेत. काही वेळा श्री. शॉन त्यांच्या मनातील विचार सांगायचे, तर काही वेळा माझ्या मनात येणारे विचार मी पटापट लिहून काढायचे. ‘गुरुतत्त्वाकडून दोघांच्याही मनात अतिशय वेगाने विचारांचा ओघ येत आहे’, असे आम्हाला जाणवत होते. असे जेव्हा सलग ४ – ५ वेळा घडले, तेव्हा आम्हा दोघांचाही भाव दाटून आला. ‘गुरूंकडून चैतन्याचा प्रवाह आमच्या मनात येत आहे’, असे आम्हाला जाणवले. गुरुदेवांची ज्ञानशक्तीही आम्ही स्पष्टपणे अनुभवली. तेव्हा वाटले, ‘आमची साधना व्हावी’, यासाठी प.पू. गुरुदेव किती करत असतात ! आपण मात्र त्यासाठी पुरेशी कृतज्ञताही व्यक्त करू शकत नाही.’
आम्ही प.पू. गुरुदेवांच्या कोमल चरणी संपूर्ण शरणागतभावाने कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. शॉन क्लार्क (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) आणि सौ. श्वेता शॉन क्लार्क, संशोधन विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (६.१०.२०२२)
|