Chhattisgarh Naxal Attack : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांकडून एका व्यक्तीची हत्या !
नारायणपूर – पोलिसांचा खबर्या असल्याच्या संशयावरून शालूराम पोटाई नावाच्या एका ४५ वर्षीय व्यक्तीला घरातून खेचून बाहेर काढत नक्षलवाद्यांनी तिची हत्या केल्याची घटना छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात नुकतीच घडली. नक्षलवाद्यांनी या परिसरातील विकासकामे खोळंबण्यासाठी आणि दहशतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी निराशेतून निष्पाप नागरिकाची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
🛑A person was killed by #Naxalites in #Chhattisgarh on the suspicion of being a police informer!
🛑Policeman killed by Naxalites in Sukma, Chhattisgarh!
A small action force of Naxalites stabbed him on the neck with sharp weapons. He died on the spot.… pic.twitter.com/OCnjbCxVSF— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 4, 2024
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार, १५ ते २० सशस्त्र नक्षलवाद्यांनी शालूराम पोटाई यांच्या घराला वेढा घातला. त्यांना घरातून ओढून रस्त्यावर आणत त्याला त्याचे कुटुंबीय आणि स्थानिक नागरिक यांच्यासमोर अमानुष मारहाण केली अन् त्यानंतर त्याची हत्या केली. पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह विच्छेदनासाठी पाठवला. माओवाद्यांच्या ‘कुतुल एरिया कमिटी’ने पत्रक प्रसारित करत पोटाई हा पोलिसांचा खबर्या म्हणून काम करत होता, असे म्हटले आहे.
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांकडून पोलिसाची हत्या !
सुकमा – छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील गदिरस गावात पोलीस हवालदार सोडी लक्ष्मण यांची नक्षलवाद्यांच्या छोट्या कृती दलाने हत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. नक्षलवाद्यांनी त्यांच्या मानेवर धारदार शस्त्रांनी वार केले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हत्येची माहिती मिळाल्यानंतर गदिरस पोलीस ठाण्याचे एक पोलीस पथक घटनास्थळी पोचले. त्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या प्रकरणी आरोपींचा शोध चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तेलंगाणमध्ये ‘आयईडी’ स्फोटात गावकर्याचा मृत्यू
भाग्यनगर – तेलंगाणमधील मुलुगु जिल्ह्यातील जंगल परिसरात ३ जून या दिवशी बंदी घातलेल्या ‘सीपीआय’(माओवादी) गटाच्या सदस्याने पेरलेल्या ‘आयईडी’च्या स्फोटात एका ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. वाझेदू मंडळातील कोंगल गावाजवळ पेरलेल्या ‘आयईडी’वर पाय ठेवताच स्फोट होऊन त्या व्यक्तीचा तात्काळ मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. माओवादी त्यांची दहशत पसरवण्यासाठी ज्या भागात लोक नियमितपणे ये-जा करतात, तेथे ‘आयईडी’ पेरत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी वझेडू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.