डिगस येथे सनातन संस्थेचे साधक रमेश आंगणे यांचा सत्कार

सापडलेली अंगठी मूळ मालकाला केली परत

कुडाळ – तालुक्यातील डिगस येथील श्री कालिकादेवीचा जत्रोत्सव ११ डिसेंबर २०२३ या दिवशी साजरा झाला होता. जत्रोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी मंदिर परिसराची स्वच्छता करतांना गावातील सनातन संस्थेचे साधक श्री. रमेश आंगणे यांना एक सोन्याची अंगठी मिळाली होती. तालुक्यातील घावनळे येथील श्री. बाबुराव सोमा धुरी हे अंगठीच्या अनुषंगाने मंदिरात आले होते. त्या वेळी ओळख पटवून ती श्री. धुरी यांना देण्यात आली. ही अंगठी श्री. आंगणे यांना मिळाली होती, ती त्यांनी प्रामाणिकपणे परत केल्याचे समजल्यानंतर श्री. धुरी यांनी बक्षिस म्हणून श्री. आंगणे यांना १ सहस्र ५०० रुपये देऊ केले; मात्र आंगणे यांनी ती रक्कम घेतली नाही. त्याऐवजी त्यांनी श्री. धुरी यांना साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार होण्याविषयी सांगितले. त्याला श्री. धुरी यांनी होकार दिल्यानंतर त्यांना साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार करण्यात आले. २३ मे २०२४ या दिवशी श्री कालिकादेवी मूर्ती प्रतिष्ठापनेचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात गावातील प्रमुख मंडळींकडून श्री. आंगणे यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

‘सनातन संस्थेची शिकवण आणि  परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा यांमुळे मी हा सत्कार स्वीकारू शकलो. त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’, अशा शब्दांत श्री. आंगणे यांनी या सत्काराविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

या वेळी गावातील सर्वश्री रामचंद्र पवार, धाकू पवार, प्रभाकर पवार, पुनाजी पवार, बाळा घाडी आणि विठ्ठल पवार आदी उपस्थित होते.