नवी मुंबईकरांनी किमान एक तरी रोप लावावे ! – आयुक्त डॉ. कैलास शिंदे
नवी मुंबई, ३ जून (वार्ता.) – पर्यावरण दिनानिमित्त नवी मुंबईकरांनी किमान एक तरी रोप लावावे, असे आवाहन नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे. ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन आहे. त्यानिमित्ताने ‘आमची जमीन, आमचे भविष्य’ या संकल्पनेनुसार त्यांनी वरील आवाहन केले.
रोपांची आवश्यकता असल्यास, तसेच रोपे लावण्यासाठी जागेची आवश्यकता असल्यास नवी मुंबई महानगरपालिकेकडून ती उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी नागरिकांनी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील उद्यान विभागाच्या साहाय्यक आयुक्त ऋतुजा गवळी यांच्याशी ७९७७६३००६३ या क्रमांकावर आणि उद्यान अधीक्षक प्रकाश गिरी त्यांच्याशी ९३२२९१२८०१ या क्रमांकावर संपर्क साधावा. या उपक्रमात सर्व नवी मुंबईकरांनी सहभागी होऊन आपले नवी मुंबई शहर हरित करूया, असे आवाहन आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.