स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच, केडगाव (जिल्हा पुणे) येथे ३ दिवसांचा कीर्तन महोत्सव !
संत चोखामेळा पुण्यतिथी, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त आयोजन !
केडगाव (जिल्हा पुणे), ३ जून (वार्ता.) – येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच’च्या वतीने संत चोखामेळा यांची पुण्यतिथी, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त २८ ते ३० मे असे ३ दिवस कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
पहिल्या दिवशी वडगाव रासाई येथील युवा कीर्तनकार ह.भ.प. शुभम महाराज देशमुख यांनी कीर्तनसेवा केली. या वेळी त्यांनी संत चोखामेळा यांचे जीवन चरित्र श्रोत्यांसमोर मांडले. ‘देवाला आवडते अशीच भक्ती करणारा भक्त म्हणजे संत होय. संत चोखामेळा देवाला आवडणारी भक्ती करणारे संत शिरोमणी होते’, असे त्यांनी सांगितले. धर्माचा अभिमान बाळगत समाजाने हिंदु म्हणून संघटित व्हायला पाहिजे, असे मतही त्यांनी मांडले.
दुसर्या दिवशी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त नारदीय कीर्तनकार तसेच ‘नारायण महाराज बेट केडगाव देवस्थान’चे विश्वस्त ह.भ.प. मोरेश्वर नागनाथ जोशी महाराज यांनी कीर्तनसेवा केली. या कीर्तनसेवेच्या निमित्ताने समाजाचे प्रबोधन करतांना ह.भ.प. जोशी बुवांनी राष्ट्रभक्ती आणि परमार्थभक्ती यात साधर्म्य आहे, हे सांगतांना राष्ट्रार्थ प्राणाची बाजी लावणार्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवन चरित्रातील काही प्रेरणादायी प्रसंग मांडले. राष्ट्रभक्त हे निर्विवाद भगवत्भक्त आहेत, यात शंका नाही, असे प्रतिपादन करतांना त्यांनी तुकाराम महाराजांच्या गाथेतील ओवीचे निरूपण केले.
तिसर्या दिवशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ह.भ.प. तानाजी महाराज पांडुळे यांचे श्रवणीय कीर्तन झाले. तुकाराम महाराजांच्या अभंगातून पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे चरित्र ह.भ.प. तानाजी महाराज पांडुळे यांनी मांडले. ते पुढे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी या हिंदु धर्माभिमानी आणि धार्मिक वृत्तीच्या होत्या. सासरे मल्हारराव होळकर यांच्या पश्चात त्यांनी समर्थपणे इंदौर संस्थानचा कारभार चालवला. रजपुतांच्या आक्रमणाच्या वेळी स्वतः कमरेला तलवार बांधून उभ्या राहिल्या, तर राघोबादादांनी केलेल्या आक्रमणाच्या वेळी युद्धाची सज्जता केली आणि सोबतच राघोबादादांना एक मुत्सद्दी पत्र पाठवून राज्यावरील संकट परतावून लावले.