केवळ जातीच्या उल्लेखाने ‘ॲट्रॉसिटी’चा गुन्हा होऊ शकत नाही ! – मुंबई उच्च न्यायालय
मुंबई – एखाद्याने अपमानजनक पद्धतीने जातीचा उल्लेख केला, तर ‘ॲट्रॉसिटी’च्या (जातीवरून अपशब्द वापरणे) अंतर्गत गुन्हा होऊ शकतो; यामध्ये व्यक्तीचा उद्देश महत्त्वाचा असतो. केवळ जातीचा उल्लेख केल्यामुळे ‘ॲट्रोसिटी’चा गुन्हा होऊ शकत नाही, असे महत्त्वाचे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने नोंदवले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात कमलअली नावाच्या व्यक्तीच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. अजय चहांदे याने १२ जानेवारी २०२४ या दिवशी तक्रार केली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात येऊन कमल अली यांनी शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले होते. कमल अली यांनी सत्र न्यायालयात केलेला जामिनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने दोन्ही बाजू समजून घेऊन २५ सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावर कमलअली यांचा अटकपूर्व जामीन संमत केला.