डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडणारे जितेंद्र आव्हाड यांच्यावर कठोर कारवाई व्हावी !
वर्धा येथील सावरकरप्रेमींची मागणी !
वर्धा, ३ जून (वार्ता.) – स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीदिनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाड चवदार तळ्याच्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडले. ‘घटना शिल्पकारांचा अवमान करणार्या आव्हाड यांच्यावर कठोर कारवाई करावी’, अशी मागणी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा समितीचे अध्यक्ष श्री. श्याम देशपांडे आणि ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक नागरी समिती’चे अध्यक्ष श्री. हरिभाऊ वझुरकर यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.
ते म्हणाले की, महाड येथील चवदार सत्याग्रहाच्या आंदोलनात अनेक समाजांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यात ब्राह्मणही होते. सावरकर रत्नागिरीत स्थानबद्धतेत असल्याने त्यांनी आंदोलनात त्यांचे प्रतिनिधी पाठवले. न्यायालयीन खटल्यात पंडित पद्मनाभशास्त्री पालये यांच्यासारखी सवर्ण समाजाची माणसे सहभागी झाली. त्यांनी आंबेडकरांच्या बाजूने भूमिका मांडली होती. सराफ या ब्राह्मण न्यायाधिशांनी डॉ. आंबेडकरांच्या बाजूने निवाडा दिला. त्यामुळे डॉ. आंबेडकरांचे छायाचित्र तेही चवदार तळ्यावर फाडण्याची निर्लज्ज कृती राष्ट्रविरोधी आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना कठोर शासन करावे.